बुधवार, २६ जुलै, २०१७

पुणे आणि मी : भाग १

सप्तर्षी, सप्तसुर, सप्तरंग, सप्तपदी, सप्तजन्म असा "सात" या आकड्याचा सुप्रभाव आहे. सात हा अंक अशा अनेक कारणांमुळे शुभ मानला जातो. एका अभ्यासाने असेही निरीक्षण नोंदवले आहे की, जर तुमची एखाद्या सोबतची मैत्री ७ वर्षे टिकली, तर ती जन्मभर टिकून राहते. आता तुम्ही म्हणाल, "आज मी ७ या आकड्याबद्दल इतकं का बोलतोय...? पुण्याचा आणि ७ आकड्याचा काय संबंध?"

सांगतो...!!!

पुण्याचा आणि ७ आकड्याचा अर्था-अर्थी काही संबंध नसला तरी आज दिनांक २६ जुलै २०१७ रोजी मला पुण्यात, एकट्याने, येऊन ७ वर्षे पूर्ण झाली. आज असलेली विनायक चतुर्थी हा पण एक सुयोगच म्हणायचा...!!! खरं तर यात, "कुतूहल वाटण्यासारखे काय?" असे अनेकांना वाटेल... पण, यापूर्वी, कोठेही एकट्याने न जाणारा मी ७ वर्षांपूर्वी, सोमवार, २६ जुलै २०१० रोजी, एकट्याने पुण्यात आलो अन् कायमचा इथलाच बनून गेलो...

खरं पाहता, मी पुण्यात कायमचा रहायला १८ आॅगस्ट २०१० रोजी आलो. मग आजची तारीख कशी? सांगतो....!!!

तर, जून २०१० ला मी अभियांत्रिकी (Engineering) शाखेचा पदवीधर झालो अन् भारतातील अनेक बेरोजगार व्यक्तींमध्ये आणखी एकाची भर पडली. त्यानंतर नौकरी शोधण्यापेक्षा एखादा कोर्स करावा जेणेकरून नौकरी लागण्यासाठी फायदा होईल या हिशेबाने मी आणि माझ्या काही मित्रांनी सी-डॅक (C-DAC) चा, ६ महिन्यांचा, कोर्स करायचे ठरविले. त्यासाठी पुण्यातील नामांकित "सनबिम इन्फोटेक" मध्ये मी मुलाखतीसाठी आजच्याच दिवशी आलो.

तशी मुलाखत दुसर्‍या दिवशी, मंगळवार, २७ जुलै २०१० रोजी, होती. पण माझ्या नेहमीच्या सवयीप्रमाणे मी आदल्या दिवशीच पुण्यात दाखल झालो. तसा यापूर्वी एक-दोनदा पुण्यास माझ्या चकरा झाल्या होत्या, पण त्या घरच्यांसोबत...!!! या वेळेस मात्र, "मी एकटाच जाणार", हे घरी निक्षून सांगून आलो होतो. तशी, तेव्हा पुण्याची मला काहीच माहिती नव्हती...!!!

ढगाळ वातावरण... नुकताच पाऊसही पडून गेला होता... जसा रेल्वे स्थानकावर उतरलो तसं ठरवलं, आधी आपल्या आराध्याचे, श्रीगणेशाचे, दर्शन घ्यायचे...!!! बाहेर येऊन एका PMT वाहकाला (कंडक्टर) दगडूशेठ गणपतीला जाणाऱ्या बसबद्दल विचारले. योगायोगाने तिथे उभी बसच तिकडे जाणार होती. त्या बसनेच निघालो. पण ना मला तो थांबा माहीत होता, ना ते मंदिर कुठे आहे ते माहित होते... त्या तुडुंब भरलेल्या बसमध्ये, तिकीट काढताना, बस कंडक्टरलाच त्याबद्दल विचारले आणि मंदिर आल्यावर मला सांगण्याची विनंतीही केली... "इतक्या गर्दीत त्यांच्या हे लक्षात राहिलं का?" ही शंका होतीच... पण सारं काही गजाननावर सोपवून मी त्या गर्दीत उभा राहून जमेल तितकं अन् जमेल तसं पुणे दर्शन करत होतो. मंदिराजवळ आल्यावर त्या सद्गृहस्थ कंडक्टर काकांनी आवाज देऊन मंदिर जवळ आल्याची सूचना दिली...

मंदिरात गेलो... नुकतीच आरती झाली होती... बऱ्यापैकी गर्दी असली तरी आरती झाली असल्याकारणाने पांगापांगीला सुरुवात झाली होती. आत जाऊन गजाननाचे दर्शन घेतले आणि "आता यापुढे तूच माझा सांगाती आहेस...", हे ही त्याला सांगितलं... बराच वेळ मंदिरातच, भान हरपल्यागत, बसून होतो. थोड्या वेळाने शुध्द आली आणि मग पुढे कॉलेजच्या दिशेने निघालो...

दुसऱ्या दिवशी मुलाखत उत्तम झाली आणि त्याच संध्याकाळी माझी निवड झाल्याचेही समजलं... खूप आनंद झाला... त्यानंतर १५ - २० दिवसांनी कोर्स सुरू होणार होता. माझ्या २ मित्रांनाही त्याच कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला आणि आम्ही तिघे १८ आॅगस्ट २०१० रोजी पुण्यात राहण्यास आलो. गुरुवार, १९ ऑगस्ट २०१०, पासून कोर्स सुरू झाला...

ज्या दिवशी मी पहिल्यांदा, म्हणजे २६ जुलै २०१० रोजी, पुण्यात आलो, त्याच दिवशी मी पुण्याचा होऊन गेलो होतो.

काय दिलं नाही पुण्यानं मला...!!!

नौकरीसाठी लागणारं शिक्षण दिलं... पहिली नौकरी मिळवून दिली. तीही विद्वत्तेच्या प्रांगणात... म्हणजे पुणे विद्यापीठात...!!! अगदी मुख्य इमारतीसमोर माझं CDAC चं कार्यालय होतं... CDAC संस्था ही भारत सरकारच्या अखत्यारीत असून ती व्यावसायिक शिक्षण देण्याबरोबरच Software Development चं ही काम करते, हे अनेकांना माहित नाही. ब्रिटिशकालीन ती (विद्यापीठाची मुख्य इमारत) भव्य वास्तू, शिल्पशास्राचा एक अजोड नमुना आहे... करियरच्या सुरुवातीची २ वर्षे मी त्या पवित्र ठिकाणी काढली... पुढेही आणखी काही वर्षे तिथे काढली असती पण काही कारणाने, "करियर Growth व्हावी म्हणून" 😋, मी तिथून निघालो आणि हिंजवडीत 3DPLM, आताची Daasault Systems, मध्ये लागलो तो आजतागायत तिथेच आहे.

पावसाळ्यात, विशेषतः श्रावणात, विद्यापीठाचे निसर्ग-सौंदर्य लाजवाब असते... ते पाहून अभिमानाने म्हणावेसे वाटते, "पुण्यासारखी हिरवळ शोधून सापडणार नाही (निसर्ग-सौंदर्य याच अर्थाने म्हणतोय, गैरसमज टाळावा)."

पुण्यानं, पुण्यात म्हणता यावं असं स्वतःच, हक्काचं घर दिलं... भलेही ते PMC हद्दीत ना का येईना... पण सांगताना पुण्यात घर आहे असं सांगण्यासारखं नक्कीच आहे. पुण्याचं हृदयचं इतकं मोठं आहे की, पिंपरी-चिंचवड, हडपसर महानगरपालिका हद्दीतील लोकं सुध्दा आम्ही पुण्यात राहतो असं अभिमानाने सांगतात, मग माझं घर तर PMC हद्दीला चिटकून आहे. पण माझे मूळचे पुणेकर असलेले मित्र मला, "PMC हद्दीत पण नाही" म्हणून डिवचतात, हि गोष्ट वेगळी...!!! 😃

निखळ मैत्री असणाऱ्या मैत्रिणी दिल्या... मग ती दर राखीपौर्णिमेला न विसरता राखीसाठी घरी बोलावणारी आणि कधी काही कारणास्तव जाणं न झाल्यास, मोठ्या बहिणीगत, रागावणारी एखादी अक्का असो वा सतत अभ्यास करत मलाही अभ्यास करायला प्रोत्साहन देणारी, वेळप्रसंगी धीर देणारी, एखादी विदर्भाची वाघीण असो...!!! सोलापूरकर  म्हणत प्रत्येक नवीन खाद्यपदार्थांचे केवळ फोटो पाठविणारी, पण सर्व सहलींसाठी, मी नाही येणार हे माहीत असलं तरी, हमखास निमंत्रण देणारी एखादी पक्की पुणेकर असो वा माझ्या लांबच लांब चालण्याच्या सवयीवर, "तू पागल है?" असं म्हणत रागमिश्रीत कौतुक करणारी, एखादी सरदारणी टाईप मुलगी असो....!!!

जशा मैत्रिणी तसेच मित्र....!!! मित्र कसले बंधूच...!!! मग तो दूर राजस्थानहून आलेला थोरल्या बंधूगत एखादा मित्र कम् भाऊ आणि वहिनी असो वा माझ्या बुध्दिमत्तेची तारीफ करत मला हरभऱ्याच्या झाडावर चढवणारे विदर्भ, मराठवाडय़ातील मित्र असोत....!!! किंवा आता परदेशात असूनही मैत्रीचे नातं घट्ट टिकविणारा एखादा भाऊच असो...!!!

सर्वसामान्य मनुष्याच्या, छोटंसं का होईना पण स्वतःचं घर, पोटापाण्यासाठी साजेशी नौकरी, आपली म्हणता येतील अशी जवळ असणारी माणसं, यांपेक्षा वेगळ्या अपेक्षा तरी काय असतात म्हणा...?

या सर्वांची नावं देणे येथे खरंच शक्य नाही. पण ही सारी मित्र-मंडळी माझ्यासाठी खासच आहेत...!!!

या सर्वांत एका व्यक्तीशिवाय ही यादी संपूर्ण होणारच नाही आणि ती व्यक्ती म्हणजे,
श्री. सागर शेडगे....!!! 

तसा तो अजून चि. सागरच आहे. पण पुणे म्हटलं कि नावापुढे "श्री." आणि व्यक्तीपुढे "कर" जोडावेच लागतात, म्हणून...!!! 😋 😃

याचं नाव मी येथे बिनधास्त छापतोय त्याचं कारणच असं की, त्यासाठी मला त्याची परवानगी घेण्याची आवश्यकता आहे, असं अजिबात वाटत नाही. म्हणजे वरती उल्लेख केलेल्या व्यक्तींबद्दल ती आहे असं नाही... त्यांचीही नावं मी लिहिली असती, पण लेखनाच्या काही मर्यादा असतात.... सागर आणि माझ्या मैत्रीत अशा मर्यादा नाहीत...!!! याचं नाव मी आधी देतो आणि मग वेळ मिळेल तसा याला सांगतो, अशी आमची मैत्री...!!!


क्रमश:... 

पुणे आणि मी : भाग २ 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा