मंगळवार, ९ मे, २०१७

कवीची प्रतिभा

या पोस्टमध्ये आपण "कवीची प्रतिभा" हे एका गोष्टीवरून  समजून घेऊ. 

फार वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. राजा विक्रमादित्य हा कवींचा मोठा प्रशंसक म्हणून ओळखला जात असे. त्याच्या दरबारी अनेक कवी तर होतेच पण देश-विदेशातून येणाऱ्या कवींचाही तो मोठे मानधन देऊन आदर-सत्कार करत असे. त्यामुळे त्याच्या दरबारात नेहमीच कवी आपली कविता घेऊन येत असत आणि बक्षिस घेऊन परतत असत. 

अशीच विक्रमादित्य राजाची ख्याती ऐकून एका गावातील ४ मित्रांनी कविता रचून बक्षिस मिळवायचे ठरवले. ते काही निष्णात कवी नसल्याने त्यांना लगेच कविता काही स्फुरली नाही. "मग निसर्गाच्या सहवासात कवीची प्रतिभा जागृत होते", असा विचार करून त्यांनी वन-विहाराला जायचे ठरवले. जेवणाची शिदोरी सोबत घेऊन ते गावाजवळील एका सरोवराजवळ गेले आणि गप्पा मारत जांभळाच्या झाडाखाली बसून वन-भोजन करू लागले. 

बहरलेले जाम्भळाचे झाड...!!! त्याची गर्द सावली आणि पिकलेली जांभळे झाडावरून खाली सरोवरात पडत असलेली पाहून त्यातल्या पहिल्या मित्राला एक ओळ सुचली,

"जम्बफुलानी पक्वानी"
(जांभळे पिकली आहेत.)

त्याला जोडून दुसरा म्हणाला, 

"पतन्ति विमले जले",
(सरोवराच्या पाण्यात पडतही आहेत.)

तिसराही उत्साहाने पुढे बोलला,

"तानी मत्स्या: न खादन्ति"
(पण त्यांना मासे खात नाहीत.)

आता चौथ्याची वेळ होती,

"जलमध्ये डुबुक डुबुक"
(पाण्यात केवळ डुबुक डुबुक असा आवाज येतो.)

अशा प्रकारे एक श्लोक तयार केल्याच्या आनंदात त्यांनी एकमेकांचे अभिनंदन केले आणि विक्रमादित्य राजाच्या दरबाराकडे जायला निघाले.

ते चौघे एकदाचे राजाच्या दरबारात पोहोचले आणि त्यांनी तेथील रक्षकास त्यांच्या येण्याचे प्रयोजन कथन केले. त्या रक्षकाने त्यांना तात्काळ राजासमोर उभे केले. राजासमोर त्यांनी एकदाचा तो श्लोक म्हणून दाखविला,

जम्बफुलानी पक्वानी ।
पतन्ति विमले जले ।।
तानी मत्स्या: न खादन्ति ।
जलमध्ये डुबुक डुबुक ।।

आता राजा विक्रमादित्य कवींचा प्रशंसक असला तरी मूर्ख नक्कीच नव्हता. त्याला हा श्लोक फारसा काही पटला नाही. पण त्याने तसे लगेच न बोलून दाखवता, त्यांना पुन्हा एकदा त्या श्लोकावर विचार करावयास सांगितले. 

ते चारही मित्र विचारात पडले. त्यांना काही सुचेही ना अन् कुठे चुकले कळेही ना...!!! मग त्यांना दरबारातील कोणीतरी राजकवींपाशी जाण्याचे सुचविले. त्यांचे म्हणणे ऐकून ते चौघे राजकवींपाशी गेले आणि त्यांनी क्रमा-क्रमाने पुन्हा तो श्लोक म्हणायला सुरुवात केली,

जम्बफुलानी पक्वानी ।
पतन्ति विमले जले ।।
तानी मत्स्या: न खादन्ति ।

तिसऱ्या मित्राने हि तिसरी ओळ म्हणताच राजकवींनी चौथी ओळ सुचविली,

जालगोलशन्कया: ।।
(मासे पकडण्याचा गळ असल्याच्या शंकेने)

चारही मित्रांना ती ओळ आवडली आणि ते पुन्हा हा सुधारित श्लोक घेऊन राजासमोर उभे राहिले आणि त्यांनी तो श्लोक राजाला पुन्हा म्हणून दाखवला. 

जम्बफुलानी पक्वानी ।
पतन्ति विमले जले ।।
तानी मत्स्या: न खादन्ति ।
जालगोलशन्कया: ।।

राजा तो श्लोक ऐकून भयंकर खुश झाला. त्याने त्या चौघांचा यथोचित सन्मान केला आणि शेवटी त्यांना विचारले, "या चौथ्या ओळीतून कवीची खरी प्रतिभा कळून येते. हि चौथी ओळ तुम्हाला कशी सुचली?" सन्मान आणि सत्काराने भारावून गेलेले ते चौघे त्यावेळी सत्य वदून गेले कि, "हि ओळ आमची नसून आपल्या राजकवींनी सुचवली आहे." राजा हे ऐकून आणखीनच प्रसन्न झाला आणि त्याने आपल्या राजकविंचाही सत्कार केला. 

आता इतकी प्रतिभाशाली ओळ सुचविणारा कवी कोण असा जर तुम्हांला प्रश्न पडला असेल तर ते होते अभिज्ञान शाकुन्तलम, मेघदूतम सारखे महाकाव्य लिहिणारे महाकवी कालिदास...!!!

आज-काल कविता करणाऱ्यास कवी म्हटले जाते. त्याला माझा विरोध नाहीये. तसा माझा कशालाच विरोध नाहीये. मागची दोन्ही वाक्य (विरोध वाली) मी पु. लं. च्या असा मी असामी मधून चोरली आहेत. कारण पु. लं. नीच आम्हांला तसं "परमिट" दिलेलं आहे. पुन्हा असा मी असामी. कोणी कोणाला कवी म्हणावं, किंवा स्वत: कवी म्हणवून घ्यावं हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न किंवा बाब आहे. त्यावर मी काही टिप्पणी करणार नाही. पण मी या ब्लॉग (Blog) वर मी केलेल्या कविता टाकतोय म्हणून मी हि कवी झालो असे मात्र नाही, याची मला पूर्ण जाणीव आहे. माझ्या आहेत त्या केवळ भावना...!!! थोड्याशा पाहिलेल्या...!!! थोड्याशा अनुभवलेल्या...!!! अशा काहीशा...!!! आणि त्या भावना मी व्यक्त केल्या कारण कवी मेश्राम आपल्या "ऋणाईत" कवितेत म्हणतात, 

चिकचिक माती, रपरप पाय, 
ठणकणारी जखम जशी ।
असेच होते मन, 
अन शब्दच होतात सहप्रवासी ।।

असे हे "माझे शब्दच" माझे सखे आहेत. माझ्या जीवनात कोणत्याही घटना घडोत, त्यांनी माझी साथ कधीही सोडली नाही. एकवेळ माझी जीभ अडखळली असेल पण मनात शब्दांचा अविरत पूर होताच. 

अशा प्रकारे शब्दांचा "ऋणाईत" होऊन आणि साऱ्या प्रतिभावान कवींना तसेच सर्व शब्दांची जननी, प्रतिभेचे मूळ स्वरूप अशा सरस्वती मातेला नमन करून या पोस्टपुरता थांबतो. नेहमीप्रमाणे, चू. भू. दे. घे. 


1 टिप्पणी:

  1. यात केवळ असं सुचवायचं आहे की जम्बफुलानी या शब्दाऐवजी जम्बूफलानि असं असायला हवं होते का? मला शाळेत असं वाचल्याचं आठवतं. पण दहावी पास होऊन पण आता २१ वर्ष झाली आहेत त्यामुळे नक्की नाही सांगता येणार.

    उत्तर द्याहटवा