मंगळवार, २८ फेब्रुवारी, २०१७

काही सुभाषितं : भाग १

================================================
१. ऐश्वर्यस्य विभूषणं सृजनता, शौर्यस्य वाक् संयमः |
ज्ञानस्योपयमः श्रुतस्य विनयो, वितस्य पात्रे व्ययः |
अक्रोधस्तपसः क्षमा बलवतां, धर्मस्य निर्व्याजता |
सर्वेषांमपि सर्व कारणमिदं, शीलं परम् भूषणम् |

अर्थ :
ऐश्वर्याचे (व्यक्तीचे) सृजनता, शूराचे संयमाने बोलणे, ज्ञानाची उपासना करणाऱ्याचे विनयाने ऐकणे, धनिकाचे सत्पात्री दान, बलवानाचे राग न करता क्षमा करणे, धार्मिकाचे लोभ/हाव न करणे, असे (आभूषण) असले तरी, या सर्वांमध्ये चांगले/स्वच्छ चारित्र हेच सर्वोत्तम असे आभूषण आहे.
================================================
२. गुणिनां निर्गुणीनां च दृश्यतें महदन्तरं ।
हारः कंठगते स्त्रीनां, नुपूराणि च पादयो: ।।

अर्थ:
गुणी आणि निर्गुणी (गुणहीन) यांमधील अंतर चांगलेच दिसून येते. (उदाहरणच द्यायचे झाले तर) हार स्त्रीच्या गळ्यात दिसतो तर पैंजण पायांमधे.
================================================
३. यथा काष्ठं च काष्ठं च समेयातां महोदधौ ।
समेत्य च व्यपेयातां, तद्वत भूतसमागम: ।।

अर्थ:
समुद्रात जसे दोन लाकडी ओंडके लाटांमुळे जवळ येतात आणि जवळ येताच पुन्हा दूर जातात, तसेच मनुष्य-मात्रांच्या सहवासाचे पण आहे.

"पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा" या गीतात ग. दि. माडगुळकर हाच श्लोक असा लिहितात,

"दोन ओंडक्यांची होते सागरांत भेट 

एक लाट तोडी दोघां, पुन्हा नाहिं गांठ 
क्षणिक तेंवि आहे बाळा, मेळ माणसांचा"
================================================
४. धैर्यम यस्य पिता:, क्षमा च जननी, शांतीश्चिरं गेहिनी |
सत्यम् सुनुरयं, दया च भगिनी, भ्राता मनःसंयमः |
शैय्या भुमितलं, दिश् च वसनं, ज्ञानामृतम् भोजनम् |
एते यस्य कुटुंबिनो वद सखे, कस्माद् भयंं योगिनः ||

अर्थ:
धैर्य ज्याचा पिता, आणि क्षमा आई, चिरःशांती पत्नी, मुलगा सत्य आणि दया बहिण, मनसंयम भाऊ आहे. अंथरायला जमिन, दिशांचे कपडे आणि ज्ञानामृताचे (ज्ञानोपासनेचे) जेवण असे ज्याचे कुटुंब असेल, हे सखे, त्या योगी मनुष्याला कसली भिती?
================================================
५. वृंतस्थितस्य पद्मस्य, मित्रौ वरुण भास्कर:।
वृन्ताचूतस्य तस्येईंव, क्लेश दाह करा उभौ ।।

अर्थ:
देठावर असणाऱ्या कमळाच्या फुलाचे,  सूर्य आणि वारा मित्र असतात तर देठावरून निखळून पडलेल्या कमळाच्या फुलास ते (क्रमशः) क्लेश आणि दाह करतात.
================================================
६. विद्या विवादाय धनं मदाय, खलस्य शक्ती: परपीडनाय ।
साधोस्तु सर्वम् विपरितम् एतत्, न्यानाय दानाय च रक्षणाय ।।

अर्थ:
वाईट मनुष्याची विद्या विवाद करण्यासाठी, धन माज करण्यासाठी तर शक्ती इतरांना त्रास देण्यासाठी असते. या विपरीत, सज्जन मनुष्याचे वरील सर्व (क्रमशः) ज्ञान देण्यासाठी, दान देण्यासाठी आणि रक्षण करण्यासाठी असते.
================================================
७. अतिपरिचयदवज्ञा संततगमनादनादरो भवति ।
मलये भिल्लपुरंध्री चन्दनतरुकाष्ठमिंधनं कुरुते ॥

अर्थ:
खूप परिचयाने अवज्ञा होते, (एखाद्या ठिकाणी) सतत गेल्याने अनादर होतो. (जसे) मलय पर्वतावरील भिल्ल स्त्री चंदनाचे लाकूड (ज्वालाग्राही) इंधन म्हणून वापरते. अर्थात, तुमची कितीही लायकी/योग्यता असली तरी सततच्या गोष्टीमध्ये तुमची किंमत कमी धरली/केली जाऊ शकते. 
================================================
८. सुभाषित रसास्वाद:, सज्जनै: सहसंगती ।
सेवा विवेकि भूपस्य, दुःख निर्मूलनं त्रयं ।।

अर्थ:
सुभाषितांचा आस्वाद घेणे, सज्जनांची संगत असणे, (आणि) बुद्धिमान/विवेकी राजाची सेवा करणे या तीन गोष्टी दुःखाचे समूळ नाश करणाऱ्या आहेत. 
================================================
९. या देवी सर्व भुतेषु, मातृरुपेन संस्थिता ।
नमःतस्यै नमःतस्यै, नमःतस्यै नमो नमः ।।

अर्थ:
सर्व प्राणिमात्रांत आईच्या रूपाने वास करणाऱ्या आदिशक्तीला त्रिवार नमन असो...!!!
================================================
१०. एकोहं असहायोहं, कृशोहं अपरिच्छद: । 
स्वप्नेपेवं विधा चिंता, मृगेंद्रस्य न जायते ।।

अर्थ:
मी एकटा आहे, मी असहाय आहे, मी कृश आहे, गुणहीन आहे अशा व्यर्थ चिंता सिंहाच्या स्वप्नात सुद्धा येत नाहीत. 
================================================
११. अतिरिक्त: करो यस्य, ग्रथिता अंगुलिको: मृदू ।
चापांकुशांकित: सोथ, चक्रवर्ती भवेद ध्रुवं ।।

अर्थ:
ज्याचे हात लांब आहेत, बोटे मऊ आहेत आणि शरीर अंकुशाप्रमाणे तीक्ष्ण आहे असा तो नक्की चक्रवर्ती बनणार.
चक्रवर्ती राजाची लक्षणे सांगणारा श्लोक. 

================================================
१२. चित्ते प्रसन्ने भुवनं प्रसन्नं चित्ते विषण्णे भुवनं विषण्णम् ।
अतोऽभिलाषो यदि ते सुखे स्यात् चित्तप्रसादे प्रथमं यतस्व ॥

अर्थ:
मन आनंदी असेल तर जग आनंदी वाटेल (अन्) मनचं (जर) दुःखी असेल तर जगसुद्धा दुःखीच भासेल. त्यामुळे जर तुम्ही सुखाची अपेक्षा करत असाल तर आधी मनापासून (आनंदी करण्यापासून) सुरुवात करावी. 
================================================
१३. पृथिव्यां त्रीणि रत्नानि, जलमन्नं सुभाषितम् ।
मूढैः पाषाणखण्डेषु, रत्नसंज्ञा विधीयते ॥

अर्थ:
पृथ्वीवर तीनच रत्न आहेत, ते म्हणजे, पाणी, अन्न आणि सुभाषितं. पण मूर्ख लोक, (उगाच) दगडाच्या तुकड्यांना रत्न संबोधतात. 
================================================
१४. चंद्राननार्ध देहाय, चंद्रांषु सितमूर्तये ।
चंद्रार्कानल नेत्राय, चंद्रार्ध शिरसे नम: ।।

अर्थ:
चंद्रा सारखा (शुभ्र) देह असणाऱ्या, चंद्रासारखी शीतलता असणाऱ्या, चंद्रासारखे डोळे असणाऱ्या, (आणि) डोक्यावर अर्धचंद्र धारण करणाऱ्यास (प्रभू शिवास) नमन असो. 
================================================
१५. माता शत्रु: पिता वैरी, येन बालो न पाठित: ।
न शोभते सभामध्ये, हंसमध्ये बको यथा ।।

अर्थ:
आपल्या अपत्यास न शिकविणारे (शिक्षित न करणारे) आई-वडील हे त्याचे (अनुक्रमे) शत्रू आणि वैरी आहेत. कारण, जसे हंसांमध्ये बगळा शोभत नाही त्याप्रमाणे असे अपत्य (विद्वानांच्या) सभेमध्ये शोभून दिसत नाही. 
================================================
१६. स्वगृहे पुज्यते मुर्खा, स्वग्रामे पुज्यते प्रभुः ।
स्वदेशे पुज्यते राजा, विद्वान सर्वत्र पुज्यते ।।

अर्थ:
मुर्खाची पुजा (मान) घरात, देवाची (ग्रामदेवता / ग्रामप्रमुख) पुजा गावात, राजाची पुजा राज्यात होते. पण विद्वान मनुष्य सर्वत्र पुजिला जातो.
================================================
१७. धर्मो जयति नाधर्मः, सत्यं जयति नानृतम् ।
क्षमा जयति न क्रोधो, देवो जयति नासुरः ।।

अर्थ:
धर्माचा विजय होतो अधर्माचा नाही. सत्याचा विजय होतो असत्याचा नाही. क्षमा जिंकते राग नाही. (तसेच) देवांचा विजय होतो असुरांचा नाही.
================================================
१८. व्यसने मित्रपरीक्षा, शूरपरीक्षा रणाङगणे भवति ।
विनये भृत्यपरीक्षा, दानपरीक्षा च दुर्भिक्षे ।।

अर्थ:
(आपल्या) कठिण समयात मित्राची परीक्षा होते (संकटकाळी धावून येतो तोच खरा मित्र). शूराची परीक्षा रणांगणात होते. विनयाने नौकराची परीक्षा होते आणि दानाची परीक्षा दुष्काळात होते. 
================================================
१९. रामभिषेके जलमाहरन्त्या
हस्ताच्च्युतौ हेमघटौ युवत्या 
सोपानमार्गेन करोती शब्दं 
ठंठं ठ ठंठं ठ ठठं ठ ठंठ: ।।

अर्थ:
हा एक काव्यशास्त्र विनोदाचा श्लोक आहे. यात असे म्हटले आहे कि, प्रभू श्रीरामांच्या राज्याभिषेकासाठी पाणी भरायला गेलेल्या एका युवतीच्या हातून घागर/घडा खाली पडते. (आणि) ती घागर पायऱयांवरून घरंगळत जात असता ठंठं ठ ठंठं ठ ठठं ठ ठंठ: असा आवाज करत होती. 
================================================
२०. भो दारिद्रय! नमस्तुभ्यं, सिद्धोहं त्वत्प्रसादतः ।
पश्चाम्यहं जगत्सर्वं, न माम पश्चती कश्चन ।।

अर्थ:
हा आणखी एक काव्यशास्त्र विनोदाचा दाखला. यात सुभाषितकार म्हणतो,
"हे दारिद्र्या, तुला माझा नमस्कार असो. तुझ्या प्राप्तीने मला सिद्धी प्राप्त झाली आहे. कारण, मी सर्व जगाला पाहू  शकतो पण मला कोणीच पाहू शकत नाही."
एखाद्या गरीब दरिद्री मनुष्याला जग, आप्तेष्ट नेहमीच दुर्लक्ष करतात. तेच व्यंग/उपहासात्मक स्वरूपात सुभाषितकार दाखवून देतो. 
================================================
२१. शशीना च निशा, निशयाच शशी,
शशिणा निशया च विभाती नभ: ।
पयासां कमलं, कमलेन पय:,
पयासां कमलेन, विभाती सर: ।।

अर्थ:
चंद्रामुळे रात्र, रात्रीमुळे चंद्र आणि चंद्र व रात्रीमुळे आकाश शोभून दिसते. 
(तसेच) पाण्यामुळे कमळ, कमळामुळे पाणी आणि कमळ व पाणी यांमुळे सरोवर शोभून दिसते. 
याचा भावार्थ असा कि, कोणत्याही एका व्यक्ती अथवा गोष्टीमुळे सुंदरता/पूर्णत्व नसते तर त्याची अनुरूप जोडी सुंदरता/पूर्णत्व आणते. जसे आपण म्हणतो कि, पुरुष (नर/पती) आणि प्रकृती (मादी/पत्नी) शिवाय एकमेकांना आणि निसर्गालाही पूर्णत्व येत नाही, त्याचेच हे रूपक आहे. 
================================================


सोमवार, २७ फेब्रुवारी, २०१७

माझं विमान प्रेम : भाग २

माझं विमान प्रेम : भाग १ वरून पुढे चालू...

तर नागपूर विमानतळावर, माझ्या पहिल्या बोर्डिंग पास वर शिक्का बसला आणि मी waiting room मध्ये येऊन बसलो.

तसा उत्तर गोलार्धातील उन्हाळ्याचा काळ असल्याने लवकर उजाडलेला दिवस, पण ढगांमुळे एक प्रकारचा पसरलेला काळोख, अधून-मधून होणाऱ्या हलक्या पावसाच्या सरी या साऱ्या गोष्टींकडे आता माझे लक्ष जाऊ लागले. ते आजू-बाजूला फिरणारे लोक, सफाई तसेच विमानतळावरील इतर कर्मचारी, पोलीस, थोडी-फार गर्दी असूनही विमातळावरील स्वच्छता, जाणवणारी गर्दीमधील शांतता, जाहिराती या साऱ्या गोष्टी अगदी नवख्या वाटत होत्या. थोडा वेळ या सर्व गोष्टींचं निरीक्षण करून झाल्यावर मी विमान कधी येणार याची वाट पाहात बसलो. त्याच वेळेस एक सूचना झाली, कि, पुण्याला जाणारे विमान हैद्राबादहून निघाले असून काही वेळात नागपूर विमानतळावर पोहोचेल. मनात धाक-धुक, थोडासा आनंद, थोडीशी भीती अशा साऱ्या संमिश्र भावना दाटू लागल्या.

अखेर स. ७:४५ च्या सुमारास किंगफिशरचे पुण्याला जाणारे अपेक्षित विमान विमानतळावर आल्याची घोषणा झाली आणि मनातील भावनांनी वेग पकडला. एरवी अपेक्षित गाडी आली कि बस अथवा रेल्वे फलाटावर होणारी धावपळ पाहता, इथे बोर्डिंग गेट समोर लागलेली रांग थोडीशी नवी आणि नजरेला विसंगत वाटत होती. मी हि त्या रांगेचा हिस्सा झालो. पुन्हा एकवार बोर्डिंग पासची आणि सामानाला(hand baggage) ला लावलेल्या टॅग ची तपासणी झाली आणि गेट मधून बाहेर पडलो.

आणि हीच ती वेळ होती जेव्हा सर्वप्रथम विमानाचे इतक्या जवळून दर्शन होणार होते. नागपूर विमानतळ फार मोठे नसल्याने बसने विमानापर्यंत जावे लागले नाही, बहुतेक, कि बसनेच गेलो, लक्षात नाही. पण विमान जवळून पाहताना "अगा मी ब्रह्मची पाहिले" अशी काही माझी अवस्था झाली होती. विमान ATR-७२ प्रकारचे होते.

आत प्रवेश करताना हवाई-सुंदरीने हसून नमस्कार करून स्वागत केले, त्याचा स्वीकार करत मी माझे आसन शोधायला निघालो. आत २X२ आसन व्यवस्था होती. विमानाच्या आत चालण्यासाठी (आणि आसनावर बसण्यासाठीही, हे नंतर कळलं ) थोडीशी कमी जागा असते हे जाणवतं. माझा नंबर, ९D बहुतेक, पाहून मी तिथे पोहोचलो तर आधीच एक महाशय खिडकीत बसून होते. आता नंबर आसनावर नसून वरती केबिन लगेज कंपार्टमेंट वर असल्याने, मी गोंधळून पुन्हा मागे उभ्या असलेल्या हवाई सुंदरीपाशी गेलो आणि तिकीट चेकेरला विचारावे तसे माझे आसन हुडकून देण्याची विनंती केली. तिने पण तत्परता दाखवत त्या महाशयांना उठवून बाजूच्या आसनावर बसण्याची विनंती केली व मला माझी खिडकीतली जागा मिळाली. त्या आनंदात मी, सामान वरती ठेवून, बाहेर बघतचं होतो कि माझ्या पोटात एकदम गोळाच आला. कारण माझी जागा नेमकी विमानाच्या पंख्या जवळ आली होती. तसा पंखा झाकलेला असला तरी इतका मोठा गोलाकार भाग त्याची जाणीव करून देतच होता. विमानाचे इंजिन सुरु असल्याने आत एकप्रकारचा, भुंग्याच्या आवाजासारखा, आवाज घुमत होता.

आता प्रश्न होता सीट-बेल्टचा. तो बांधायचा कसा? सगळे अजून स्थिर-स्थावर झाले नव्हते, ती संधी साधून मी त्या बेल्टचे निरीक्षण करू लागलो. बाजूच्या मनुष्याच्या ते लक्षात येऊ न देणे, हेही अपरिहार्य वाटत होतं, त्यामुळे निरीक्षणात काही अडचणी येत होत्या.

काही वेळात सारे स्थिर-स्थावर झाले आणि विमानाचा दरवाजा बंद केला गेला. आपापले मोबाइल, लॅपटॉप आदी इलेक्ट्रॉनिक सामग्री बंद करण्याची सूचना सर्वप्रथम झाली. मग विमानाच्या चालकाचा(Pilot) आवाज घुमला. त्याने स्वतःचे नाव, विमानाची थोडीशी माहीती, सध्याचे बाहेरचे तापमान आदी माहिती दिली आणि विमान हळू-हळू धावपट्टीकडे निघाले.

या वेळात, हवाई-सुंदरी काही सूचना देऊ लागल्या.
उदा. विमानास किती दरवाजे आहेत, त्यापैकी आपात्कालीन किती, आपत्कालीन स्थितीत काय करायचे, आसनाचा पट्टा कसा लावायचा व काढायचा इ. इ. त्या सूचना माझ्यासाठी नवीन असल्याने मी लक्ष देऊन ऐकल्या आणि सगळ्यात महत्वाचं सीट बेल्टचं नीट समजून घेतलं. न जाणो बेल्ट नीट बसला नाही तर विमानाने हवेत उड्डाण केलं कि मी पण हवेत जायचो या भीतीने तो नीट आवळून बांधला आणि नंतर निघतोय का ते बघायला म्हणून काढून पण बघितला. खात्री झाल्यावर पुन्हा व्यवस्थित बांधला, (काSहि अवघड नसतं बरं का हे) आणि पुढील प्रवासाची आतुरतेने वाट पाहू लागलो.

या काळात, साऱ्या सूचना झाल्या आणि आमचे विमान धावपट्टीवर येऊन पोहोचले.

उड्डाणाची मजा पुढील भागात... क्रमशः ... 

माझं विमान प्रेम : भाग ३ 




कविता : भरारी

कविवर्य कसुमाग्रज तथा विष्णु वामन शिरवाडकर यांच्या स्मृतीस स्मरुन, मराठी भाषा दिनानिमित्त, सादर करीत आहे,

भरारी

अमर्याद तुझे गगन
अमर्याद असावे धोरण
घ्यावी झेप गगनी
बांधूनी मर्यादेचे कंकण ||1||

मर्यादा ती कशाची?
थोरा मोठ्यांच्या आदराची,
रागास न येण्याची,
राखेतून उभे राहण्याची ||2||

उत्तुंग भरारी यशाची,
पाय जमिनीवर ठेवण्याची,
गरजूस मदत करण्याची,
उडण्यास प्रेरणा देण्याची ||3||

गगन भरारी घेताना
न दुर्लक्ष्यावे घरटे,
यश कौतुक स्वीकारताना
आपले नसावेत एकटे ||4||

नको करू माज,
नको करु गर्व
जिथे साथीला आपले,
तिथेच वसे स्वर्ग ||5||

- जयराज

बुधवार, २२ फेब्रुवारी, २०१७

छत्रपती शिवाजी महाराजांची राजकारणी दूरदृष्टी

खरं पाहता, "माझं विमान प्रेम : भाग २" लिहिण्यापूर्वी मी या नवीन विषयावर लिहीत आहे. तसं मध्येच एखाद्या गोष्टीची लिंक तोडणे बरोबर नाही परंतु, काल रात्री, दि. २१/०२/२०१७, मी शाहिर पिराजींचा एक पोवाडा ऐकत असताना माझ्या मनात काही विचार आले आणि ते ताबडतोब लिहिणे मला निकडीचे वाटले, म्हणून हा सारा प्रपंच...!!!

तसे पाहता, छत्रपती शिवाजी महाराजांच्या दूरदृष्टीबद्दल अनेकांनी लिहून ठेवले आहे आणि त्यावर एक महाग्रंथ नक्कीच होऊ शकतो हे कोणीही मान्य करेल. त्यामुळे आता मी नवीन काय सांगणार असा प्रश्न कदाचित तुम्हांला पडेल. किंबहूना, मी जे पुढे लिहणार/सांगणार आहे ते तुम्हांपैकी काहींना आधीपासूनच माहितीही असेल. पण हे पूर्णपणे माझे विचार आहेत हे मी आधीच नमूद करतो.

आता आपण मूळ मुद्याकडे वळू या...!!!

एकंदर शिवचरित्राचा, उपलब्ध कागदपत्रं, बखरी आणि त्यांच्या आधारे लिहिण्यात आलेल्या कादंबऱ्या व पोवाडे, यांच्या सहाय्याने अभ्यास करता असे लक्षात येते कि, थोरल्या छत्रपतींनी माघार/शरणागती कधी घेतलीच नाही, अपवाद केवळ जंजीऱ्याची चढाई आणि मिर्झा राजे जयसिंग यांच्याशी केलेला तह... 

जंजीरा जिंकणे दुर्गम असे दिसताच, तिथे व्यर्थ शक्ती न खर्च करता, छत्रपतींनी सिंधुदुर्ग आणि विजयदुर्ग असे भक्कम सागरी किल्ले बांधून स्वराज्याच्या सागरी सीमा आणि आरमार यांचा चोख बंदोबस्त केला. 

पण मिर्झा राजांच्या बाबतीत फारसा लढा न देता, विनाशर्त तह करण्यावर भर दिला. यावर काहींचे म्हणणे असे पडेल कि मिर्झा राजे राजपुत, हिंदू होते म्हणून महाराजांनी माघार घेतली. तर काही म्हणतील मिर्झा राजांचा राजकारणी डाव जबरदस्त होता, त्यामुळे महाराजांना दोन पावलं मागे घ्यावी लागली. 

शाहीर पिराजींनी मिर्झा राजे जयसिंग यांच्या बद्दल त्या पोवाड्यात असे म्हटले आहे कि,

                     पुढे औरंजेबाने आपला, राजकारणी डाव खेळलेला 
                     मुत्सद्दी व धोरणी असलेला , मिर्झा राजा जयसिंगाला 
                     शिवाजीवर पाठवून दिला, त्यानं पुरंदर वेढीला 
                     तोफांचा भडीमार केला, जोराचा हल्ला चढविला 

वरील कोणत्याही कारणांशी मी असहमत नाही. पण या बाबतीत माझ्या मनात वेगळेच विचार आले, त्याचं कारण शिवाजी सावंतांच्या "छावा" या कादंबरीत आहे.

थोरले छत्रपती दिल्ली दरबारातील राजपुतांची ताकद चांगलीच ओळखून होते. दिल्लीपती इतक्या मोठ्या प्रदेशावर एकछत्री अंमल राखून होता कारण, त्याच्या चाकरीला ईमानी आणि झुंझार राजपुत होते. तसेच दिल्लीच्या तख्तावर औरंगजेबला बसविण्यासाठी झालेल्या लढाईत मिर्झा राजांची दारा शुकोह(तत्कालीन पातशाहा शहाजहान चा थोरला आणि आवडता मुलगा) तर्फे जाणवलेली कमी महाराजांनी नेमकी हेरली. त्यांची मदत दाराला मिळाली असती तर औरंगजेबाला दिल्लीचे तख्त जिंकणे कठिण होते. पण त्यावेळी नेमके मिर्झा राजे पूर्वेकडे अडकून पडले होते.

राजपुत शूर, पराक्रमी होते पण चाकर होते. "स्वराज्य म्हणजे काय?, त्याची गरज काय?" हे राजपुतांना समजावणे गरजेचे होते. अखंड हिंदुस्थानावर राज्य करण्याची पात्रता असूनही बादशहाच्या सेवेत ते धन्यता मानत होते. गरज होती ती त्यांंच्या पात्रतेची, इतिहासाची त्यांना जाणिव करुन  देण्याची...!!! महाराणा प्रतापांच्या बलिदानाची आठवण करून देण्याची. त्यांच्यातील स्फुल्लिंग पेटवण्याची...!!!

छत्रपती हे जाणून होते कि आज ना उद्या मोगली टोळधाड घेऊन औरंगजेब दख्खनेत जरुर उतरणार आणि त्या धाडीत नुकतेच उमलू लागलेल्या आपल्या स्वराज्याची (आणि रयतेची) अपरिमीत हानी होणार. अशा वेळेस मिर्झा राजांसारखा एखादा मातब्बर राजपुत सरदार आपला मित्र असणे गरजेचे आहे. म्हणजे, औरंगजेब दक्षिणेत उतरताच राजपुतांच्या मदतीने, आणि जमल्यास एखाद्या शहजाद्यास हाताशी धरुन, उत्तरेत तख्तासाठी बंडाळी घडवून आणता येईल आणि वेळ व नशीबाने साथ दिलीच तर दिल्लीतील उपऱ्यांची सत्ता उलथवून एत्तदेशीय राजपुतांची गेलेली सत्ता पुन्हा प्रस्थापित करता येईल. जर हे न जमल्यास निदानपक्षी उत्तरेत गोंधळ उडवून देऊन औरंगजेबाला आल्या पावली परत पाठवून स्वराज्याची होणारी हानी तरी टाळता येईल.

पण हे सगळं घडण्यासाठी प्रथम राजपुतांचा विश्वास संपादन करणे गरजेचे होते. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी दिल्लीला जाऊन पातशहाची भेट घेणे, संभाजी महाराजांना मोगली सरदार बनवणे या साऱ्या मिर्झा राजांच्या मागण्या मानल्या.

शाहीर पिराजी छत्रपती शिवाजी महाराज आणि मिर्झाला राजे जयसिंग यांच्या मैत्रीबद्दल आणि विश्वासाबद्दल पुढे म्हणतात,

                  शिवाजीने अशा वेळेला, जाणून भविष्यकाला 
                  माघारी पाय घेतला, तडजोडीने किल्ले दिले गेले एकमेकाला 
                  त्यामुळे मिर्झा राजा तो माने शिवबाला जी जी जी 
                  शिवाजीचे नाव गाजले, शत्रूही मित्र जाहले 
                  जसे पोथ्या पुराण आपले, तसे बायबल, कुराण मानिले. 

आणि नेमकं असंच काहीसं छत्रपती संभाजी महाराजांच्या काळात घडलं. औरंगजेबाचा एक शहजादा, अकबर, त्याच्या एका राजपुत सरदाराबरोबर, दुर्गादास राठोड, औरंगजेबाशी बगावत करुन, नेमका छत्रपती संभाजी महाराजांच्या आश्रयाला आला आणि दख्खनेत उतरण्याचे कारण शोधणाऱ्या दिल्लीपती औरंगजेब पातशहाला निमित्त मिळाले. मधल्या काळात मिर्झा राजे जयसिंग विष प्रयोगाने मारले गेले होते आणि त्यांचा मुलगा रामसिंग दिल्ली दरबारात होता. तसेच थोरल्या छत्रपतींचाही काळ होऊन छत्रपती संभाजीराजे स्वराज्याचे उत्तराधिकारी झाले.

छत्रपती संभाजी महाराजांंनी नेमकी तीच खेळी करत, पुर्वानुमानाप्रमाणे, दहा हजाराचे सैन्य देऊन अकबराला उत्तरेत धाडावे, असा विचार केला. आधीच धाकल्या छत्रपतींनी काही कुमक बिहारकडे पाठविली होती. पण औरंगजेबाचा दख्खनेतील तळ पाहता, आणि शहजादा अकबराचे रणातील शौर्य न आजमावता, मोठी फौज उत्तरेत केवळ बंडाळी माजविण्यासाठी पाठविणे धोक्याचे होते. त्यामुळे अकबराला सैन्याची कुमक न देता, सुरूवातीला, सुरक्षित राजपुतान्याला (गुजरात - राजस्थान) पोहोचविण्याचे ठरले. नंतर गरज पडलीच तर शाहजाद्याचे शौर्य व नीती जोखून, आणि एत्तद्देशीय (स्वराज्याची) स्थिती पाहून, कुमक पाठवावी असे ठरले. छत्रपतींनी आपला हा मानस रामसिंगांना पत्र लिहून कळविला आणि बंड पुकारण्याची कल्पनाही दिली. पण औरंगजेबाने चाणाक्षपणे केलेल्या नाकाबंदीमुळे अकबराला तेथे पोहोचणे अशक्य झाले. तसेच मिर्झा राजांचा मृत्यू/विषप्रयोग दिल्लीपतीच्या सांगण्यावरून, मिर्झा राजे जयसिंग आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वाढत्या मैत्रीतून झाला, असा एक समज हि होता. त्या गोष्टीमुळे असेल कदाचित, पण राग असूनही रामसिंगांनी बगावत/बंड पुकारले नसावे. मिर्झा राजे जयसिंग असते तर, देव जाणे, कदाचित अपेक्षित घटना घडल्याही असत्या. कारण कुठल्या तरी एका कादंबरीत (नक्की आठवत नाही पण, छावा किंवा छत्रपती संभाजी - लेखक विश्वास पाटील, असावी), छत्रपतींशी पुरंदर भेटीनंतर, मिर्झा राजांचे पुढीलप्रमाणे काहीसे स्वगत आहे,

"राजे, तुम्ही आम्हांला आधी भेटला असतात तर अखंड हिंदुस्थानचा चेहरा आम्ही बदलला असता. जी धमक, हिम्मत तुम्ही या पोरसवदा वयात दाखवली ती आम्हांला या वयातही दाखवता येऊ नये याचे वैष्यम्य वाटते." (शब्द तेच नसतील पण स्वगताचा आशय तोच आहे.)


अन्यथा, एका रात्रीत जावळीसारख्या दुर्गम खोऱ्यात शिरून ते काबीज करणाऱ्या, गळाभेटीत दगा करणाऱ्या अफजलखानाचा कोथळा काढणाऱ्या, लाखाच्या आसपास सैन्य असूनही शास्ताखानावर त्याच्याच छावणीत शिरुन प्राणघातक हल्ला करणाऱ्या, मोगलांच्या राजधानीतून, दस्तुरखद्द बादशहाच्या शैतानी पहाऱ्यातून आपला एकही माणूस न गमावता, छोट्या संभाजी राजांंसह सुखरुप निसटणाऱ्या छत्रपतींना, मिर्झा राजांना झुलवत ठेवणं कठिण नव्हतं. हेच पुढे २० वर्ष औरंगजेबासोबत घडलंं म्हणून तो दख्खन (स्वराज्य) कधी पादाक्रांत करुच शकला नाही. पण असे मिर्झा राजांना झुंझवत ठेवून पुढचा पट तयार करणे शक्य झाले नसते. म्हणूनच छत्रपतींनी मिर्झा राजा जयसिंगांशी शक्य होई तो लवकर पण अजीबात शंका येऊ न देता, विनाशर्त तह स्वीकारला असावा, असे मला वाटते.

अशा, खुद्द शत्रुकडूनही कौतुकाचेच शब्द ऐकू येणाऱ्या, अखंड असावे सावधान, या उक्तीनुसार सतत दूरदृष्टीने वागणाऱ्या जाणत्या राजास कोटी-कोटी प्रणाम...!!!

बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय...!!!


मंगळवार, २१ फेब्रुवारी, २०१७

माझं विमान प्रेम : भाग १

खरं तर माझं आणि विमानाचं प्रेम हे किती जगा-वेगळं आहे हे मला ओळखणाऱ्या लोकांना वेगळं सांगायची खरंच गरज नाही. मग ते जमेल तसं विमान प्रवास करणं असो वा मोबाइल, computer वर flight simulator game खेळणं असो. अजूनही मी Google Earth मधील Flight Simulator आवडीने खेळत असतो.

प्रत्येकालाच लहानपणापासून विमानाची, विमान-प्रवासाची आवड/craze ही असतेच. जमिनीवरून चिमटीत पकडता येईल असे वाटणारे विमान जवळून कसे दिसत असेल? खरंच विमानातून जमिनीवरील माणसं,इमारती मुंगी सारख्या दिसत असतील का? विमान-विमान करत हात दाखवणारी लहान मुले आणि कुतूहलाने वर पाहणारी माणसं विमानातून दिसत असतील का? असे अनेक प्रश्न मला-तुम्हांला सतत पडत असतील नाही? आता ज्यांनी विमानातून एकदा तरी प्रवास केला असेल त्यांना या प्रश्नांचं हसू येईल. पण तुम्ही स्वतः आठवून बघा, पहिल्या विमान प्रवासाची आपली अवस्था...

बरेच जण विमान प्रवास खर्चाचा म्हणून टाळतात, किंवा ऑफिस मधून कधी तरी मिळेलच या आशेवर असतात. पण खरे तर मी असा कधी विचार केलाच नाही. कारण, मला पहिली नौकरी लागली आणि काही महिन्यांच्या आतच मी माझा पहिला-वहिला विमान प्रवास केला, स्वखर्चाने. Thanks to my parents (या साठी मी माझ्या आई-वडिलांना धन्यवाद देईन).  कारण त्यांनी कधी मला कोणत्याही गोष्टीचा अनुभव घेण्यापासून रोखलं नाही.

त्याच झालं असं, २० जून २०११ ला, मी एका लग्नासाठी म्हणून चंद्रपूरला गेलो होतो. आणि ते लग्न आटोपून मी २१ जून २०११ ला पाहिल्यांदा नागपूर ते पुणे (इंदोर मार्गे) असा विमान-प्रवास केला. खर तर सारंच अकल्पित होत.

याची सुरुवात अशी झाली कि, नुकतीच, म्हणजे मार्च २०११ ला, मला पहिली नौकरी लागली होती. आणि नवीन नौकरी असल्याने म्हणा किंवा तिथल्या एकूण सर्व खर्चाने म्हणा पण काही पैसे हातात शिल्लक राहिले होते. त्यावेळी ऑफिस मधील एक लग्न चंद्रपूरला होते आणि त्या लग्नाला, मैत्रीच्या नात्याने, जाणे अगत्याचे होते.

एका दिवशी अचानक डोक्यात असा विचार आला कि चंद्रपूर ते नागपूर अंतर पाहता आणि पुणे-नागपूर flight connectivity व किंमत पाहता एखादा तरी विमान प्रवास शक्य आहे. हा विचार मी पहिला माझ्या आई-वडिलांच्या कानी घातला आणि त्यांनी काही आढे-वेढे न घेता होकार दिला. मग प्रश्न होता कि तिकीट कसं  काढायचं? पुलंच्या अपूर्वाई मधला तो प्रश्न माझ्यासमोर पण उभा राहिला. मग सुरुवातीला मीच थोडासा इंटरनेटचा आधार घेतला आणि मला किंगफिशर ची वेळ, route आणि सगळ्यात महत्वाचं "किंमत" (काय करू शेवटी मध्यमवर्गीय पडलो ना, किंमत आणि महिन्याच बजेट बघावचं लागतं) परवडण्यासारखी वाटली. सारं काही ठीक होत पण "तिकीट book करायचं कसं?" हा यक्ष प्रश्न होताच.

मग लग्न असलेल्या व्यक्तीलाच या संबंधी माहिती आणि विमान प्रवासाचा अनुभव असल्याने, तिकीट book करायला लावलं, अर्थात online payment माझ्याच card ने केलं. एकदाचं तिकीट book झालं. विंडो सीट पण घेतली. त्या वेळी याचे पैसे काही विमान कंपन्या घेत नसत. किंगफिशर त्यातलीच एक होती.

झालं, लग्न २० जून २०११ ला व्यवस्थित पार पडलं आणि मी लगेच दुपारी नागपूरकडे प्रस्थान केलं. मला हे सांगण्यात आलं होत कि नागपूर विमानतळ शहराबाहेर, अलीकडेच, आहे त्यामुळे मी ST कंडक्टरला विमानतळापाशी थांबवायला सांगितलं. तासाभरच्या प्रवासाने मी विमानताळापाशी आलो आणि ST गर्दीने गच्चं भरलेली असूनही कंडक्टर काकांनी मला व्यवस्थित उतरू दिलं आणि विमानतळाचा रस्ता पण सांगितला.

सारच नवीन असल्याने मी विमानतळा पर्यंत एक चक्कर टाकली आणि ते बाहेरून पाहून घेतलं. पण विमान दुसऱ्या दिवशी सकाळी ८:१५ वा. असल्याने आजची रात्र काढायची कुठं? हा एक प्रश्न डोळ्यांसमोर होताच. बरं, पहिलीच विमानतळ भेट असल्याने आत पण सोय होऊ शकते हे माहित नव्हतं. मग जवळच्या हॉटेल मध्ये रात्री मुक्काम केला. त्या रात्री खरं तर मला झोपच नाही आली.

२१ जून २०११ च्या सकाळी ६:३० वा. हॉटेल मधून बाहेर पडलो आणि त्यांनी मला विमानतळावर पोहोचवण्यासाठी गाडीची व्यवस्था पण करून दिली. खरं तर त्याची काही गरज नव्हती कारण, चालत ते विमानतळ केवळ १० मिनिटांच्या अंतरावर होत. पण मी आता विमानाच्या जगात होतो.

विमानतळावर आलो, बाहेर उभ्या पोलिसांना तिकीट आणि ओळख-पत्र दाखवून ६:३५ वा. आत चेक-इन काउंटर वर पोहोचलो. जूनचा काळ असल्याने बाहेर ढगाळ वातावरण आणि पावसाच्या हलक्या सरी होत्या. बोर्डिंग पास घेऊन लगेच सिक्युरिटी चेक (security check) साठी जाऊन उभारलो. देव-जाणे, ते सुरु झालं होत का नव्हतं. पण माझं security-check समोरची माणसे जशी वागत होती तसे सारे सोपस्कार करून, "आपला हा काही पहिला प्रवास नाही, असे बरेच प्रवास आपण केलेत", असे दाखवत झालं. कमरेचा बेल्ट, पाकीट, मोबाइल आणि एकमात्र माझी बॅग, ज्याला hand-baggage म्हणतात हे नंतर कळलं, असो, बाजूला करून केवळ बोर्डिंग पास हातात घेऊन पोलिसांसमोर उभा राहिलो. त्यांनी त्यांच्या हातातल्या मेटल-डिटेक्टर ने माझी आणि दुसऱ्या एकाने स्कॅनर मशीनने माझ्या इतर सामानाची चाचणी(test) घेऊन एकदाचा बोर्डिंग पास वर शिक्का मारला आणि मी आत waiting area मध्ये पोहोचलो.

आतापुढे काय झालं ते पुढील भागात.... क्रमशः ... 

माझं विमान प्रेम : भाग २



सोमवार, २० फेब्रुवारी, २०१७

मला आवडलेले विचार

या पोस्ट मध्ये मी मला आवडलेले काही विचार देत आहे. हे विचार कदाचित एखाद्या लेखकाचे असतील, एखाद्या विचारवंताचे/थोर व्यक्तीचे असतील, एखाद्या सुभाषिताचा अर्थ असेल, कोणीतरी सहज बोलून गेलेलं वा कुठे तरी असच वाचलेलं असेल किंवा मग सहज माझ्या मनात आलेले असतील.

खरं तर हे विचार थोडे तत्वज्ञानाकडे झुकणारे असल्याने कोणाला तरी प्रवचन वगैरे वाटतील. त्यामुळे ज्यांना अशा "प्रवचनां"मुळे कंटाळा/झोप येत असेल तर त्यांनी हि पोस्ट पाहूच नये किंवा सरळ झोप येण्यासाठी म्हणून पाहावी, हि नम्र विनंती.

  1. संगीत आणि पुस्तकं तुम्हाला कधीही एकटं पडू देत नाहीत.
     
  2. Marry a Girl/Boy, who equally respect your parents as of her/his and should respect and love you as a person, who you are, irrespective of your appearance and wealth...
     
  3. कोणी काय गमावलं आणि काय कमावलं याच योग्य उत्तर केवळ काळच देऊ शकतो...
     
  4. काही घटना केवळ "एक दुःस्वप्न" समजून विसरायचा कितीही प्रयत्न केला तरी विस्मृतीत जात नाही...
    Some incidences can not be erased from memory by just saying, it was a nightmare...
     
  5. वडीलधाऱ्या व्यक्तींचा आदर, सहनशीलता, क्षमा आणि समोरच्या व्यक्तीच्या ठिकाणी स्वतःला ठेऊन विचार करण्याची क्षमता हेच खरे अलंकार आणि मनुष्याला मन असण्याची लक्षणे आहेत.
     
  6. तुम्ही कितीही चांगले असलात तरी चर्चा केवळ एका वाईट प्रसंगाचीच होते... त्यामुळे कितीही वाईट प्रसंग उभा ठाकला तरी "सर्वांसमक्ष" आपला तोल ढळू नये यातच आपली खरी कसोटी असते...
     
  7. मनुष्य आपल्या चुका तेवढ्या झाकून ठेवतो आणि दुसऱ्याच्या चुका मात्र सर्वांना दाखवत सुटतो...
     
  8. ज्याप्रमाणे फुटलेले मोती लाखेच्या लेपाने जोडता येत नाहीत, त्याप्रमाणे अपमानाने तुटलेले प्रेम सांधणे, ईश्वरालाही शक्य नाही...
    - संस्कृत सुभाषित
     
  9. मी एक वाईट मनुष्य असलो तरी एखाद्याचा राग शांत होण्यासाठी जन्मभर वाट नक्कीच पाहू शकतो...
     
  10. जेव्हढं घट्ट नातं, तेव्हढे तीव्र मानापमान... परक्या माणसाला आपलं प्रेमही देणं लागत नाही तसंच रागही...
    - व. पु. काळे
     
  11. एकवेळ बुद्धिमान व्यक्तीशी स्पर्धा केली तर चालेल पण मूर्खांशी मैत्री नको...
    - स्वामी विवेकानंद
     
  12. पुरुषांना पण व्यथा असतात... त्यांना त्यांच्यावर उत्कटतेने प्रेम करणारी व्यक्ती कायम हवी असते.. उडून जाणार अत्तर त्यांना पटत नाही...
    - व. पु. काळे
     
  13. या जागात काय म्हटलंय यापेक्षा कोणी म्हटलंय यालाच जास्त महत्व आहे हे मला आता कळून चुकलं आहे...
    - पु. ल. देशपांडे (असा मी असामी)
     
  14. धनाच्या जोरावर तुम्ही पदवीसाठी(Degree) प्रवेश घेऊ शकता, थोड्या फार प्रयत्नाने पदवीही(Degree) मिळवू शकता पण विचार करण्याची आणि ते मिळालेले ज्ञान वापरण्याची ताकद उपजतच असावी लागते किंवा मेहनतीने मिळवावी लागते.
     
  15. प्रश्न पडणे आणि त्यांची योग्य ती उत्तरं मिळवण्याची धडपड करणे हे "बुद्धी" असण्याची निशाणी आहे.
     
  16. घड्याळाचे काटे आणि समुद्राच्या लाटा कधीच कोणासाठीही थांबत नाहीत.
     
  17. गैरसमज हा कॅन्सर सारखा असतो... तिसऱ्या अवस्थेला पोहोचल्यावर तो आपलं स्वरूप प्रकट करतो...
    - व. पु. काळे
    आणि  म्हणूनच त्याचे योग्य निदान प्राथमिक अवस्थेतच केले तर तो पसरतही नाही आणि होणारी हानी पण टाळता येते...
     
  18. आवडत्या व्यक्तीमुळे जर दुःख झालेच तर,
              अ) दुःख महत्वाचे असेल तर व्यक्तीला विसरा.
               ब) व्यक्ती महत्वाची असेल तर दुःखाला विसरा.
     
  19. माफ़ी मागितल्याने माफी मागणारा चुकीचा होत नाही तर नातं टिकवण्याची लायकी त्याच्याकडे जास्त आहे हेच सिद्ध होतं...
     
  20. एकदा का आपण समोरच्याला चुकीचं मानलं कि आपल्या चुकांकडे आपण दुर्लक्ष करतो किंबहूना आपलं काही चुकलंच नाही अशी आपली धारणा होते.
     
  21. खूप नशीबवान असतात ती लोकं ज्यांच्या जीवनात त्यांना समर्पित असलेली आपली माणसं मिळतात...
     
  22. ज्या व्यक्तीच्या जीवनात आपल्याला अजिबात स्थान किंवा किंमत नसते त्या व्यक्तीचा विचार करत राहण्यानेच खरं तर आपल्याला जास्त त्रास होतो... थोडंसं कटू पण शाश्वत सत्य...!!!
     
  23. Show respect even to people who don't deserve it, not as a reflection of their character, but, a reflection of yours.
     
  24. आपल्या मनातील भावना समोरच्या व्यक्तीपेक्षा त्या व्यक्तीशी आपल्या असलेल्या नात्याबद्दल असतात असे माझे प्रामाणिक मत आहे...
     
  25. Home is not Home without Dad and Mom.
     
  26. Never forget who was there for you, when no one else was.
     
  27. No one is busy in this world. It's all about Priorities.
     
  28. बोलून दुखावण्यापेक्षा अबोला धरण्याने माणूस जास्त खच्ची होतो.
    - व. पु. काळे
     
  29. शब्द हे मानवाने वापरलेले सर्वात परिणामकारक औषध आहे...
    Words are, of course, the most powerful drug used by mankind.
    - Rudyard Kipling
     
  30. जीवनात काही दिवस मागे जाऊन काही गोष्टी ठीक करता आल्या असत्या तर किती बरं झालं असत नाही...?
     
  31. Distance doesn't matter, when roots of your relationship are strong enough.
     
  32. जुन्या काय आणि नव्या काय, घड्याळ्याच्या तबकड्या आणि पट्टे बदलतात... सुखाने टळलेली दुपार पाहायला तबकडी आणि पट्टे करायचेत काय...?
    घड्याळाचं काय आणि माणसाचं काय, आतलं तोल सांभाळणार चाक नीट राहिलं कि फार पुढेही जाण्याची भीती नाही नि फार मागेही पडण्याची भीती नाही...
    - पु. ल. देशपांडे (असा मी असामी)
     
  33. If someone trusts you blindly, don't prove them blind.
     
  34. परमेश्वरावर विश्वास ठेवा... त्यामुळे कधीही कोणत्याही गोष्टीसाठी हट्ट करू नका... त्या परमशक्तीचे आपल्याबद्दलचे प्रेम पण अजब असते कि ती गोष्ट आपल्याला मिळतेच... पण आपल्या कधी नशिबातच नसलेल्या गोष्टीला मिळवून पुढे कदाचित आपल्यालाच पश्चाताप वाटतो...
    Trust Almighty... So, don't ask for "forced" favor from Almighty... Because, affection from Almighty towards us can favor for anything... But, we will may regret for such "not happening" favor...
     
  35. शिका, संघटित व्हा, संघर्ष करा...
    - स्वामी विवेकानंद
     
  36. आता थोरा-मोठयांप्रमाणे माझ्या फार अशा काही मोठ्या महत्वकांक्षा नसल्या तरी अनेक वर्षांपूर्वी एका आषाढी का कार्तिकी एकादशीच्या दिवशी जसा मी या जगात आलो तसाच या जगाचा निरोप घेताना जगाला फारसा धक्का न लावता जाण्याची ईच्छा बाळगणारा असा मी एक असामी आहे...
    - पु. ल. देशपांडे (असा मी असामी)
     
  37. Problem with a good book is that, you want to finish the book but, you don't want to finish the book.
     
  38. अभंग म्हणजे कधीही न भंगणारे... अशा या अभंगाच्या "देहाची तिजोरी" ते आत्ताच्या "माऊली माऊली" पर्यंत केवळ चाली बदलल्या... पण भाव आणि आर्तता मात्र तशीच राहिली.. कथा आणि कथाकार बदलले पण गाभा तोच राहिला... शरीर बदलले पण आत्मा तोच राहिला... आणि म्हणूनच अभंग हे नाव सार्थ आहे...
     
  39. May be if we tell people, the brain is an app, then, they will start using it.
     
  40. नात्यांचे धागे जर गरजेचे असतील तर टिकणार नाहीत आणि प्रेमाचे असतील तर तुटणार नाहीत.
     
  41.   मित्र बनून प्रियकर बनण सोपं असतं...
    प्रियकर बनून नवरा बनणं हे सुद्धा सोप्प असतं...

    कठीण असत ते...

    नवरा बनून प्रियकर राहणं आणि बायकोला मैत्रिणीसारखं समजून घेणं...

    हे जेव्हा आणि ज्याला जमतं त्या नवऱ्याला "सुंदर दिसणाऱ्या मैत्रिणीची"
    आणि बायकोला "समजून घेणाऱ्या मित्राची" गरजच भासत नाही.
     
  42. लागता है आज जिंदगी कुछ खफा है|
    चालीये छोडीये कौनसी पहिली दफा है|
    - गुलज़ार
     
  43. माझ्या चुका मलाच सांगा, लोकांना सांगू नका...  कारण सुधारायचे मला आहे लोकांना नाही...
     
  44. प्रेम सर्वांवर करा पण त्या व्यक्तीवर सर्वात जास्त प्रेम करा ज्याच्या हृदयात तुमच्यासाठी तुमच्यापेक्षा जास्त प्रेम असेल...
     
  45. If you love someone, don't lie, open up, be honest, no secrets...
     
  46. प्रेम करण वाईट नाही, पण केलेलं प्रेम मान्य करण्याची हिम्मत नसणं नक्कीच वाईट आहे...
     
  47. भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे...
    - श्री स्वामी समर्थ
     
  48. वो अफसाना जिसे अंजाम तक लाना न हो मुमकिन,
    उसे एक खूबसूरत मोड देकर छोडना अच्छा|
    - साहिर लुधियानवी (गीत: चलो एक बार फिर से अजनबी बन जाये हम दोनो )
     
  49. जो तुमच्याशी हृदयाने बोलतो त्याच्याशी कधीही डोक्याने बोलू नका...
     
  50. जे प्रेम सत्य स्वीकारू शकत नाही ते खर प्रेमचं नसतं...
     
  51. मनुष्य केवळ सुखात साथ द्यायला जीवनसाथी हुडकत नसतो तर दुःखात पण तो आपली सावली बनून राहील अशी आशा बाळगून असतो...
     
  52. प्रेम, काळजी आणि अविश्वास यांत खूप अस्पष्ट असे अंतर असते. जे हे अंतर ओळखू शकतात ते सुखी होतात.
     
  53. दुःख दूर सारून जर मी स्वतः खंबीर राहू शकलो नाही तर जवळच्या माणसांना कसा आधार देणार?
     
  54. इतरांसमोर रडून तुम्ही तुमच्या चुकांवर पांघरून घालू शकता पण त्याच्या होणाऱ्या परिणामांवर नाही.
     
  55. साहित्य, संगीत किंवा एखादी कला यापैकी कशाचीच आवड नसलेला मनुष्य शेपटी नसलेल्या पशुसमान मानावा. केवळ तो गावात खात नाही हे पशूंचे परम भाग्यच.
    - संस्कृत सुभाषित
     



कविता : पांडुरंग

युगे होती अठ्ठावीस | कर बंद कटेवर |
डोळे मिटे विटेवर | पांडुरंग ||||

वेद शास्त्र | आणिक १८ पुराण |
वर्णिती ते २८ | श्रीरंग ||||

माऊलींचा माय-बाप | नाथाघरी सखा खास |
तुका म्हणे झालो दास | बा विठ्ठल ||||

आधी वसशी पंढरी | मग वैकुंठ नगरी |
पुंडरीक भीमातीरी | श्रीहरी ||||

पायी वारीसी जे येता | मुखदर्शन तुज होता |
धन्य झालो भगवंता | विठूराया ||||


--- जयराज