परमेश्वरावर विश्वास ठेवा... त्यामुळे कधीही कोणत्याही गोष्टीसाठी हट्ट करू नका... त्या परमशक्तीचे आपल्याबद्दलचे प्रेम पण अजब असते कि ती गोष्ट आपल्याला मिळतेच... पण आपल्या कधी नशिबातच नसलेल्या गोष्टीला मिळवून पुढे कदाचित आपल्यालाच पश्चाताप वाटतो...
Trust Almighty... So, don't ask for "forced" favor from Almighty... Because, affection from Almighty towards us can favor for anything... But, we will may regret for such "not happening" favor...
- जयराज
वरील वाक्यं कोणत्याही महान मनुष्याने म्हटली नसून केवळ ती मनात आली आणि त्यावर विचार सुरु झाला. पु. लं. नी "असा मी असामी" मध्ये म्हटलेच आहे, "या जगात काय म्हटले आहे या पेक्षा कोणी म्हटले आहे यालाच जास्त महत्व आहे, हे मला कळून चुकले आहे." म्हणून त्या खाली नाव टाकणे आवश्यक वाटले. आता त्यांना किती महत्व द्यायचे हे ज्याचे त्याने ठरवावे.
आता मूळ मुद्द्याकडे वळू या.
इथे मुळातच सुरुवात होते ती परमेश्वर मानणे अथवा न मानणे यापासून... आणि मग त्यावर आपला असलेला विश्वास...!!! ज्यांचा परमेश्वराच्या असण्यावर विश्वास वगैरे नाही त्यांनी "आपला आत्मविश्वास" असे वाचावे आणि "विश्वास पानपतातच गेला" असा काही उपरोधिक विचार असेल त्यांनी यापुढे न वाचणंच चांगलं. कारण यातील उदाहरणच "विश्वासा"वर आधारित आहे.
आता विश्वासाचे पण २ प्रकार पडतात. "अंध-विश्वास" आणि "डोळस" विश्वास. खरं पाहता डोळस विश्वास असा काही नसतोच. विश्वास हा अंधच असतो. लहानग्या बाळाला जेव्हा आपण हवेत टाकून पुन्हा झेलतो तेव्हा ते मोठ-मोठ्याने हसते. आता हा काय डोळस विश्वास असतो का? हा त्या बाळाने आपल्यावर टाकलेला अंध-विश्वासच असतो. असाच अंध-विश्वास संत मंडळी, "तू माझा सांगाती" असे म्हणत, परमेश्वरावर ठेवतात. तर परमेश्वर न मानणारी मंडळी (मुद्दाम "नास्तिक" हा शब्द वापरात नाही. ), आपल्या आत्मविश्वासावर ठेवतात आणि सर्व-सामान्य मंडळी गरजेनुसार या दोहोंमधे विश्वास बदलत राहतात. म्हणजे, आत्मविश्वासाने सुरुवात करतात आणि अपयश आले कि परमेश्वराला/नशिबाला दोष देतात. अर्थात, सर्वच जण असे करतात असे नाही. पण जे करतात त्यांसाठी हि पोस्ट आहे खरे तर. कारण "तू (परमेश्वर किंवा आत्मविश्वास) माझा सांगाती" या भावनेचे लोक यशा-पयशाचे श्रेय अनुक्रमे आपल्या परमेश्वराला आणि आत्मविश्वासालाच देतात. पण "अंध-विश्वासा"च्या नावाखाली बुवाबाजी करणाऱ्याला येथे स्थान नाही, हे एव्हाना आपल्या लक्षात आले असेलच.
आता यासाठी मी एक उदाहरण विचारात घेतलं ते मांडतो.
आपल्यापैकी बरेचजण लग्न करतात. त्यात काही प्रेम-विवाह करतात तर काहींचे लग्न जुळविले जाते(Arrange/d Marriage). आता ज्यांचे लग्न जुळविले जाते तिथे मुलगी/मुलगा बघणे वगैरे प्रक्रिया असतात आणि मग एकमेकांचा होकार-नकार कळविला जातो आणि मग लग्न होते. आता यात कधी-कधी एकतर्फी होकार येतो आणि दुसरीकडून होकार येण्यास काही काळ जातो. मग या काळात पहिला होकार देणाऱ्या व्यक्तीला कदाचित दुसरी व्यक्ती एक-दोन गाठी-भेटींमध्ये फार आवडलेली असते. किंवा किमानपक्षी नकाराची तरी अपेक्षा नसते. तसेच प्रेम-विवाहातही दोघांची अनुमती असली तरी प्रेमाची परिणिती विवाहात होण्याचा कालावधी सर्वांसाठीच सोपा/सरळ नसतो. आणि मग त्या मधल्या काळात सुरु होतो तो धावा... नकार मिळू नये यासाठी...
याकाळात परमेश्वराच्या असण्यावर विश्वास "नसलेली" व्यक्ती आपल्या आत्मविश्वासाच्या जोरावर या गोष्टी घडवून आणते. तर परमेश्वराच्या असण्यावर विश्वास असलेल्या व्यक्तीस इथे परमेश्वराचे प्रेम दिसून येते. कधी कधी आई कशी अपत्याच्या चुकीच्या मागण्या मान्य करते जेणेकरून त्याला त्या मागणीची निरर्थकता कळावी किंवा "होईल सगळे बरोबर" असे तिचे मन सांगत असते, तसे काहीसे परमेश्वराचे होते. आता हे वाक्य थोडेसे आध्यात्माच्या पातळीवरून बघितले पाहिजे कारण,
१. अध्यात्म कधीही केवळ शरीराचा विचार न करता, शाश्वताचा विचार करते.
त्यामुळे, त्या व्यक्तीच्या संपूर्ण जीवनाचा प्रश्न आहे वगैरे गोष्टींना येथे वाव नाही.
२. मी काही परमेश्वर नाही, त्यामुळे या मागचे अचूक (exact) कारण माझी बाल-बुद्धी नाही समजू शकत. त्यामुळे मूळ कारण वेगळेही असू शकते.
हा केवळ माझा अंदाज आहे.
मग शेवटी अपेक्षित असा होकार आला किंवा लग्न झाले कि सार्थक झाल्याचे समाधान मिळते. मग गप्पांना ऊत येतो. आवडी-निवडी कळू लागतात. स्वभाव, भाव-विश्व जुळविण्याचा प्रयत्न सुरु होतो. जे याच्यातून तरतात किंवा या मध्ये यशस्वी होतात ते खुलतच जातात. पण जे मना-विरुद्ध किंवा दडपणाने एकत्र येतात त्यांना त्रास होतो. आणि जे नाते विश्वासावर टिकून राहणे अपेक्षित असते तिथे थोडासा तडा जातो. हा तडा वेळीच समजूतदारीने भरून निघाला तर बरे. पण असे बऱ्याचदा होत नाही. वाटू लागतं कि, जी व्यक्ती मला आवडली होती ती हि व्यक्ती नाहीच आणि मग सुरु होतो मानसिक कोंडमारा... एकाचा किंवा दोन्ही बाजूंचा... तिथे जाणवू लागते कि जी व्यक्ती आपली कधी नव्हतीच त्या व्यक्तीची सोबत करणे खूप कठीण काम असते.
इथे मला कोणत्याही गोष्टीचा अपमान करायचा नाही. त्यामुळे हे केवळ उदाहरण म्हणूनच घ्यावे आणि मी केवळ "दे रे हरी पलंगावरी" चे समर्थनही करत नाही, तर मागचा मतितार्थ "कर्मण्यवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन।।" हाच आहे.
असं म्हणतात की, राज-हट्ट, स्त्री-हट्ट आणि बाल-हट्ट यापुढे कोणाचे काही चालत नाही. खरंतर परमेश्वराची आपण सारी लेकरेच आहोत. हा आपला माय-बाप आपल्या अंतरंगातच राहतो मग आपल्याला त्याच्यापेक्षा जास्त चांगलं कोण ओळखू शकतो? मग आपले चांगले-वाईट ठरवण्याचा अधिकार जसा आपण आपल्या जन्म-दात्यांना देऊ शकतो तशा या सर्व-शक्तिमान माय-बापालाही का देऊ नये? तेथे हट्ट काय कामाचा...? विचार करा... काही उणं-दुण राहील असेल तर माफ करा आणि अवश्य कळवा...