काया मना अन् वाचे
तरंग उठती प्रेमाचे
स्वागत करण्या प्रथमेशाचे || १ ||
त्रिखंडाचे आपण राजे
हृदयी आमुच्या नित्य विराजे
त्रिभुवनात डंका वाजे
नमन स्विकारावे गिरीजात्मजे || २ ||
तुझे भास पावसाचे
नित्य सोबत असण्याचे
वाढवी बळ या मनाचे
नाम स्मरता लंबोदराचे || ३ ||
भक्तांवर करीशी माया
ठेविशी कृपेची छाया
हा भव-सिंधू तराया
दाखवा मार्ग हे गणराया || ४ ||
न द्यावे आम्हांसी अंतर
मागणे हेची निरंतर
मन न रमे अवांतर
पुजिता गजानन चिरंतर || ५ ||
चौदा विद्येचे आगार
चौंसष्ट कलांचे माहेर
दूर पळवी विकार
नाम सार्थ विघ्नेश्वर || ६ ||
किती करावी गणती
किती वर्णावी महती
शंख चक्र गदा हाती
रुप साजे गणपती || ७ ||
असे वात्सल्याचा परिपाक
चालवी कालचक्राचे चाक
दावण्या आसुरांसी धाक
प्रकटले अष्ट-विनायक || ८ ||
रिद्धि-सिद्धीचा तू दाता
सकल विश्वाचा त्राता
बुद्धि शक्तीची समता
तुज ठायी एकदंता || ९ ||
पिता असे कैलासपती
जगत् जननी पार्वती
बंधू कार्तिकेय होती
विकट थोर कुटुंब किती || १० ||
जग जयघोष बोले
मूषक डौलात चाले
पाहूनी रम्य ते सोहाळे
गणेशभक्त धन्य पावले || ११ ||
- जयराज
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा