गुरुवार, १५ सप्टेंबर, २०१६

कर्म-धर्म संयोग

आज-काल "कर्म-धर्म संयोग" असं फारस ऐकायला मिळत नाही. पण जर कधी एखादी वयस्कर व्यक्ती असेल तिच्या तोंडून किंवा एखाद्या पुस्तकातून हे आपण बऱ्याचदा ऐकलं/वाचलं असेल.

आता या शीर्षकावरून हि काही बाबाच्या प्रवचनाची पोस्ट तर नाही ना असं काहीसं वाटू लागेल. पण असं काही नाही. खर तर या वाक्प्रचाराचा अर्थ मी बऱ्याच दिवसांपासून शोधण्याचा प्रयत्न करत होतो. आणि मग त्या शोधातून मला जो अर्थ लागला तो मी इथे लिहिण्याचा प्रयत्न करत आहे.

हा अर्थ लावत असताना मी काही पौराणिक कथा आणि मान्यतांचा दाखला विचारात घेतला आणि त्यामुळे तो (अर्थ)"कितपत योग्य" आहे आणि त्याचा(कथा आणि मान्यतांचा) "पुरावा" काय या दोन्ही प्रश्नांची उत्तरे माझ्याकडे नाहीत.

एखादे कर्म ( अर्थ गीतेतला, साधा अर्थ क्रिया विशेषतः मानवी अथवा  सजीवांची  ) आणि ते करत असता त्या क्रियेबद्दल त्या काळचा धर्म ( अर्थ गीतेतला, साधा अर्थ योग्य ( धर्म  ) कि अयोग्य ( अधर्म  )ठरवणे  )यांच्या संयोगाने एखादी प्रतिक्रिया घडणे म्हणजे "कर्म-धर्म संयोग" अशा निष्कर्षाप्रत मी पोहोचलो आहे. 

सोप्या भाषेत सांगायचं झालं तर,


आपल्याकडून घडलेली कृती आणि त्याच्या अनुषंगाने  लगेचच अथवा कालांतराने घडलेली प्रतिकृती वा मिळालेले फळ, म्हणजे "कर्म-धर्म संयोग "


आता हे किती बरोबर आणि किती चूक हे मी आधी सांगितल्याप्रमाणे मला माहित नाही. चू. भू. दे. घे. ( चूक भूल देणे घेणे ).


आता "अर्थ गीतेतला" असे म्हणून मी गीता वाचली आहे किंबहूना मला गीता समजली आहे असे मला दाखवायचे नाही. मुळात मी "संस्कृत श्रीमदभगवदगीता" एक-दोनदा वाचली आहे. पण मला ती समजली असे म्हणता येणार नाही. मला काही अर्थ कळाला, पण जास्त करून लोकांकडून, जाणत्या व्यक्तींकडून मी गीतेचा अर्थ जास्त समजून घेतला. गीतेत कर्म आणि धर्मा बद्दल बरीच चर्चा केली आहे. नित्य गीता-पठण करणाऱ्या व्यक्तीस नेहमी नवीन आणि प्रगल्भ अनुभव येत असावा असे मला माझ्या वाचनाच्या सवयीमुळे वाटते. त्यामुळे गीता-पठण करणारे कर्म आणि धर्म व्यवस्थित समजू शकतील आणि माझ्या पुढील दाखल्यांमध्ये चूक आढळली तर सुधारणा हि सुचवू शकतील.

आता नमनाला घडाभर तेल ओतून झाल्यावर आपण वरील "कर्म-धर्म संयोग" निष्कर्षाबाबतचे मी विचार केलेले दाखले पाहू :

असं मानलं जातं कि, एकूण कालचक्राचे ४ युग पडतात.
१. सतयुग        २. त्रेतायुग
३. द्वापरयुग     ४. कलियुग

त्यानंतर प्रलय आणि चक्र पुन्हा सतयुगापासून सुरु...

तसेच, अशी धारणा आहे कि, धर्म ( अर्थ वरीलप्रमाणेच )  हा सुरुवातीला ४ पायांवर/खांबांवर उभा असतो आणि प्रत्येक युगात त्याचा एक पाय/खांब कमी होत जातो.

अर्थात सतयुगात ४ खांबांवर उभा असणारा धर्म त्रेतायुगात ३ खांबांवर, द्वापरयुगात २ तर कलियुगात १ खांबावर उभा असतो. याचा अर्थ सतयुगात जो धर्म (सदाचार ) ४ पायांवर स्थिर असतो तो त्रेतायुगात ३ पायांवर थोडासा अस्थिर होतो, पुढे द्वापारात आणखी थोडा अस्थिर आणि कलियुगात ठार पांगळा होतो. कलियुग संपते वेळी त्याचा हा शेवटचा पायही निकामी होतो आणि सर्वत्र अधर्म, अनाचार व्यापतो आणि असा धर्माचा डोलारा पडल्याने/कोसळल्याने प्रलय उत्पन्न होतो.

आता याचा कर्म-धर्म संयोगाशी काय संबंध तो पाहू.

आपण दर वर्षी दसऱ्याला रावण-दहन करतो. त्याचे काय कारण असे विचारले, तर आपल्याला सांगण्यात येते कि, रावण दुष्ट राक्षस होता त्याने श्री राम पत्नी सीता मातेचे "हरण" केले होते.  त्याची शिक्षा त्याला याच दिवशी मिळाली त्याची आठवण आणि तो रावण आपल्या मधूनही निघून जावा म्हणून आपण रावण-दहन करतो.

आता आजमितीला पाहिलं तर हरण हि काही फार मोठी गोष्ट वाटणार नाही. कारण त्याही पेक्षा भयंकर अपराध आपण पाहतो/वाचतो/ऐकतो. मग रावणानी केलेल्या माता सीता-हरणालाच वाईट का मानण्यात येते?

याचा अर्थ मी रावणाने केलेल्या कृत्याचे समर्थन करतो असे नाही. अपराध हा अपराधाच असतो आणि त्याचे समर्थन होऊ शकत नाही. पण आपण जर रामायण वाचले तर आपल्या लक्षात येईल रावण हा महा-पंडित, मातृ आणि शिव भक्त होता. मातेसाठी शिवाची आराधना करून खुद्द शंभूंकडून शिव-लिंग मिळविणारा होता. जेव्हा रावण युद्धात धारातीर्थी पडला त्या शेवटच्या क्षणी प्रभू श्री रामचंद्रानी लक्ष्मणाला रावणाकडून ज्ञान घेण्याचे सांगितले. असे सारे काही असता केवळ माता सीतेचे हरण केले आणि तिचे पावित्र्य नष्ट न करता बंदिवासात ठेवले त्याची शिक्षा आपण युगा-न-युग रावण-दहन करून का देतो?

आता दुसरे उदाहरण बघू :

दयुत-सभेत द्रौपदीचे वस्त्र-हरण केले त्या दुर्योधन, दुःशासन आदी बंधूंना आपण वाईट मानतो पण त्यांच्या या कृत्याचा निषेध/शिक्षा म्हणून कधी त्यांचे दहन करत नाही. रावणाने असे तर काहीच केले नव्हते. मग शिक्षा रावणालाच का?

मी पुन्हा एकवार सांगतो मी कोणाचेही समर्थन करत नाही तर २ घटनांची केवळ तुलना करतो आहे.

या दोनही घटनांची कारणे जरी वेग-वेगळी असली तरी विटंबना तर झालीच होती. या पैकी कोणती घटना जास्त वाईट हे पाहण्यापेक्षा झालेला अधर्म महत्वाचा.

आता या २ घटना आणि धर्म व त्याचे पाय/खांब यांची सांगड आपण घालू आणि कर्म-धर्म संयोग समजता येईल का ते पाहू.


दोन्ही घटना हरणाच्या असल्या तरी त्या वेग-वेगळ्या युगात घडल्या. पहिली घटना, माता सीता-हरणाचा प्रसंग, त्रेतायुगातील आहे तर द्रौपदी वस्त्र-हरणाचा प्रसंग द्वापरयुगातील आहे.

त्रेतायुगात धर्म ३ पायांवर असल्याने धर्माचे पारडे जड होते पण तोच धर्म द्वापरयुगात २ पायांवर असल्याने धर्म आणि अधर्माचे प्रमाण सम-समान होते. त्यामुळे सतयुगात पर-स्री/पुरुषा  बद्दल जाणते वा अजाणतेपणी  विचार करणेसुद्धा महा-पातक मानले जाई (उदा. इंद्राला मिळालेला शाप आणि अहिल्या शिळा होऊन पडणे : त्रेतायुगाची सुरुवात ) त्याची व्याप्ती त्रेतायुगाच्या शेवटी पर-स्त्री हरणा पर्यंत येऊन पोहोचते. त्या नंतर ती पातळी आणखी खालावून वस्त्र-हरणापर्यंत पोहोचते तर आज-काल ( कालचक्राप्रमाणे आणि मान्यतेप्रमाणे कलियुगात ) ती आणखी घसरलेली/घसरत आहे.

अशाप्रकारे आज आपण इंद्र देवांचा राजा मानत असलो तरी त्याचे ( पावसाची देवता असूनही ) मंदिर बांधत नाही (निदान माझ्या माहितीप्रमाणे तर ते कुठेही नहिये. ) आणि मुलाचे नाव आपण देवेंन्द्र ( पदवी/उपाधी सारखे  ) ठेवतो पण केवळ इंद्र, सहसा, नाही. तसेच काहीसे दुर्योधन, दुःशासन आदी बंधूंचे पण आहे.

काल-परत्वे धर्म, या नियमाप्रमाणे इंद्राला ( देवांचा राजा, सर्व-शक्तिमान असूनही ) शाप, रावणाला वीरोचित पण अमरत्वाच्या जवळ-पास जाणारे वरदान असूनही मृत्यू आणि दुर्योधन, दुःशासन आदींना अधर्माने मृत्यू आला.

इंद्र आणि रावण यांनी केलेला अपराध आणि दुर्योधन, दुःशासन यांचा अपराध या मध्ये ( पुन्हा केवळ तुलना, समर्थन नाही ) मिळालेली शिक्षा हि इंद्र आणि रावण यांची भयंकर आहे आणि हाच काय तो कर्म-धर्म संयोग असावा असे मला वाटते.

या सर्व घटना धार्मिक असून यातून कोणाचीही, जाणते वा अजाणतेपणी, बदनामी अथवा अपमान अथवा भावना दुखावण्याचा माझा हेतू नाही. माझे विचार कितपत योग्य हे वाचकाने स्वतः पडताळून पाहावेत.



शुक्रवार, ९ सप्टेंबर, २०१६

संगीतामधील जादूगार : ए. आर. रेहमान (A. R. Rehman)

या पोस्टची सुरुवात कशी करू ते खरंच  कळत नाहीये. खरं पाहता, संगीताचा जादूगार असं शीर्षक मला द्यावस वाटत होत. पण संगीत हि एक जादुई कला असून तिचे प्रत्यंतर देणाऱ्यास संगीताचा जादूगार म्हणणे म्हणजे केवळ बंधन टाकणे असे वाटले आणि संगीतापासून ए. आर. रेहमानला दूर करणे मला खरंच जमत नाहीये म्हणूनच कि काय, अशा संगीताशी एकरूप वाटणाऱ्या व्यक्तीबद्दल लिहिताना "संगीतामधील जादूगार : ए. आर. रेहमान (A. R. Rehman)" असं शीर्षक दिलं. 

आता हे सगळं लिहिण्याचा प्रपंच करावासा वाटला कारण काल रात्री पुन्हा एकदा "छैय्याँ छैय्याँ" हे गाणं बघायला मिळालं. पुन्हा एकदा अशासाठी कि मी हे गाणं नेहमी बघतो न पेक्षा ऐकतो. मला जुनी गाणी ऐकायला आवडतात. सचिन देव बर्मन(S. D.), राहुल देव बर्मन (R. D.), ओ. पि. नय्यर, कल्याणजी-आनंदजी, लक्ष्मीकांत -प्यारेलाल अशा अनेक संगीतकरांची गाणी/संगीत ऐकायला खूप मजा येते. "सुनो सजना पापिहे ने (चित्रपट : आये दिन बहार के)" हे लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांनी संगीतबद्ध केलेले गाणं तर साक्षात स्वर्गसुखाचीअनुभुती देते असं मला नेहमीच वाटतं. या सर्वांत हल्लीच्या ए. आर. रेहमान यांचे नाव आणि स्थान खरोखरच निराळे आहे. 


मला रेहमान यांची प्रथम ओळख झाली ती त्यांच्या "वंदे मातरम्" या अल्बममुळे आणि त्या नंतर जे मनावर त्यांच्या अनोख्या शैलीने गारुड टाकलं, ते आजवर कायम आहे. मला त्यांच्या संगीतात विशेषता अशी जाणवते, आपण जर नीट लक्ष्य देऊन ऐकल, तर हे सहज लक्षात येईल, कि, जेव्हा गायक गात असतो त्या वेळी मागे केवळ हलकीशी धून सुरु असते आणि जेव्हा गायक २ कडव्यांमध्ये थांबतो त्या वेळेस रेहमान आपली संगीतमय जादू दाखवून जातो. 


आता छैय्याँ छैय्याँ च उदाहरण घ्या. जेव्हा गाण्याचे बोल सुरु असतात तेव्हा पार्श्वसंगीत म्हणून केवळ रेल्वेचा आवाज(Rhythm) आपण ऐकतो आणि २ कडव्यांच्या मधे रेहमान यांनी जी धून पेरणी केली आहे ती खरंच लाजवाब म्हणावी लागेल.  आणि हे केवळ एकमात्र उदाहरण नाही. "तेरे बिना (गुरु)", "जय हो" "वंदे मातरम्" अशा अनेक गाण्यांमध्येही हेच ऐकायला मिळते. "तू ही रे" किंवा "केहना हि क्या" या गाण्यांत तर बोल ऐकत असता, संगीत अगदी शून्य वाटावे(अगदी नसल्यासारखे, केवळ नाद माधुर्यासाठी "तू हि रे" मध्ये हलका ढोल आणि "केहना हि क्या" मध्ये टाळ्या ) असे आहे. त्यामुळे त्या गाण्याच्या शब्दांमधील भावना आपण जास्त अनुभवू शकतो आणि त्या भावनांचा ओघ अजिबात कमी न करण्याचे काम रेहमानचे २ कडव्यांमधील संगीत करते.


कुठेही अवास्तव वाद्याचा आवाज चढवणे नाही. कुठे अपेक्षित प्रभाव(special  effect) पाडण्यासाठी गरज पडलीच तर कर्ण -कटू न वाटता, गायक गाताना त्याच्या सुरांना, आवाजाला न्याय देण्याकडे, आणि गीतकाराच्या शब्दांकडे आपले(श्रोत्यांचे) ध्यान आकर्षित व्ह्यावे याकडे रेहमान खूप लक्ष देताना दिसून येतात. नाहीतर आज-काल काही असेही संगीतकार आहेत कि त्यांच्या गाण्यात मुळात शब्द काय आहेत हेच  कळत नाही, त्यातून नुसते जोरदार पार्श्वसंगीत आणि तार स्वरात ओरडणे. आणि जर का चुकून आपल्याला त्या गाण्याचे बोल कुठून मिळालेच, आज काल इंटरनेट वर सर्व काही मिळत, तर त्याचा चकार सुद्धा अर्थ लागत नाही. जाऊ दे, कोणाला तरी छोटे दाखवून रेहमानला मोठे दाखवण्याची माझी छाती होत नाही. कारण असे करणे हाच महा-मूर्खपणा म्हटला जाईल.

रेहमान यांच्याबद्दल त्यांचे जवळचे जे सांगतात ते ऐकून खरंच या मनुष्याबद्दल आदरभाव आणखी द्विगुणित होतो. सतत की-बोर्ड, कंप्युटर घेऊन संगीतमय दुनियेत राहणारा हा अवलिया मनानेही तितकाच हळवा आहे. आणि संगीत मनुष्याला कशी शांती आणि आत्मानंद देऊ शकतो हे रेहमानकडे पाहण्याने चटकन जाणवते.

अशा या संगीतकाराला माझा मानाचा मुजरा...!!!

-- जयराज 

मंगळवार, ६ सप्टेंबर, २०१६

नादब्रह्म

मनातील  विचारांचे  तरंग (नाद ), शब्द (ब्रह्म ) स्वरूपात  मांडणे  म्हणजेच  नादब्रह्म.  किंवा  आपण मनात जसे बोलतो ते लिखित स्वरूपात आणणे म्हणजे नादब्रह्म. 

आता मन म्हटले की बंधनांची सीमा नाहीच आणि त्याची गती तर सर्वश्रुतच आहे... 


म्हणूनच तर समर्थ रामदास मारुती-स्तोत्रात म्हणतात,

मनासी टाकिले मागे, गतीसी तुळणा नसे ।।

 पण हे हनुमंताच्या बाबतीत... आपण केवळ विचारांची शब्द (ब्रह्म) स्वरूपात देवाण-घेवाण करू... 


त्यामुळे इथे कधी अध्यात्मिक post येतील, कधी तांत्रिक (techinacal), कधी काय तर कधी काय...!!!

एक असा विषय नाही...!!!

विशेषतः एखादी घटना आणि त्यामुळे मनात आलेले विचार असे काही तरी... 


इथे केवळ  माझ्या मनातील  (वैयक्तिक )विचार असतील  आणि  ते कोणत्याही  व्यक्ती, वस्तू , धर्म , जात , संप्रदाय , सजीव  अथवा  निर्जीव  यांचा  अपमान किंवा  त्यांच्या भावना दुखावण्याच्या हेतूने  नसतील . 


तसेच  हा  blog कोणत्याही विशिष्ठ व्यक्ती , जात , धर्म  अथवा  संप्रदायासाठी  नसून सर्वांसाठी खुला आहे. 


या blog चा हेतू केवळ निखळ  मनोरंजन आणि जमल्यास ज्ञानवर्धन असा  आहे आणि  तसाच व्हावा याची वाचकांनीही  नोंद घ्यावी . 


एखादी post आवडली अथवा न आवडली किंवा post वाचून आनंद झाला किंवा वाईट/दुःख वाटले अथवा भावना दुखावल्या तर आपण e-mail, प्रतिक्रियां-मार्फ़त संपर्कात राहूच...!!!


या blog च्या माध्यमातून आपले काही काळापुरते का होईना पण निखळ मनोरंजन आणि जमल्यास ज्ञानवर्धन व्हावे अशी आदिशक्ती चरणी प्रार्थना करतो आणि लेखनास  आरंभ करतो...!!!


या देवी सर्व भुतेषु, बुद्धी-रूपेण संस्थिता ।

नमःतस्यै नमःतस्यै, नमःतस्यै नमो नमः ।।
-- सर्व प्राणिमात्रांत बुद्धी रूपाने वास करणाऱ्या आदिशक्तीला त्रिवार नमन असो...!!!

कविता : गणेश-स्तवन



आठवता तुझ्या आगमनाचे
काया मना अन् वाचे
तरंग उठती प्रेमाचे
स्वागत करण्या प्रथमेशाचे || ||

त्रिखंडाचे आपण राजे

हृदयी आमुच्या नित्य विराजे
त्रिभुवनात डंका वाजे
नमन स्विकारावे गिरीजात्मजे || ||

तुझे भास पावसाचे

नित्य सोबत असण्याचे
वाढवी बळ या मनाचे
नाम स्मरता लंबोदराचे || ||

भक्तांवर करीशी माया

ठेविशी कृपेची छाया
हा भव-सिंधू तराया
दाखवा मार्ग हे गणराया || ||

द्यावे आम्हांसी अंतर

मागणे हेची निरंतर
मन रमे अवांतर
पुजिता गजानन चिरंतर || ||

चौदा विद्येचे आगार

चौंसष्ट कलांचे माहेर
दूर पळवी विकार
नाम सार्थ विघ्नेश्वर || ||

किती करावी गणती

किती वर्णावी महती
शंख चक्र गदा हाती
रुप साजे गणपती || ||

असे वात्सल्याचा परिपाक

चालवी कालचक्राचे चाक
दावण्या आसुरांसी धाक
प्रकटले अष्ट-विनायक || ||

रिद्धि-सिद्धीचा तू दाता

सकल विश्वाचा त्राता
बुद्धि शक्तीची समता
तुज ठायी एकदंता || ||

पिता असे कैलासपती

जगत् जननी पार्वती
बंधू कार्तिकेय होती
विकट थोर कुटुंब किती || १० ||

जग जयघोष बोले

मूषक डौलात चाले
पाहूनी रम्य ते सोहाळे
गणेशभक्त धन्य पावले || ११ ||

जयराज