शुक्रवार, ९ सप्टेंबर, २०१६

संगीतामधील जादूगार : ए. आर. रेहमान (A. R. Rehman)

या पोस्टची सुरुवात कशी करू ते खरंच  कळत नाहीये. खरं पाहता, संगीताचा जादूगार असं शीर्षक मला द्यावस वाटत होत. पण संगीत हि एक जादुई कला असून तिचे प्रत्यंतर देणाऱ्यास संगीताचा जादूगार म्हणणे म्हणजे केवळ बंधन टाकणे असे वाटले आणि संगीतापासून ए. आर. रेहमानला दूर करणे मला खरंच जमत नाहीये म्हणूनच कि काय, अशा संगीताशी एकरूप वाटणाऱ्या व्यक्तीबद्दल लिहिताना "संगीतामधील जादूगार : ए. आर. रेहमान (A. R. Rehman)" असं शीर्षक दिलं. 

आता हे सगळं लिहिण्याचा प्रपंच करावासा वाटला कारण काल रात्री पुन्हा एकदा "छैय्याँ छैय्याँ" हे गाणं बघायला मिळालं. पुन्हा एकदा अशासाठी कि मी हे गाणं नेहमी बघतो न पेक्षा ऐकतो. मला जुनी गाणी ऐकायला आवडतात. सचिन देव बर्मन(S. D.), राहुल देव बर्मन (R. D.), ओ. पि. नय्यर, कल्याणजी-आनंदजी, लक्ष्मीकांत -प्यारेलाल अशा अनेक संगीतकरांची गाणी/संगीत ऐकायला खूप मजा येते. "सुनो सजना पापिहे ने (चित्रपट : आये दिन बहार के)" हे लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांनी संगीतबद्ध केलेले गाणं तर साक्षात स्वर्गसुखाचीअनुभुती देते असं मला नेहमीच वाटतं. या सर्वांत हल्लीच्या ए. आर. रेहमान यांचे नाव आणि स्थान खरोखरच निराळे आहे. 


मला रेहमान यांची प्रथम ओळख झाली ती त्यांच्या "वंदे मातरम्" या अल्बममुळे आणि त्या नंतर जे मनावर त्यांच्या अनोख्या शैलीने गारुड टाकलं, ते आजवर कायम आहे. मला त्यांच्या संगीतात विशेषता अशी जाणवते, आपण जर नीट लक्ष्य देऊन ऐकल, तर हे सहज लक्षात येईल, कि, जेव्हा गायक गात असतो त्या वेळी मागे केवळ हलकीशी धून सुरु असते आणि जेव्हा गायक २ कडव्यांमध्ये थांबतो त्या वेळेस रेहमान आपली संगीतमय जादू दाखवून जातो. 


आता छैय्याँ छैय्याँ च उदाहरण घ्या. जेव्हा गाण्याचे बोल सुरु असतात तेव्हा पार्श्वसंगीत म्हणून केवळ रेल्वेचा आवाज(Rhythm) आपण ऐकतो आणि २ कडव्यांच्या मधे रेहमान यांनी जी धून पेरणी केली आहे ती खरंच लाजवाब म्हणावी लागेल.  आणि हे केवळ एकमात्र उदाहरण नाही. "तेरे बिना (गुरु)", "जय हो" "वंदे मातरम्" अशा अनेक गाण्यांमध्येही हेच ऐकायला मिळते. "तू ही रे" किंवा "केहना हि क्या" या गाण्यांत तर बोल ऐकत असता, संगीत अगदी शून्य वाटावे(अगदी नसल्यासारखे, केवळ नाद माधुर्यासाठी "तू हि रे" मध्ये हलका ढोल आणि "केहना हि क्या" मध्ये टाळ्या ) असे आहे. त्यामुळे त्या गाण्याच्या शब्दांमधील भावना आपण जास्त अनुभवू शकतो आणि त्या भावनांचा ओघ अजिबात कमी न करण्याचे काम रेहमानचे २ कडव्यांमधील संगीत करते.


कुठेही अवास्तव वाद्याचा आवाज चढवणे नाही. कुठे अपेक्षित प्रभाव(special  effect) पाडण्यासाठी गरज पडलीच तर कर्ण -कटू न वाटता, गायक गाताना त्याच्या सुरांना, आवाजाला न्याय देण्याकडे, आणि गीतकाराच्या शब्दांकडे आपले(श्रोत्यांचे) ध्यान आकर्षित व्ह्यावे याकडे रेहमान खूप लक्ष देताना दिसून येतात. नाहीतर आज-काल काही असेही संगीतकार आहेत कि त्यांच्या गाण्यात मुळात शब्द काय आहेत हेच  कळत नाही, त्यातून नुसते जोरदार पार्श्वसंगीत आणि तार स्वरात ओरडणे. आणि जर का चुकून आपल्याला त्या गाण्याचे बोल कुठून मिळालेच, आज काल इंटरनेट वर सर्व काही मिळत, तर त्याचा चकार सुद्धा अर्थ लागत नाही. जाऊ दे, कोणाला तरी छोटे दाखवून रेहमानला मोठे दाखवण्याची माझी छाती होत नाही. कारण असे करणे हाच महा-मूर्खपणा म्हटला जाईल.

रेहमान यांच्याबद्दल त्यांचे जवळचे जे सांगतात ते ऐकून खरंच या मनुष्याबद्दल आदरभाव आणखी द्विगुणित होतो. सतत की-बोर्ड, कंप्युटर घेऊन संगीतमय दुनियेत राहणारा हा अवलिया मनानेही तितकाच हळवा आहे. आणि संगीत मनुष्याला कशी शांती आणि आत्मानंद देऊ शकतो हे रेहमानकडे पाहण्याने चटकन जाणवते.

अशा या संगीतकाराला माझा मानाचा मुजरा...!!!

-- जयराज 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा