गुरुवार, २५ मे, २०१७

स्थितःप्रज्ञ

स्थितःप्रज्ञ किंवा स्थितप्रज्ञ कोणाला म्हणावे? स्थितप्रज्ञ व्यक्ती म्हणजे नेमकं काय असा प्रश्न मला नेहमी पडतो. स्थितप्रज्ञ व्यक्तीबद्दल मला नेहमीच आकर्षण कम कुतूहल वाटत आलं आहे. पण अशी व्यक्ती नजरेत मात्र आली नाही. मनुष्याला अज्ञाताचे जास्तच आकर्षण किंवा कुतूहल असते या न्यायाने दिवसें-दिवस माझे हे कुतूहल वाढतच जात आहे. 

आता स्थितप्रज्ञ म्हणजे नक्की काय यावर मी विचार करायला सुरुवात केली ती म्हणजे शब्दाच्या अर्थापासून. "या शब्दात काही दडलंय का?" हे पाहायला. Reading Between the Lines सारखं Meaning from the Word (शब्दांचा स्वतःचा अर्थ) शोधायला सुरुवात केली. 

मुळात स्थितप्रज्ञ हा संस्कृत शब्द (विशेषण) आहे हे मला त्याची फोड केल्यावर (संधी सोडवल्याने) कळाले. "स्थित:" म्हणजे "स्थिर" आणि "प्रज्ञ/प्रज्ञा" म्हणजे "बुद्धी". थोडक्यात, "स्थितप्रज्ञ" म्हणजे "स्थिर बुद्धी"...!!! जर ती स्त्री असेल तर "स्थितप्रज्ञा" असे म्हटले जाते. नामानुसार विशेषण या न्यायाने संस्कृतात पुरुषास "स्थितप्रज्ञ:" आणि स्त्रीस "स्थितप्रज्ञा" असे संबोधले जाते. च. भू. दे. घे. 

आता अशी फोड केली कि कोणाही सामान्य मनुष्याप्रमाणे मी हि लगेच, "जो अबोल आहे, शांत आहे तो स्थितप्रज्ञ" या निष्कर्षाप्रत पोहोचलो. पण लगेच माझ्या "शंकेखोर" मनाने दुसरा प्रश्न केला, "मग असे असेल तर एकलकोंडा आणि स्थितप्रज्ञ यात फरक काय?" संस्कृत मध्ये एकांतवासास "विजनवास" (जनविरहित वास तथा राहणे) असेही म्हटले आहे. 

मग लगेच मनाने दुसरी व्याख्या दिली, "कोणत्याही प्रसंगात स्थिर मनाने, शांत वृत्तीने वागणारा..." पुन्हा प्रश्न, "धीरोदात्त म्हणजे काय मग?"

खरं पाहता, स्थितप्रज्ञ या शब्दातच त्याचे उत्तर दडले आहे. जसे मी आधी सांगितले प्रज्ञा म्हणजे बुद्धी. स्थितप्रज्ञ मध्ये बुद्धीचा समावेश आहे. याचाच अर्थ स्थितप्रज्ञ व्यक्तीला बुद्धी असली पाहिजे. कारण अबोल, शांत तर कोणीही व्यक्ती असू शकते. आता शांत राहायचे कि नाही, एवढं जरी ज्याला कळतं त्यालाही बुद्धी आहे म्हणावी लागेल. नाहीतर काही असतातच, तोंड बंद तोवर संत आणि तोंड उघडताच... असो... 

तर स्थितप्रज्ञ या शब्दाचा मला लागलेला अर्थ असा कि, "कोणत्याही परिस्थितीत स्थिर बुद्धीने, कसलाही पक्षपात न करता, घडणाऱ्या अथवा घडलेल्या घटनांचा वा कृतींचा सर्व बाजूने ,समतोल विचार करणे आणि मग प्रत्यक्ष कृती करणे" आणि जी व्यक्ती हे करू शकते अशी व्यक्तीच स्थितप्रज्ञ  म्हणविली जाते. 

त्यामुळे ज्याला स्वतःचे असे मत, विचारच नाही, आणि जो ते वेळप्रसंगी व्यक्त करू शकत नाही त्याचे अबोल, शांत असणे स्थितप्रज्ञ म्हणण्याच्या योग्यतेचे आहे असे मला वाटत नाही. 

इतिहासात स्थितप्रज्ञ हि उपाधी फार कमी लोकांना मिळाली आहे. उदाहरणच द्यायचं झालं तर प्रभू श्रीरामांचे देता येईल. वयोवृद्ध पित्याच्या आज्ञेवरून शांतपणे स्वतःच्या राज्याभिषेकाची तयारी करणारे प्रभू श्रीराम आणि त्याच दिवशी पित्याचे वचन न मोडले जावे म्हणून वनवास स्वीकारणारे श्रीराम...!!! ना विजयाचा उन्माद ना सर्वपरित्यागाचे दुःख...!!! वनवासात असतानाही सीतामाईच्या सुटकेसाठी वानरसेनेची मदत घेऊन लंकेसारख्या अन् रावणासारख्या बलाढ्य शत्रूशी लढण्याचे साहस "स्थितप्रज्ञ" व्यक्तीच करू शकते. इथे प्रभू श्रीरामांना देव स्वरूपात न पाहता मनुष्य स्वरूपात पहा, म्हणजे या घटनांची व्याप्ती आणि त्यांनी केलेला सामना याची सांगड घालता येईल. कारण एकदा का एखाद्या व्यक्तीस देवपण दिले कि त्याने केलेली कसलीही कृती "चमत्कारा"च्या श्रेणीत जाते आणि आपण मग तो प्रयत्न करण्याच्या शक्यतेतून आपली सहज सुटका करून घेतो. 

आजच्या काळात आपल्याला प्रभू श्रीरामांप्रमाणे अचाट साहस करायचे नसले तरी केवळ स्थितप्रज्ञ होण्याचा प्रयत्न करायचा असेल तर एखादी कृती आपल्याकडून वा दुसऱयांकडून झाली तर इतकंच करायचं, "आपण जर त्याच्या जागी असतो तर काय केलं असतं?" किंवा एखादी कृती कितपत चूक वा बरोबर हे ठरविण्यापेक्षा "काय केल्याने समोरच्यास व्यवस्थित परिस्थितीचे आकलन होईल?"  याचा विचार एकदा तरी अवश्य करायचा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आधी त्या व्यक्तीची पूर्ण गोष्ट ऐकून घ्यायची किंवा घडत असलेल्या घटनांची, हार न मानता, पूर्णपणे शहनिशा करायची. हे सारं तेव्हाच शक्य होईल जेव्हा आपलं मन, बुद्धी स्थिर असेल, आपणांस मनुष्याची, त्याच्या भावनांची जाणीव असेल, आपल्यात अहंभावाची कमी असेल आणि मीही  चुकू शकतो/ते ही जाणीव असेल. तसेच जर कोणी याच भावनेने आपल्या पुढे नमत घेत असेल, तर तो आपल्या अहंभावाचा विजय न मानता त्या नम्रतेचे तितक्याच नम्रतेने स्वागत करून आपल्याही मनाचा मोठेपणा दाखवून द्यायचा. अर्थात, हे सगळ्यांना जमेलच असे नाही, कारण मनाचा मोठेपणा उसना आणता येत नाही, तो जर असेल तर दिसून येतोच. 

कठीण प्रसंगात नेहमी आपण आपल्याला अनुकूल असाच निर्णय घेतो. हा दोष नसून मनुष्य स्वभाव-गुण आहे. कारण अशा प्रसंगात मनुष्य मन इतके सैरभैर होऊन जाते कि, त्याला निर्णय घेणे कठीण असते आणि त्यातून इतरांच्या अनुभवाचे गाठोडे आपली "बुडत्याचा पाय खोलात" अशी अवस्था करते. अन् अशा वेळी मन, बुद्धी स्थिर ठेवण्याचे काम खूप कठीण असते. 

भगवद-गीतेत स्थितप्रज्ञ मुनींचे लक्षण सांगणारा फार सुंदर श्लोक आहे,

दुःखेश्वनुद्विग्नमना:, सुखेषु विगतस्पृहः ।
वीतरागभयक्रोध:, स्थितधीर्मुनिरुच्यते ।।

अर्थात, दुःखामुळे जो उद्विग्न होत नाही अन् केवळ सुखाच्या मागे लागत नाही (किंवा सुखाने हुरळूनही जात नाही). जो ओढ, भय, क्रोध रहित आहे, असा स्थिर बुद्धीचा (स्थित-धी) मुनी, साधू जाणावा. 

स्थितप्रज्ञ होणे एक व्रत आहे. जमण्यास कठीण असे, पण जमल्यास अध्यात्मिक चैतन्य देणारे...!!! मनुष्यातील बुद्धीचा, विचार करण्याच्या शक्तीचा वापर करून अहंभाव लयास नेणारे आणि भौतिक (सत्ता, संपत्ती, खानदान) सौख्य नसून आंतरिक चैतन्य, आनंद देणारे...!!! 

इथे क्रोध न येणे म्हणजे चुकीच्या, अन्यायाच्या ठिकाणी "मूग गिळून गप्प" राहणे असे नव्हे. पण आपली चूक असतानाही, माझंच खरं ठरविण्यासाठी, आपण जो कधी-कधी राग दाखवतो किंवा, छोट्या-छोट्या गोष्टीत, क्षणा-क्षणाला आपणास जो राग येतो तो ताब्यात ठेवणे. कारण राग येणे जर स्थितप्रज्ञ नसण्याचे लक्षण असते तर महादेव कधीच स्थितप्रज्ञ गणले गेले नसते. माझ्या मतानुसार तर सांब सदाशिव आणि माता पार्वती यांसारखे स्थितप्रज्ञ असण्याचे दुसरे श्रेष्ठ उदाहरण नाही. भक्तीने सर्वात लवकर प्रसन्न होणारे आणि भक्त रक्षण्यास, अन्यायाविरुद्ध क्रोधाची परिसीमा गाठणारे शंभू आणि विना अलंकार, निरंकार मनाने महादेवाची भावोत्कटपणे, विनातक्रार सेवा करणाऱ्या माता पार्वती...!!! संपत्तीमागे धावणाऱ्या, उच्च-नीच भेदभाव करणाऱ्या, अहंभाव जपणाऱ्या आणि अशा गोष्टींचा वृथा अभिमान बाळगणाऱ्या लोकांस स्थितप्रज्ञ होणे जमू शकेल? 

शेवट करताना इतकंच म्हणेन कि, आपल्याला साधू, मुनीं सारखे जरी स्थितप्रज्ञ बनायचे नसले तरी, एक चांगला "माणूस" बनण्यासाठी, माणुसकीच्या नात्याने, आत्मिक समाधान, चैतन्याप्रती दुसर्याचा विचार करण्यास सुरुवात केली पाहिजे, असे मला वाटते. 

मी काही "स्थितप्रज्ञ" नाही, त्यामुळे हे जे मी काही अधिकाराने विचार मांडले, लिहिलेत, ते केवळ मला ही दिशा मिळाली आहे आणि ती तुम्हा सर्वांसोबत "शेअर" करावीशी वाटली म्हणून...!!! त्यामुळे, माझे काही चुकलेले आढळल्यास, "माझा विचार करून", माफ करा आणि चूक सुधारण्यास मदत करा...!!!

हम है राही प्यार के, हम से कुछ ना बोलिये ।
जो भी प्यार से मिला, हम उसी के हो लिये ।।

दर्द भी हमे कबूल, चैन भी हमे कबूल ।
हमने हर तरह के फूल, हार में पिरो लिये ।।


बुधवार, १७ मे, २०१७

आशेचा किरण

कधी कधी जीवनात अशीही एक वेळ येते जेव्हा आपण खूप खचून जातो. आपली चूक काय हे जरी आपण जाणत असलो वा नसलो, ती चूक किती मोठी आणि त्याची कारणं काय तसेच ती चूक नसून तो एक भावनांचा फुटलेला बांध होता किंवा पूर्वी आपल्या सोबत घडलेल्या कृतींची केवळ एक प्रतिक्रिया होती, हे जर आपण कोणाला सांगू शकत नसलो, तर मग "तोंड दाबून बुक्यांचा मार खात" आपले मन, जीवन निराशेच्या आहारी जाते आणि जसे व. पु. म्हणतात, "मन उदास असलं म्हणजे सोयीतल्या उणीवाच जास्त बोचायला लागतात" तशी काहीशी मनाची अवस्था होते. 

अशा वेळेस खरं तर मनुष्य आधाराची जागा शोधू लागतो. भावनेचा आधार, मानसिक शांती मिळविण्यासाठी धडपड करू लागतो. काही लोक त्या बाबतीत खूप भाग्यवान असतात. त्यांना या गोष्टी सहज उपलब्ध होतात. कधी आपल्या मित्रांमार्फत किंवा नातेवाईकांमार्फत... इथे, भाग्यवान असण्यात, चूक कोणाची हा मुद्दा नसतो. केवळ त्यांना सहजगत्या आधार मिळून जातो इतकंच. पण सर्वच जण अशी भाग्यवान नसतात आणि खासकरून जी भावनाप्रधान लोकं असतात त्यांच्या बाबतीत, का कोणास ठाऊक पण, नेमका विपरीत अनुभव येतो. ते म्हणतात ना, "तहानलेल्या पाणी न मिळो, हा नियतीचा आवडता असे खेळ", तसेच काहीसे...!!! 

भावनाप्रधान व्यक्तींच्या भावना जितक्या ठळकपणे दिसून येतात तितकेच त्यांना आपल्या दुखावलेल्या भावना लपविणे खूप अवघड जाते. कित्येकदा अनेक भावनाप्रधान व्यक्ती आपल्या भावना उघडपणे व्यक्त करायला लाजतात किंवा करु नाही शकत. पण दुखावलेल्या भावना लपविणे त्यांना कठीणच जाते. 

येथे भावनाप्रधान व्यक्ती म्हणजे जिच्या डोळ्यात चटकन पाणी येते किंवा जी रडते असे न घ्यावे. मुळात, जी व्यक्ती रडते ती भावनाप्रधान असते असे म्हणणे चुकीचे ठरेल, असे मला वाटते. सर्वांसमक्ष रडणे हे अपराधीपणाचे द्योतक आहे, असे माझे स्पष्ट मत आहे. मोठ-मोठे अपराधी गुन्हा पकडला गेला कि धाय मोकलून रडतात ते काय भावनिक होऊन? त्यांनी केलेला अपराध अन् त्यापेक्षा तो पकडला गेला हि भावना त्यांना धाय मोकलून रडवते. 

भावनाप्रधान व्यक्ती अशी असते जिच्या डोळ्यात चटकन पाणी तर येतेच पण ती व्यक्ती ते पाणी सर्वांसमक्ष शिताफीने लपविण्याचा प्रयत्न करते आणि जेव्हा एकांत मिळतो त्यावेळेस त्या साचलेल्या भावना अश्रूंच्या रूपात बाहेर काढते. कोणाच्याही नकळत...!!! 

पण आज-काल खोट्याचा इतका बोलबाला झाला आहे कि, एखाद्याने रडून काही सांगितले कि त्या व्यक्तीचे खोटे पण आपणांस खरे वाटू लागते अन् त्याचाच फायदा काही खोटारड्या व्यक्ती घेतात आणि आपली कशी चूक नाही किंवा आपण किती स्वच्छ आहोत, हे भासविण्याचा, थोडक्यात चूक असूनही कातडी बचाऊपणा करण्याचा, प्रयत्न करतात. "चमडी बचाओ" व्यक्तींसाठी तर सर्वांपुढे धाय मोकलून रडण्यापेक्षा साधा अन् सोपा दुसरा प्रभावी उपाय नाही. जाऊ दे, तो आपला इथला मुद्दा नाही. 

अशा भावनाप्रधान व्यक्ती आपले दुःखी मन एखाद्या छंदात, कामात लावून ते दुःख विसरण्याचा प्रयत्न करत राहतात. पण जसे माझ्या प्रत्येक लिखाणातून व्यक्त होते कि नशीब, खोटी माणसं आपली चाल कशीही खेळू देत, पण शेवटी परमेश्वरापुढे त्या साऱ्या चाली व्यर्थ ठरतात. अन् मग अशा व्यक्तींच्या जीवनात अनपेक्षितपणे एखादी अशी व्यक्ती येते जी त्यांना समजून तर घेतेच आणि त्यांचे जीवन नाट्यमयरित्या कलाटणी घेते. गरज नाही कि ती व्यक्ती जवळचीच कोणी असावी. कदाचित एखादी अनोळखी व्यक्तीही असू शकते, जी अशा प्रसंगाने आयुष्यात येते अन् आयुष्याचा भाग बनून जाते. काहींना हा नशिबाचा खेळ वाटतो पण मी नशिबाला परमेश्वराचा अधिकारी या रूपात पाहतो. म्हणजे परमेश्वर राजा आणि नशीब अधिकारी. राजा आज्ञा देणार. नशीब ऐकणार. कधी कधी नशिबाला आपला क्रूर अधिकार वापरायची, तहानलेल्या पाणी न मिळो सारखी, हुक्की येते पण राजाज्ञेपुढे काही चालत नाही. 

ती व्यक्ती त्या भावना केवळ समजूनच घेते असं नाही तर त्यांचा आदर करते, ज्याची त्या भावनाप्रधान व्यक्तीस अतिशय गरज असते. कारण ती व्यक्ती अशा वेळेस जीवनात येऊन आपला हात पकडते जेव्हा आपण साऱ्या आशा सोडून दिलेल्या असतात. आपल्या चूका, गतकाळ याच्याशी काही घेणं-देणं न ठेवता ती व्यक्ती केवळ आपले मोडलेले मन पाहते आणि ते सावरायला आपल्याला मनापासून मदत करते. यात त्या व्यक्तीचा स्वार्थ किती असतो हा वेगळा मुद्दा. पण जी भावनेची उभारी, आशेची एक किरण आपल्या हताश मनाला मिळते ती खूप वेगळी आणि महत्वाची असते. 

फार जुनी गोष्ट आहे. एक मनुष्य आपल्या व्यापारात तोटा झाला म्हणून आत्महत्या करायला म्हणून जातो. पण त्या कड्या जवळ त्याला दुसरा एक माणूस दिसतो आणि तो त्याला आत्महत्या करण्यापासून रोखतो आणि त्याला स्वतःची ओळख देताना म्हणतो, "मी बेंजामिन फ्रँकलिन (एक जुने जगप्रसिद्ध उद्योगपती) आहे आणि हा $१,००,००,००० (एक कोटी डॉलर्स) चा चेक घे आणि तुझा तोटा व कर्ज भरून काढ...!!!" तो मनुष्य या घटनेने खूप प्रभावित होतो आणि लगेच चेक वटवण्याऐवजी तो चेक तो भविष्यकाळासाठी ठेव म्हणून ठेवतो. "काही झालं तरी हा चेक आहे मदतीला" या एका "आशे"वर तो खूप जोमाने कामाला लागतो. सरतेशेवटी, त्याचे सारे कर्ज फिटून व्यापार पुन्हा भरभराटीला येतो. या आनंदात तो पुन्हा त्याच ठिकाणी बेंजामिन फ्रँकलिन यांना त्यांचा चेक परत देऊन धन्यवाद म्हणण्यासाठी जातो. त्याला ते तेथेच भेटतात. त्यांना तो चेक परत करणार इतक्यात एक वेड्यांच्या इस्पितळातील नर्स तेथे येते आणि त्याला म्हणते, "अहो हा एक वेडा आहे, आणि रोज इथे येऊन तो सर्वांना सांगत असतो कि मी बेंजामिन फ्रँकलिन आहे...!!!" 

अशी हि आशेची गोष्ट...!!! जर एखादी खोटी आशा इतकं मोठं काम करू शकते तर विचार करा, खऱ्या आशेचे काय मोल...!!!

शेवट करताना इतकेच म्हणेन,

आज गुमनाम हूँ, तो फासला रखा है मुझ से । 
कल मशहूर हो जाऊँ तो, कोई रिश्ता न निकाल लेना ।।

एखाद्यासाठी आशेचा किरण बना, निराशेचे कारण नको...!!!

आशेचा किरण बनून माझ्या जीवनात आलेल्या खास व्यक्तींप्रती कृतज्ञपणे समर्पित...!!!



मंगळवार, १६ मे, २०१७

गीत : एक आवडते गाणे : छूँ कर मेरे मन को

छूँ कर मेरे मन को, किया तूने क्या इशारा?
बदला ये मौसम, लगे प्यारा जग सारा ।।

तू जो कहे जीवनभर, तेरे लिये में गाऊँ,
तेरे लिये में गाऊँ।
गीत तेरे बोलों पे, लिखता चला जाऊँ,
लिखता चला जाऊँ।
मेरे गितों में, तुझे ढूँढे जग सारा ।।
छूँ कर... 

आजा तेरा आँचल ये, प्यार से में भर दूँ,
प्यार से में भर दूँ।
खुशियाँ जहाँ भर कि, तुझको नज़र कर दूँ,
तुझको नज़र कर दूँ।
तू ही मेरा जीवन, तुही जिने का सहारा।।

छूँ कर मेरे मन को, किया तूने क्या इशारा?
बदला ये मौसम, लगे प्यारा जग सारा ।।


गीतकार     : आनंद बक्षी 
संगीतकार  : राजेश रोशन 
गायक       : किशोर कुमार 
चित्रपट      : याराना 



गुरुवार, ११ मे, २०१७

कविता : तू

माझी तळमळ अन्, एकांतात रडणं,
देवासही माझ्या, न जाहले सहन ।
बहरले त्याने, पुनःश्च माझे जीवन,
"तुज"रुपी साथीचे, मज देऊन आंदण ।।१।।

नव्हतो निराश पण, थोडासा हताश,
अंधारात चाचपडत, शोधीत होतो प्रकाश ।
सभोवताली सृष्टीही, वाटत होती उदास,
"तुझ्या" आगमने झाला, वैशाखही श्रावणमास ।।२।।

न होती आशा, अशाही क्षणांची,
अपूर्णतेतून पुन्हा, पुर्णत्वाकडे जाण्याची ।
ओढ लावलीस "तू", पुन्हा एकदा जगण्याची,
आशा जागवलीस "तू", आयुष्य फुलण्याची ।।३।।

जैसा एकला सहस्त्रकरू, आणी चैतन्य जगास,
त्या चैतन्याप्रत "तुझा", मज जीवनात सहवास ।
वठलेला वृक्ष जसा, माझे जीवन भकास,
केले चंदन तयाचे "तू", आणुनी तयांत सुवास ।।४।।

"तुझे" मानावे उपकार, परी नसे "तू" परकी,
"तुझ्या" वाणीहून आहे, "तुझी" नजर बोलकी ।
मी ओसाड वाळवंट, "तू" गार पाण्याची मडकी,
"तू" झालीस विश्व माझे, घेईन तुजभोवतीच गिरकी ।।५।।

---- जयराज 


मंगळवार, ९ मे, २०१७

कवीची प्रतिभा

या पोस्टमध्ये आपण "कवीची प्रतिभा" हे एका गोष्टीवरून  समजून घेऊ. 

फार वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. राजा विक्रमादित्य हा कवींचा मोठा प्रशंसक म्हणून ओळखला जात असे. त्याच्या दरबारी अनेक कवी तर होतेच पण देश-विदेशातून येणाऱ्या कवींचाही तो मोठे मानधन देऊन आदर-सत्कार करत असे. त्यामुळे त्याच्या दरबारात नेहमीच कवी आपली कविता घेऊन येत असत आणि बक्षिस घेऊन परतत असत. 

अशीच विक्रमादित्य राजाची ख्याती ऐकून एका गावातील ४ मित्रांनी कविता रचून बक्षिस मिळवायचे ठरवले. ते काही निष्णात कवी नसल्याने त्यांना लगेच कविता काही स्फुरली नाही. "मग निसर्गाच्या सहवासात कवीची प्रतिभा जागृत होते", असा विचार करून त्यांनी वन-विहाराला जायचे ठरवले. जेवणाची शिदोरी सोबत घेऊन ते गावाजवळील एका सरोवराजवळ गेले आणि गप्पा मारत जांभळाच्या झाडाखाली बसून वन-भोजन करू लागले. 

बहरलेले जाम्भळाचे झाड...!!! त्याची गर्द सावली आणि पिकलेली जांभळे झाडावरून खाली सरोवरात पडत असलेली पाहून त्यातल्या पहिल्या मित्राला एक ओळ सुचली,

"जम्बफुलानी पक्वानी"
(जांभळे पिकली आहेत.)

त्याला जोडून दुसरा म्हणाला, 

"पतन्ति विमले जले",
(सरोवराच्या पाण्यात पडतही आहेत.)

तिसराही उत्साहाने पुढे बोलला,

"तानी मत्स्या: न खादन्ति"
(पण त्यांना मासे खात नाहीत.)

आता चौथ्याची वेळ होती,

"जलमध्ये डुबुक डुबुक"
(पाण्यात केवळ डुबुक डुबुक असा आवाज येतो.)

अशा प्रकारे एक श्लोक तयार केल्याच्या आनंदात त्यांनी एकमेकांचे अभिनंदन केले आणि विक्रमादित्य राजाच्या दरबाराकडे जायला निघाले.

ते चौघे एकदाचे राजाच्या दरबारात पोहोचले आणि त्यांनी तेथील रक्षकास त्यांच्या येण्याचे प्रयोजन कथन केले. त्या रक्षकाने त्यांना तात्काळ राजासमोर उभे केले. राजासमोर त्यांनी एकदाचा तो श्लोक म्हणून दाखविला,

जम्बफुलानी पक्वानी ।
पतन्ति विमले जले ।।
तानी मत्स्या: न खादन्ति ।
जलमध्ये डुबुक डुबुक ।।

आता राजा विक्रमादित्य कवींचा प्रशंसक असला तरी मूर्ख नक्कीच नव्हता. त्याला हा श्लोक फारसा काही पटला नाही. पण त्याने तसे लगेच न बोलून दाखवता, त्यांना पुन्हा एकदा त्या श्लोकावर विचार करावयास सांगितले. 

ते चारही मित्र विचारात पडले. त्यांना काही सुचेही ना अन् कुठे चुकले कळेही ना...!!! मग त्यांना दरबारातील कोणीतरी राजकवींपाशी जाण्याचे सुचविले. त्यांचे म्हणणे ऐकून ते चौघे राजकवींपाशी गेले आणि त्यांनी क्रमा-क्रमाने पुन्हा तो श्लोक म्हणायला सुरुवात केली,

जम्बफुलानी पक्वानी ।
पतन्ति विमले जले ।।
तानी मत्स्या: न खादन्ति ।

तिसऱ्या मित्राने हि तिसरी ओळ म्हणताच राजकवींनी चौथी ओळ सुचविली,

जालगोलशन्कया: ।।
(मासे पकडण्याचा गळ असल्याच्या शंकेने)

चारही मित्रांना ती ओळ आवडली आणि ते पुन्हा हा सुधारित श्लोक घेऊन राजासमोर उभे राहिले आणि त्यांनी तो श्लोक राजाला पुन्हा म्हणून दाखवला. 

जम्बफुलानी पक्वानी ।
पतन्ति विमले जले ।।
तानी मत्स्या: न खादन्ति ।
जालगोलशन्कया: ।।

राजा तो श्लोक ऐकून भयंकर खुश झाला. त्याने त्या चौघांचा यथोचित सन्मान केला आणि शेवटी त्यांना विचारले, "या चौथ्या ओळीतून कवीची खरी प्रतिभा कळून येते. हि चौथी ओळ तुम्हाला कशी सुचली?" सन्मान आणि सत्काराने भारावून गेलेले ते चौघे त्यावेळी सत्य वदून गेले कि, "हि ओळ आमची नसून आपल्या राजकवींनी सुचवली आहे." राजा हे ऐकून आणखीनच प्रसन्न झाला आणि त्याने आपल्या राजकविंचाही सत्कार केला. 

आता इतकी प्रतिभाशाली ओळ सुचविणारा कवी कोण असा जर तुम्हांला प्रश्न पडला असेल तर ते होते अभिज्ञान शाकुन्तलम, मेघदूतम सारखे महाकाव्य लिहिणारे महाकवी कालिदास...!!!

आज-काल कविता करणाऱ्यास कवी म्हटले जाते. त्याला माझा विरोध नाहीये. तसा माझा कशालाच विरोध नाहीये. मागची दोन्ही वाक्य (विरोध वाली) मी पु. लं. च्या असा मी असामी मधून चोरली आहेत. कारण पु. लं. नीच आम्हांला तसं "परमिट" दिलेलं आहे. पुन्हा असा मी असामी. कोणी कोणाला कवी म्हणावं, किंवा स्वत: कवी म्हणवून घ्यावं हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न किंवा बाब आहे. त्यावर मी काही टिप्पणी करणार नाही. पण मी या ब्लॉग (Blog) वर मी केलेल्या कविता टाकतोय म्हणून मी हि कवी झालो असे मात्र नाही, याची मला पूर्ण जाणीव आहे. माझ्या आहेत त्या केवळ भावना...!!! थोड्याशा पाहिलेल्या...!!! थोड्याशा अनुभवलेल्या...!!! अशा काहीशा...!!! आणि त्या भावना मी व्यक्त केल्या कारण कवी मेश्राम आपल्या "ऋणाईत" कवितेत म्हणतात, 

चिकचिक माती, रपरप पाय, 
ठणकणारी जखम जशी ।
असेच होते मन, 
अन शब्दच होतात सहप्रवासी ।।

असे हे "माझे शब्दच" माझे सखे आहेत. माझ्या जीवनात कोणत्याही घटना घडोत, त्यांनी माझी साथ कधीही सोडली नाही. एकवेळ माझी जीभ अडखळली असेल पण मनात शब्दांचा अविरत पूर होताच. 

अशा प्रकारे शब्दांचा "ऋणाईत" होऊन आणि साऱ्या प्रतिभावान कवींना तसेच सर्व शब्दांची जननी, प्रतिभेचे मूळ स्वरूप अशा सरस्वती मातेला नमन करून या पोस्टपुरता थांबतो. नेहमीप्रमाणे, चू. भू. दे. घे. 


सोमवार, १ मे, २०१७

कविता : विश्वासघात

कोठे विश्वासघात होताना पाहतो,
मी न मग माझा राहतो ।
विसरुन सारे भान,
संताप तांडव नाचतो ।।१।।

का करावा कोणी,
विश्वासाने विश्वासघात? ।
नसेल मनात प्रेम वा काही,
उघडपणे सोडावी ना साथ ।।२।।

विश्वास शब्द छोटा,
प्राप्तिच्या अनेक वाटा ।
हलकाच जाता तडा,
काट्याचा होतो नायटा ।।३।।

कमविण्यास लागतो काळ,
टिकविण्यास त्याहून फार ।
गमविण्यास लागतो क्षण,
पार मोडून जाते मन ।।४।।

अग्निदिव्यातून प्रकटतो विश्वास,
आपलेच होती तयाने खास ।
नसेल जमत देणे विश्वास,
नकात करु विश्वासघात ।।५।।

---- जयराज