गुरुवार, ११ मे, २०१७

कविता : तू

माझी तळमळ अन्, एकांतात रडणं,
देवासही माझ्या, न जाहले सहन ।
बहरले त्याने, पुनःश्च माझे जीवन,
"तुज"रुपी साथीचे, मज देऊन आंदण ।।१।।

नव्हतो निराश पण, थोडासा हताश,
अंधारात चाचपडत, शोधीत होतो प्रकाश ।
सभोवताली सृष्टीही, वाटत होती उदास,
"तुझ्या" आगमने झाला, वैशाखही श्रावणमास ।।२।।

न होती आशा, अशाही क्षणांची,
अपूर्णतेतून पुन्हा, पुर्णत्वाकडे जाण्याची ।
ओढ लावलीस "तू", पुन्हा एकदा जगण्याची,
आशा जागवलीस "तू", आयुष्य फुलण्याची ।।३।।

जैसा एकला सहस्त्रकरू, आणी चैतन्य जगास,
त्या चैतन्याप्रत "तुझा", मज जीवनात सहवास ।
वठलेला वृक्ष जसा, माझे जीवन भकास,
केले चंदन तयाचे "तू", आणुनी तयांत सुवास ।।४।।

"तुझे" मानावे उपकार, परी नसे "तू" परकी,
"तुझ्या" वाणीहून आहे, "तुझी" नजर बोलकी ।
मी ओसाड वाळवंट, "तू" गार पाण्याची मडकी,
"तू" झालीस विश्व माझे, घेईन तुजभोवतीच गिरकी ।।५।।

---- जयराज 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा