बुधवार, २६ जुलै, २०१७

पुणे आणि मी : भाग २

पुणे आणि मी : भाग १ वरून पुढे... 

हा (सागर), पक्का पुणेकर अवलिया, CDAC कोर्सच्या वेळी प्रॅक्टिकल्स ला माझ्या बाजूच्या संगणकावर (Computer) बसायचा आणि माझी व याची, त्यावेळी ओळख नसतानाही मला अनेक नावं त्याने ठेवली होती. हेही मला याच पठ्याने नंतर ओळख झाल्यावर सांगितले आणि हद्द म्हणजे नंतरही माझ्या जवळच्या मित्रांसोबत माझ्या नातवा-परतंवडां पर्यंतची नावं याने तयार केलेली आहेत. आता त्याच्याच ती किती लक्षात आहेत, हा भाग निराळा....!!!

आम्ही दोघेही सुरुवातीला एकाच कंपनीत (CDAC) कामाला लागलो. याच्यामुळेच पुण्यात फिरणं मला अगदी सुसह्य झालं... कधीही याच्या घरी गेलो की जेवल्याशिवाय न जाऊ देणारा हा....!!! याच्या घरातील कार्यक्रम असो वा सोसायटीत... अध्यक्षस्थानी हेच...!!! आणि मला निमंत्रण वगैरे सोपस्कार नाहीत.... "हा कार्यक्रम आहे... ये..." डायरेक्ट....!!!

गणेशोत्सवात पेठांमधील रस्ते बंद झाले की गल्ली-बोळांतून नेऊन पुणे दर्शन घडविणारा हाच...!!! ओंकारेश्वरहून सरळ शनिवार पेठेत आणि तिथून थेट शनिवारवाडा.... टिळक रोडकडे जाताना वन वे कुठला... कुठल्या रोडने कधी ट्रॅफिक नसतं... अलका चौकातून किंवा डेक्कनहून सदाशिव पेठेत किंवा स्वारगेटला जाताना गर्दी कशी चुकवायची... लक्ष्मी रोडवर फिरायचं असेल तर गाडी कुठं लावायची, हमखास पार्किंग कुठं मिळेल याची इत्थंभूत माहिती यानेच दिली....

लकडी पुलावरचा, "दुचाकी वाहनांना प्रवेश बंद...!!!" हा फलक (Board) मात्र मीच याला PMT मधून दाखवला. तोवर इतर पुणेकरांप्रमाणे त्यालाही हे ऐकूनच माहिती होते...!!! 

कार चालवत असेल तर फार नाही पण बाईकवर, मग पुढे बसलेला असो वा मागे, स्वारगेट चौकातल्या सिग्नल पाशीही, "ओ काका, असं सरळ निघायचं, म्हणजे सगळ्यांना जागा मिळते" असं बिनधास्त ओरडून, सर्वांना पुणेरी शैलीत वाहतुकीचे नियम सांगणारा हा...!!!

याच्यामुळे पुण्याच्या गल्ल्यांमध्ये मी हरविण्याची शक्यता कमीच...!!!

आमच्यात मतभेद खूपदा होतात. किंबहूना, एखाद्या गोष्टीवर आमचं "लवकर" एकमत होणं फारच दुर्मिळ...!!! मग ते कोणासाठी तरी एखादी भेटवस्तू खरेदी करणं असो वा कार, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय विषयांवरील चर्चा असोत... मतभेद होणारचं...!!! उलट तसं नाही झालं तर आम्हांलाच चुकल्या-चुकल्यासारखं वाटतं. असे जरी असले तरी आमच्यात "मनभेद" अजिबात नाही. आधी भांडून मग, कधी त्याने, कधी मी कमीपणा घेत, वेळ निभावून नेतो. कदाचित, याच विजोड प्रवृत्तीमुळे म्हणा हवं तर, पण आमची मैत्री मस्त टिकून आहे. 

आमची मैत्री अशी,
टिळक-आगरकर जशी...!!!

(टिळक-आगरकरांचे नाव केवळ उदाहरणादाखल... वैचारिक मतभेद असले तरी समान उद्दिष्ट्य आणि निखळ मैत्री हे दर्शविण्यासाठी... )

पुणेकर आणि त्यांचा इरसालपणा, पुणेरी पाट्या हे तर सर्वांसाठी हक्काचे विनोदाचे विषय...!!! त्यातून दुपारी १ ते ४ झोपण्याच्या सवयीचे तर वाजवीपेक्षा जास्तच... चितळ्यांचे दुकान दुपारी १ ते ४ बंद म्हणजे बंदच, असे विनोदाने सांगताना त्यांचा दिवसही पहाटे ३-४ वाजता सुरू होतो, हे कोणी लक्षात घेत नाही... आणि हे खुद्द चितळ्यांच्याच एका मुलाखतीत वाचल्याचे स्मरते... मग आता दुपारी घेतली थोडी विश्रांती तर कुठं बिघडलं...? पुणेकर असले तरी माणसंच आहेत ती...!!! जगात कोल्हापूर, सोलापूर आणि पुण्याचा माणूस, त्याच्या बोलण्याच्या अंदाजावरुन, कुठेही सहज ओळखता येतो...

पुण्याच्या गणेश विसर्जनाच्या मिरवणूकीला मी कधी गेलो नाही, पण, मानाच्या गणपतींसह इतर मंडळाचे देखावे मात्र अनेकदा पाहिले... कित्येक रविवारच्या संध्याकाळ मस्त पर्वतीहून पुण्याचा रम्य देखावा पाहण्यात घालवल्या... कधी मित्रांसमवेत तळजई... कधी जवळपासचे गड-किल्ले... सिंहगड तर अगदी फार्म हाऊस वाटावे इतके वीकेंड घालवले आहेत... छत्रपतींच्या पावनस्पर्शाने पुलकित झालेले किल्ले आजही खूप सुंदर अनुभुती देतात...

काहीच नसलं तरी शुक्रवारच्या संध्याकाळी सातारा रोड येथील "कोल्हापूरी कट्टा" (आता ते हॉटेल बंद तरी झालंय किंवा दुसर्‍या नावाने तरी सुरू आहे) मध्ये जाऊन मस्त चिकन थाळी, तांबडा - पांढरा वरपायचा... अन् शनिवार किंवा रविवारच्या संध्याकाळी सिटी प्राईड, सातारा रोड, मध्ये एखादा चित्रपट...!!!

जगासाठी पुणे हा एक मोठ्या भूभागाचे क्षेत्र असेल, पण, पुण्याचे पुणेरीपण पेठांमध्येच दडले आहे. फार फार तर शिवाजीनगर, जंगली महाराज रस्ता, सातारा रोड, पर्वती आणि आसपासचा प्रदेश आदी यांत सामिल करता येईल... कर्वे रस्ता, कोथरूड या ठिकाणीही मोठ्या संख्येने पुणेकर दिसून येतात... कात्रज, औंध, बाणेर, कोरेगांव पार्क यांना फार तर जुळे पुणे अथवा नवं पुणे म्हणता येईल... विद्यापीठ तर कधी काळी पुण्याहून खूपच दूरचा प्रदेश मानला जात असे, हे आता सांगूनही खोटं वाटेल, इतकं पुणे पसरलं आहे.

पेठांतील रस्ते, त्यावरची होणारी कोंडी, पुण्याच्या बसेस, रिक्षा हे तर ग्रंथ लिहता येईल असे विषय....!!! पण, पेठांतील वाडे, मंडई, विद्यापीठ यांसारख्या जुन्या परंतु डौलदार अन् दिमाखदार वास्तू, हे पुण्याचे खरे वैभव...!!!

ज्ञानोबा माऊली अन् तुकोबारायांचे पुणे...!!! शहाजीराजांच्या बेचिराख झाल्या या प्रांतात पुन्हा नंदनवन फुलविणाऱ्या राष्ट्रमाता जिजाऊंचे पुणे...!!! स्वराज्य संस्थापक, युगप्रवर्तक छत्रपती शिवाजी महाराजांचे पुणे...!!! स्वराज्याची सीमा दिल्ली पर्यंत नेणाऱ्या थोरल्या बाजीरावांचे पुणे...!!! अटकेपार मराठी ध्वज फडकविणाऱ्या रघुनाथराव पेशवे उर्फ राघोभरारींचे पुणे...!!! ब्रिटिशांनाही चळाचळा कापायला लावणाऱ्या लोकमान्य बाळ गंगाधर टिळक आणि स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांचे पुणे...!!! थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले अन् सावित्रीबाई फुलेंचे पुणे...!!! पु. ल. देशपांडे, शांता शेळकेंचं पुणे...!!! विद्येचे माहेरघर अन् महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसा असलेले पुणे...!!! दुचाकी स्वारांचे, पेन्शनरांचे, विद्यार्थांचे अन् आता IT Hub बनू पहात असलेले पुणे...!!! शुध्द मराठी भाषेचे पुणे....!!! पारंपारिक गणेश विसर्जन मिरवणुकीचे पुणे...!!! पुण्याला पुणे म्हणणाऱ्यांचे पुणे...!!!

अशा पुण्याचा पुणेकरांनी जाज्वल्य अभिमान का न बाळगावा...?

पेठांमधील वाड्यांनी आता आपली जागा सोडण्यास सुरुवात केली आहे. पुण्याचे ग्रामदैवत, कसबा गणपती, ज्या मंदिराचा जीर्णोद्धार जिजामाता मासाहेबांनी पुण्यात प्रथम वस्तीस आल्यावर केला, असे सांगितले जाते, त्या आमच्या श्रद्धास्थानाच्या बाजूला मोठी इमारत बांधली जात आहे. त्याच्या आवाजाने त्या दगडी कौलारू मंदिरातील शांतता कमी होत चालली आहे, असे मला वाटते...

हळूहळू का होईना पण पुणे बदलत चाललंय हे मात्र खरं... बदल हा निसर्ग नियमच आहे. या बदलांतही लाल महाल, विश्रामबाग वाडा, केसरी वाडा आदी काही ऐतिहासिक वास्तू आपले अस्तित्व टिकवून आहेत किंवा टिकविण्याचा प्रयत्न करत आहेत...!!! शनिवारवाडा मात्र ब्रिटिश काळात आगीच्या भक्ष्यस्थानी पडला अन् आता त्या भग्नावशेषात केवळ त्याची भव्यता अन् निर्माण केलेल्या हिरवळीतून (बगीचा) त्याच्या सुंदरतेची फक्त कल्पनाच करायची...!!! 

बदल, विकास करत असताना आपला हा सांस्कृतिक अन् ऐतिहासिक ठेवा आपण जतन करायलाच हवा असे एक इतिहास प्रेमी म्हणून मला नेहमीच वाटते.

संपूर्ण भारतावर माझे खूप प्रेम आहे आणि त्यातील माझे जन्मगाव सोलापूर, तुळजापूर, कोल्हापूर, वैष्णौदेवी (कट्रा) आणि पुणे इथं मला कधीच एकटं वाटत नाही... माझ्या घरात असल्यासारखंच वाटतं...

पुण्यावर जितकं बोलावं तितकं कमीच आहे... त्यामुळे आता इथेच थांबतो...!!! राग व्यक्त करताना घडाघडा बाहेर पडणारे शब्द प्रेम व्यक्त करताना थोडेसे अबोल होतात, असंच काहीसं माझं झालं आहे... मनातल्या साऱ्या भावना शब्दांत थोडीच व्यक्त करता येतात? आणि तसंही अखंड बोलत राहण्याचा जन्मसिद्ध अधिकार केवळ पुणेकरांनाच आहे...!!! 

खरंच, पुणे तिथे काय उणे...?

शेवट करताना पु. लं. ची पुण्यावरची कविता लिहितो,

मी राहतो पुण्यात,
मी राहतो पुण्यात
म्हणजे विद्वत्तेच्या ठाण्यात.
इथल्या मंडईचेदेखील विद्यापीठ आहे.
आणि विद्यापीठाची मंडई झाली आहे.
बोलणे हा इथला धर्म आहे
आणि ऐकणे हा दानधर्म आहे.
म्हणून वक्ते उपदेश करतात
आणि श्रोते उपकार करतात.
उपचारांना मात्र जागा नाही. 


पुणे आणि मी : भाग १

सप्तर्षी, सप्तसुर, सप्तरंग, सप्तपदी, सप्तजन्म असा "सात" या आकड्याचा सुप्रभाव आहे. सात हा अंक अशा अनेक कारणांमुळे शुभ मानला जातो. एका अभ्यासाने असेही निरीक्षण नोंदवले आहे की, जर तुमची एखाद्या सोबतची मैत्री ७ वर्षे टिकली, तर ती जन्मभर टिकून राहते. आता तुम्ही म्हणाल, "आज मी ७ या आकड्याबद्दल इतकं का बोलतोय...? पुण्याचा आणि ७ आकड्याचा काय संबंध?"

सांगतो...!!!

पुण्याचा आणि ७ आकड्याचा अर्था-अर्थी काही संबंध नसला तरी आज दिनांक २६ जुलै २०१७ रोजी मला पुण्यात, एकट्याने, येऊन ७ वर्षे पूर्ण झाली. आज असलेली विनायक चतुर्थी हा पण एक सुयोगच म्हणायचा...!!! खरं तर यात, "कुतूहल वाटण्यासारखे काय?" असे अनेकांना वाटेल... पण, यापूर्वी, कोठेही एकट्याने न जाणारा मी ७ वर्षांपूर्वी, सोमवार, २६ जुलै २०१० रोजी, एकट्याने पुण्यात आलो अन् कायमचा इथलाच बनून गेलो...

खरं पाहता, मी पुण्यात कायमचा रहायला १८ आॅगस्ट २०१० रोजी आलो. मग आजची तारीख कशी? सांगतो....!!!

तर, जून २०१० ला मी अभियांत्रिकी (Engineering) शाखेचा पदवीधर झालो अन् भारतातील अनेक बेरोजगार व्यक्तींमध्ये आणखी एकाची भर पडली. त्यानंतर नौकरी शोधण्यापेक्षा एखादा कोर्स करावा जेणेकरून नौकरी लागण्यासाठी फायदा होईल या हिशेबाने मी आणि माझ्या काही मित्रांनी सी-डॅक (C-DAC) चा, ६ महिन्यांचा, कोर्स करायचे ठरविले. त्यासाठी पुण्यातील नामांकित "सनबिम इन्फोटेक" मध्ये मी मुलाखतीसाठी आजच्याच दिवशी आलो.

तशी मुलाखत दुसर्‍या दिवशी, मंगळवार, २७ जुलै २०१० रोजी, होती. पण माझ्या नेहमीच्या सवयीप्रमाणे मी आदल्या दिवशीच पुण्यात दाखल झालो. तसा यापूर्वी एक-दोनदा पुण्यास माझ्या चकरा झाल्या होत्या, पण त्या घरच्यांसोबत...!!! या वेळेस मात्र, "मी एकटाच जाणार", हे घरी निक्षून सांगून आलो होतो. तशी, तेव्हा पुण्याची मला काहीच माहिती नव्हती...!!!

ढगाळ वातावरण... नुकताच पाऊसही पडून गेला होता... जसा रेल्वे स्थानकावर उतरलो तसं ठरवलं, आधी आपल्या आराध्याचे, श्रीगणेशाचे, दर्शन घ्यायचे...!!! बाहेर येऊन एका PMT वाहकाला (कंडक्टर) दगडूशेठ गणपतीला जाणाऱ्या बसबद्दल विचारले. योगायोगाने तिथे उभी बसच तिकडे जाणार होती. त्या बसनेच निघालो. पण ना मला तो थांबा माहीत होता, ना ते मंदिर कुठे आहे ते माहित होते... त्या तुडुंब भरलेल्या बसमध्ये, तिकीट काढताना, बस कंडक्टरलाच त्याबद्दल विचारले आणि मंदिर आल्यावर मला सांगण्याची विनंतीही केली... "इतक्या गर्दीत त्यांच्या हे लक्षात राहिलं का?" ही शंका होतीच... पण सारं काही गजाननावर सोपवून मी त्या गर्दीत उभा राहून जमेल तितकं अन् जमेल तसं पुणे दर्शन करत होतो. मंदिराजवळ आल्यावर त्या सद्गृहस्थ कंडक्टर काकांनी आवाज देऊन मंदिर जवळ आल्याची सूचना दिली...

मंदिरात गेलो... नुकतीच आरती झाली होती... बऱ्यापैकी गर्दी असली तरी आरती झाली असल्याकारणाने पांगापांगीला सुरुवात झाली होती. आत जाऊन गजाननाचे दर्शन घेतले आणि "आता यापुढे तूच माझा सांगाती आहेस...", हे ही त्याला सांगितलं... बराच वेळ मंदिरातच, भान हरपल्यागत, बसून होतो. थोड्या वेळाने शुध्द आली आणि मग पुढे कॉलेजच्या दिशेने निघालो...

दुसऱ्या दिवशी मुलाखत उत्तम झाली आणि त्याच संध्याकाळी माझी निवड झाल्याचेही समजलं... खूप आनंद झाला... त्यानंतर १५ - २० दिवसांनी कोर्स सुरू होणार होता. माझ्या २ मित्रांनाही त्याच कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला आणि आम्ही तिघे १८ आॅगस्ट २०१० रोजी पुण्यात राहण्यास आलो. गुरुवार, १९ ऑगस्ट २०१०, पासून कोर्स सुरू झाला...

ज्या दिवशी मी पहिल्यांदा, म्हणजे २६ जुलै २०१० रोजी, पुण्यात आलो, त्याच दिवशी मी पुण्याचा होऊन गेलो होतो.

काय दिलं नाही पुण्यानं मला...!!!

नौकरीसाठी लागणारं शिक्षण दिलं... पहिली नौकरी मिळवून दिली. तीही विद्वत्तेच्या प्रांगणात... म्हणजे पुणे विद्यापीठात...!!! अगदी मुख्य इमारतीसमोर माझं CDAC चं कार्यालय होतं... CDAC संस्था ही भारत सरकारच्या अखत्यारीत असून ती व्यावसायिक शिक्षण देण्याबरोबरच Software Development चं ही काम करते, हे अनेकांना माहित नाही. ब्रिटिशकालीन ती (विद्यापीठाची मुख्य इमारत) भव्य वास्तू, शिल्पशास्राचा एक अजोड नमुना आहे... करियरच्या सुरुवातीची २ वर्षे मी त्या पवित्र ठिकाणी काढली... पुढेही आणखी काही वर्षे तिथे काढली असती पण काही कारणाने, "करियर Growth व्हावी म्हणून" 😋, मी तिथून निघालो आणि हिंजवडीत 3DPLM, आताची Daasault Systems, मध्ये लागलो तो आजतागायत तिथेच आहे.

पावसाळ्यात, विशेषतः श्रावणात, विद्यापीठाचे निसर्ग-सौंदर्य लाजवाब असते... ते पाहून अभिमानाने म्हणावेसे वाटते, "पुण्यासारखी हिरवळ शोधून सापडणार नाही (निसर्ग-सौंदर्य याच अर्थाने म्हणतोय, गैरसमज टाळावा)."

पुण्यानं, पुण्यात म्हणता यावं असं स्वतःच, हक्काचं घर दिलं... भलेही ते PMC हद्दीत ना का येईना... पण सांगताना पुण्यात घर आहे असं सांगण्यासारखं नक्कीच आहे. पुण्याचं हृदयचं इतकं मोठं आहे की, पिंपरी-चिंचवड, हडपसर महानगरपालिका हद्दीतील लोकं सुध्दा आम्ही पुण्यात राहतो असं अभिमानाने सांगतात, मग माझं घर तर PMC हद्दीला चिटकून आहे. पण माझे मूळचे पुणेकर असलेले मित्र मला, "PMC हद्दीत पण नाही" म्हणून डिवचतात, हि गोष्ट वेगळी...!!! 😃

निखळ मैत्री असणाऱ्या मैत्रिणी दिल्या... मग ती दर राखीपौर्णिमेला न विसरता राखीसाठी घरी बोलावणारी आणि कधी काही कारणास्तव जाणं न झाल्यास, मोठ्या बहिणीगत, रागावणारी एखादी अक्का असो वा सतत अभ्यास करत मलाही अभ्यास करायला प्रोत्साहन देणारी, वेळप्रसंगी धीर देणारी, एखादी विदर्भाची वाघीण असो...!!! सोलापूरकर  म्हणत प्रत्येक नवीन खाद्यपदार्थांचे केवळ फोटो पाठविणारी, पण सर्व सहलींसाठी, मी नाही येणार हे माहीत असलं तरी, हमखास निमंत्रण देणारी एखादी पक्की पुणेकर असो वा माझ्या लांबच लांब चालण्याच्या सवयीवर, "तू पागल है?" असं म्हणत रागमिश्रीत कौतुक करणारी, एखादी सरदारणी टाईप मुलगी असो....!!!

जशा मैत्रिणी तसेच मित्र....!!! मित्र कसले बंधूच...!!! मग तो दूर राजस्थानहून आलेला थोरल्या बंधूगत एखादा मित्र कम् भाऊ आणि वहिनी असो वा माझ्या बुध्दिमत्तेची तारीफ करत मला हरभऱ्याच्या झाडावर चढवणारे विदर्भ, मराठवाडय़ातील मित्र असोत....!!! किंवा आता परदेशात असूनही मैत्रीचे नातं घट्ट टिकविणारा एखादा भाऊच असो...!!!

सर्वसामान्य मनुष्याच्या, छोटंसं का होईना पण स्वतःचं घर, पोटापाण्यासाठी साजेशी नौकरी, आपली म्हणता येतील अशी जवळ असणारी माणसं, यांपेक्षा वेगळ्या अपेक्षा तरी काय असतात म्हणा...?

या सर्वांची नावं देणे येथे खरंच शक्य नाही. पण ही सारी मित्र-मंडळी माझ्यासाठी खासच आहेत...!!!

या सर्वांत एका व्यक्तीशिवाय ही यादी संपूर्ण होणारच नाही आणि ती व्यक्ती म्हणजे,
श्री. सागर शेडगे....!!! 

तसा तो अजून चि. सागरच आहे. पण पुणे म्हटलं कि नावापुढे "श्री." आणि व्यक्तीपुढे "कर" जोडावेच लागतात, म्हणून...!!! 😋 😃

याचं नाव मी येथे बिनधास्त छापतोय त्याचं कारणच असं की, त्यासाठी मला त्याची परवानगी घेण्याची आवश्यकता आहे, असं अजिबात वाटत नाही. म्हणजे वरती उल्लेख केलेल्या व्यक्तींबद्दल ती आहे असं नाही... त्यांचीही नावं मी लिहिली असती, पण लेखनाच्या काही मर्यादा असतात.... सागर आणि माझ्या मैत्रीत अशा मर्यादा नाहीत...!!! याचं नाव मी आधी देतो आणि मग वेळ मिळेल तसा याला सांगतो, अशी आमची मैत्री...!!!


क्रमश:... 

पुणे आणि मी : भाग २ 


गुरुवार, २० जुलै, २०१७

शंका, संशय आणि बदनामी : भाग २

शंका, संशय आणि बदनामी : भाग १ वरून पुढे... 

तर मागील भागात आपण शंका आणि संशय जाणून घेतले आता पुढचा भाग "बदनामी" पाहू...!!!

खरं पाहता बदनामी हा विषय पूर्णतः वेगळा असला तरी बहुतांश प्रमाणात त्याचा संबंध संशयाशी  येतो. कसा ते पाहू...!!!

समजा, आपण कोणाला तरी, काही कामानिमित्त म्हणा किंवा सहज आठवण आली म्हणून म्हणा, फोन केला आणि तो बिझी (busy) लागला. आपला कॉल (call) आलेला पाहून, नंतर जर त्याने स्वतःहून कॉल केला तर ती व्यक्ती आपली कदर करते हे लक्षात येतं. पण काही कारणाने नाहीच जमलं त्या व्यक्तीस आपल्याला कॉल करणं (होऊ शकत असं कधीतरी, पण नेहमीच होऊ लागलं तर तो एक सूचक इशारा आपण मानू शकतो. कोणता सूचक इशारा हे सुज्ञास सांगणे न लागे. असो.) आणि म्हणून पुन्हा थोड्या वेळाने आपण फोन केला आणि त्याने तो उचलला तर आपण सहज विचारून जातो, "मघाशी पण फोन केला होता. पण busy लागला." व्यक्ती अगदीच जवळची असेल तर मग, "कोणाशी बोलणं चालू होतं?" असंही विचारतो कदाचित. तसेच "घरी पोहोचताच फोन अथवा message कर." असे आपण बोलून जातो. 

आता वरील वाक्यांतून कोणाला ती काळजी वाटेल तर काहींना संशय...!!!

वरील दोन्ही वाक्यात आपल्या हाती पुरावा असा काही नाही. त्यामुळे तो संशय कि काळजी हे प्रसंगानुरूप ठरू शकेल. केवळ वाचण्याचा स्वर (tone) बदलून पहा, म्हणजे मी काय म्हणतो ते लक्षात येईल. 

त्यामुळे एखाद्याला संशयीच ठरवायचं असेल तर वरील वाक्यं फक्त स्वर बदलून  त्याच्या तोंडची म्हणून सांगितली कि त्यांचा अर्थ किती बदलतो आणि विचारणारा व्यक्ती "संशयी" म्हणून "बदनाम" होतो. 

बघा हं, म्हणजे ज्या वाक्यांचा आधी "इतकी काळजी करणारा /री कोणी असेल का?" असा अर्थ काढला जात असेल, तो आता सरळ "विश्वास नव्हता, म्हणून असे विचारत होता /ती" असा बनतो/लावला जातो. 

मी पुन्हा सांगतोय, कदाचित प्रसंगानुरूप हे बदलूही शकते पण हा (वरील) अर्थाचा/निष्कर्षाचा प्रवास जर "काळजी ते अविश्वास" असा असेल तर यात चुकीचे कोण? विचारणारा की निष्कर्ष काढणारा?

वरील प्रश्नांची उत्तरं खरं तर शंका आणि संशय यावर अवलंबून आहे. "काळजी ते अविश्वास" हा प्रवास, प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे, शंकेमुळे झाला कि संशयाने हे जाणून घेणे महत्वाचे ठरेल. 

संशयाने झाला असेल तर ती विचारणाऱ्याची चूक आणि शंकेने झाला असेल तर निष्कर्ष काढणाऱ्याची असे माझे स्पष्ट मत आहे. 

कारण मी मागील लेखात म्हणालो तसे, "शंकेचे निरसनच असे करावे कि पुढे शंका घेण्यास जागा राहू नये. संशयास मात्र अंत नसतो." त्यामुळे "शंके"मुळे झालेला हा प्रवास हेच सिद्ध करतो कि, निष्कर्ष काढणारा, विचारणाऱ्याच्या शंकेचे निरसन करण्यात अपयशी ठरला. 

संशयाने शंका, शंकेने संशय अशा दुष्ट चक्रात अडकणे वाईटच...!!! अगदी चकवा मागे लागल्यागत अवस्था...!!! त्यामुळे, शंका निर्माण झाली तर त्याचे योग्य निरसन हाच एकमात्र उपाय आहे. असा उपाय करत असताना प्रसंगी आपला अहंकार, ताठा, बडेजाव आदी गोष्टी बाजूला सारून व्यक्तीला अथवा व्यक्तीसोबतच्या आपल्या नात्याला महत्व द्यावे, असे मला वाटते. 

नात्यासाठी कमीपणा घेणे अथवा सरळ नात्याला शरण जाणे हे परमेश्वराला शरण जाण्याइतकेच महत्वाचे आहे आणि कोणत्याही परिस्थितीत नातं  टिकवणं हीच नात्याची खरी कदर असते. 

शंका निरसन करणे म्हणजे "खोट्या शपथा घेणे" अथवा "एक खोटे लपविण्यासाठी १० खोटे बोलणे" असे नव्हे. तसेच आतातायीपणा करत, विश्वासाच्या नावाखाली स्वैराचार करण्याची परवानगी मिळवणे असेही नव्हे. 

एखाद्यास संशयी ठरवायचंच म्हटलं की, त्याच्या तोंडच्या वाक्यांना थोडासा मसाला लावणे किंवा त्यांचा स्वर बदलणे आणि सगळ्यात सोपं म्हणजे, त्याची वाक्यं अर्धवट सांगणं. इतकं केलं कि, समोरचा बदनाम होतोच. आता मी बदनाम कसं करायचं हे नाही सांगत आहे तर नाहक बदनाम कसं केलं जातं हे सांगतोय. थोडंसं पाहिलेलं, थोडंसं अनुभवलेलं...!!! पण हे सत्य नसतं. 



वरील प्रतिमा (Image) केवळ एक उदाहरण म्हणून पहावी. यामध्ये घटना तुमच्यासमोर आहे आणि कॅमेऱ्यातून दिसणारी प्रतिमा म्हणजे जो त्रयस्थ व्यक्ती आहे त्याला सांगितलेली गोष्ट अशा अर्थाने...!!! यामध्ये कॅमेरा मुद्दामहून वापरला, म्हणजे तो दोन अर्थाने वापरता येईल. 

    १. त्रयस्थ व्यक्तीला सांगितलेला भाग 
    २. घटना समजून घेतल्यावर, त्रयस्थ व्यक्तीच्या मनातील विचार 

त्यामुळे असं खोटं-नाटं सांगून एखाद्याची बदनामी केली गेली, तर जेव्हा सत्य समोर येते त्यावेळेस अशा लोकांची पळता भुई थोडी तर होतेच, पण तोंड लपवायलाही जागा उरत नाही. काळ हा अतिशय बलवान असल्याने सत्य कधी ना कधी समोर येतेच. 

सत्य परेशान हो सकता है, पराजित नहीं ।

एखाद्याची बदनामी करायची कि नाही हे ज्याच्या त्याच्या सद्-सदविवेकबुद्धीवर आणि त्या व्यक्तीशी आपला असलेला जिव्हाळा यावर अवलंबून असते. आपल्या चुकांकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष करून दुसऱ्यास बदनाम करणे आणि आपण निर्दोष असल्याचे सिद्ध करणे हा केवळ एक भ्रमाचा भोपळा आहे. उलट तो आपल्यावरच फुटण्याची जास्त शक्यता आहे.

एखाद्याची खोटी बदनामी करायला हिम्मत लागत नाही, हिम्मत लागते ती स्वत:च्या चुका मान्य करायला आणि त्या सुधारण्याला...!!! 

आपली चूक/पाप लपवण्यासाठी, नाहक एखाद्यास बदनाम करण्यापूर्वी एकदा अवश्य विचार करा...!!!

काही चुकले असल्यास, आवडले नसल्यास अवश्य कळवा...!!! चू. भू. दे. घे. 

जिस दिल में बसा था प्यार तेरा,
उस दिल को कभी का तोड़ दिया, हाय, तोड़ दिया ।
बदनाम न होने देंगे तुझे, 
तेरा नाम ही लेना छोड़ दिया, हाय, छोड़ दिया ।।



शुक्रवार, १४ जुलै, २०१७

शंका, संशय आणि बदनामी : भाग १

विषय तसा नाजूक अन् गंभीर आहे. त्यामुळे मी मला आलेले अनुभव, आसपास घडणारे/घडलेले प्रसंग यांच्या माध्यमातून माझे विचार मांडायचा प्रयत्न करणार आहे. माझ्या विचारांशी सारे सहमत होतीलच असे नाही आणि सर्वांनी सहमत व्हावे अशीही अपेक्षा नाही. कदाचित माझे विचार चुकीचे वाटले तर दुरुस्त करावेत अशी आशा नक्कीच आहे...!!!

सुरुवात होते ते "शंका" अन् "संशय" वेगळे कि एकच यावरून... वरपांगी पाहता दोन्ही शब्दांचा अर्थ एकच वाटण्याची दाट शक्यता आहे. पण थोडासा खोलवर विचार केला तर कदाचित दोन्ही शब्दांतील सूक्ष्म फरक आपल्या ध्यानात येईल. 

एखादी गोष्ट, घटना यांबद्दल प्रत्यक्षदर्शी अथवा साक्षी, पुरावे यांच्या आधारे विचारलेले, पडलेले प्रश्न म्हणजे "शंका" तर अपरोक्ष घटनांचा संबंध जोडून आलेले प्रश्न म्हणजे "संशय" असं मला वाटतं...!!!

आता वरील वाक्य/विचार यांचा थोडा उहापोह करतो... कारण "शंका" आणि "संशय" यांच्यामधील गल्लत दूर झाली तरच पुढे "बदनामी" विषयी आपण बोलू शकू...!!!

आता असं बघा, शाळेत शिक्षक आपल्याला काही शिकवतात आणि नंतर विचारतात, "काही शंका असतील तर विचारा." तसेच पोलीस जेव्हा गुन्ह्यातील सराईताला पकडण्यासाठी माग काढतात, तोसंशयावरून. मी सराईत असा शब्द मुद्दामहून वापरला कारण सहजासहजी कोणताही पुरावा मागे न ठेवता किंवा पुरावे नष्ट करतच काम करण्याची त्याची पद्धत असते. अशावेळेस पोलीस सुरुवातीला "तुम्हांला कोणाचा संशय?" असा प्रश्न विचारतात आणि "संशयिताला" पुढील तपासासाठी बोलावले जाते. 

जर उपरोक्त उदाहरणांचा नीट विचार केला तर असं लक्षात येईल, जेव्हा शिक्षक विद्यार्थ्यांना शंका विचारायला सांगतात, तेव्हा त्यांनी विद्यार्थ्यांना तो पाठ पुराव्यानिशी दाखवून, पडताळलेला असतो. येथे पुरावा म्हणजे प्रमेय ( Theorems), प्रयोग (Experiments) इत्यादी, असे घ्यावे. याउलट, जेव्हा पोलीस संशयाबद्दल विचारतात, तेव्हा आपल्याकडे पुराव्यांपेक्षा अपरोक्ष किंवा कोणीतरी सांगितलेली गोष्ट किंवा विपरीत (संशयास्पद) हालचाल यांपलीकडे फारसे काही नसते. 

याचाच सरळ अर्थ असा कि, शंका हि तेव्हाच घेतली जाते जेव्हा आपल्याकडे काही परिस्थितीजन्य पुरावे उपलब्ध असतात पण संशयास असा आधार गरजेचा नसतो. थोडक्यात, "कोणीतरी कान भरले" तर "हलक्या कानाचे" होणे म्हणजे "संशयी" आणि  जे समोर आहे त्यानुसार प्रश्न करणे म्हणजे "शंका" असे मला वाटते. आता हे आपण आपल्या बुद्धीच्या आणि तर्कांच्या आधारे पडताळून पाहावे. 

संशयावरून शंका  येणे हे बुद्धीस पटण्यासारखे आहे पण शंकेवरून संशय घेणे हे शंका निरसनाची पद्धती, व्यक्ती आणि त्याच्या खरे-खोटे बोलण्याचा इतिहास तसेच शंकेचे दिलेले स्पष्टीकरण यांवरून ठरते. 

संशय आला म्हणून पुरावे गोळा करणे आणि मग त्या पुराव्यांवरून शंका घेणे किंवा त्यांचे स्पष्टीकरण मागणे चुकीचे ठरेल काय? हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पण माझ्या दृष्टीने म्हणाल तर, वरपांगी दिसणारा संशय दूर करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. असा संशय भयंकरच असतो. जसे व. पु. म्हणतात,

"संशय हा कॅन्सर सारखा असतो. तिसऱ्या अवस्थेत तो आपले खरे स्वरूप प्रकट करतो."

त्यामुळे, संशय आला तर तो प्रथम दूर करणे गरजेचे असते. पण संशयाने कोणावरही आरोप करण्यापूर्वी शंकेस जागा घेण्यासारखे काहीतरी आपल्या हाती असणे गरजेचे असते. अन्यथा, विनाकारण एखादी व्यक्ती दुखावली जाऊ शकते. 

तसेच, कोणी शंका (आता शंका म्हणजे काय हे वर सांगितल्याप्रमाणे साक्षी, पुरावे आदी. परिस्थितीजन्य पुरावे) घेतलीच तर त्या व्यक्तीचे शंका निरसन व्यवस्थितपणे, कसलाही आतातायीपणा न करता, अहंकार न बाळगता करणेही गरजेचे असते. 

शंकेचे निरसनच असे करावे कि पुढे शंका घेण्यास जागा राहू नये. संशयास मात्र अंत नसतो. तसेच शंकेस संशय म्हणून नाकारणेही चुकीचेच...!!!

या शंकेविषयी मी माझ्या जुन्या, शिक्षण : समज आणि गैरसमज , या लेखात काही उदाहरणं दिली आहेत ती एकदा जरूर पाहावीत. 

माझ्या मते या भागापुरतं इतकं पुरेसं होईल. हे विचार पटले नसतील तर पुढे "बदनामी" यावरचं माझं विवेचन पटणार नाही. ज्यांना हे विचार पटले त्यांसाठी मी "शंका, संशय आणि बदनामी : भाग २" लिहणारच आहे. पण ज्यांना नाही पटले त्यांनी अवश्य कळवावे. चू. भू. दे. घे. 

क्रमश:..

शंका, संशय आणि बदनामी : भाग २




रविवार, ९ जुलै, २०१७

कविता : गुरु (गुरुपौर्णिमा विशेष)

काय मागू गुरुकडं?, सारंच त्याने दिलं |
शांती, समाधान, मोक्ष, इतकंच आता राहिलं ||१||

अंधारल्या वाटेवर, गुरुच झाला दिवा |
तुटून पडलो चुकांवर, जैसा सिंहाचा छावा ||२||

थोरांपुढे झुकायला, गुरुनेच शिकवलं |
अहंपणा दूर सारुन, नम्र होण्यास सांगितलं ||३||

गुरुच माझा पाठिराखा, सखा माझा गुरु |
योग्य मार्गी लावतो माझे, भरकटणारे तारू ||४||

येती मजवर संकटे, होता माझी फसवणूक |
सांभाळून घेतले मज, दावून आपली चुणूक ||५||

गुरुस न सांगे मी, संकटं माझी मोठी |
भिडे आधी गुरूच तयांस, ठेवून मज पाठी ||६||

सुखाची बरसात होता, करतो मज तो समोर |
गुरुदेवांस नित्य स्मरता, मन माझे भाव-विभोर ||७||

काय सांगु महिमा गुरूचा, काय वर्णू थोरवी? |
गुरुच माझा मेघ-मल्हार, गुरुच राग भैरवी ||८||

आई माझी समर्थ, अन् समर्थच माझे गुरू |
साथ गुरूची लाभता, उणा कल्पतरू ||९||

झाल्या मजकडून खूप चुका, घडले असतील अपराध |
गुरुविन कोण घेईल, ते सारे पदरात? ||१०||

काया झीजो सत्कार्यी, मनी गुरुनाम |
गुरुदेवांस वंदन जैसे, पुण्य गंगास्नान ||११||

     --- जयराज 

शुक्रवार, ७ जुलै, २०१७

कविता : विश्वास

विश्वास असावा म्हणती जरी,
कसा ते न सांगे परी,
सदा अपेक्षी दुसऱ्याकरवी,
का न दावी स्वतःहूनी ?

आधी डोळ्यांवर पट्टी धरी,
दरी पाहून धक्का मारी,
बचावता म्हणती, "परीक्षा खरी", 
हाच असतो का विश्वास...? 

बाळ जाई उंचावरी,
तरी हासे जगावरी,
"झेलतील मज वरचे वरी" ,
तो असतो विश्वास...!!!

विमान उडे गगनावरी, 
थकला चालक आराम करी, 
ऑटो-पायलट कामावरी,
तो असतो विश्वास...!!!

शेती असे पावसावरी,
वरुणराज भारी लहरी,
बळी तरी बी पेरी,
तो असतो विश्वास...!!!

नसला तो श्रीमंत जरी,
होते त्याची कारभारीण तरी,
हिमतीने संसार करी,
तो असतो विश्वास...!!!

घडती पापे जन्मभरी,
जाणते वा अजाणतेपणी,
"मिळेल मुक्ती गंगातीरी",
तो असतो विश्वास...!!!

सत्य सारे वदेन जरी,
साथ न कधी सुटेल तरी,
राहील प्रेम आयुष्यभरी, 
तो असतो विश्वास...!!!

वर्तेन मी स्वैराचारी,
करावी लागेल लाचारी,
नकोत प्रश्न वागण्यावरी,
असा कधीच नसतो विश्वास...!!!

--- जयराज