आज-काल "कर्म-धर्म संयोग" असं फारस ऐकायला मिळत नाही. पण जर कधी एखादी वयस्कर व्यक्ती असेल तिच्या तोंडून किंवा एखाद्या पुस्तकातून हे आपण बऱ्याचदा ऐकलं/वाचलं असेल.
आता या शीर्षकावरून हि काही बाबाच्या प्रवचनाची पोस्ट तर नाही ना असं काहीसं वाटू लागेल. पण असं काही नाही. खर तर या वाक्प्रचाराचा अर्थ मी बऱ्याच दिवसांपासून शोधण्याचा प्रयत्न करत होतो. आणि मग त्या शोधातून मला जो अर्थ लागला तो मी इथे लिहिण्याचा प्रयत्न करत आहे.
हा अर्थ लावत असताना मी काही पौराणिक कथा आणि मान्यतांचा दाखला विचारात घेतला आणि त्यामुळे तो (अर्थ)"कितपत योग्य" आहे आणि त्याचा(कथा आणि मान्यतांचा) "पुरावा" काय या दोन्ही प्रश्नांची उत्तरे माझ्याकडे नाहीत.
एखादे कर्म ( अर्थ गीतेतला, साधा अर्थ क्रिया विशेषतः मानवी अथवा सजीवांची ) आणि ते करत असता त्या क्रियेबद्दल त्या काळचा धर्म ( अर्थ गीतेतला, साधा अर्थ योग्य ( धर्म ) कि अयोग्य ( अधर्म )ठरवणे )यांच्या संयोगाने एखादी प्रतिक्रिया घडणे म्हणजे "कर्म-धर्म संयोग" अशा निष्कर्षाप्रत मी पोहोचलो आहे.
सोप्या भाषेत सांगायचं झालं तर,
आपल्याकडून घडलेली कृती आणि त्याच्या अनुषंगाने लगेचच अथवा कालांतराने घडलेली प्रतिकृती वा मिळालेले फळ, म्हणजे "कर्म-धर्म संयोग "
आता हे किती बरोबर आणि किती चूक हे मी आधी सांगितल्याप्रमाणे मला माहित नाही. चू. भू. दे. घे. ( चूक भूल देणे घेणे ).
आता "अर्थ गीतेतला" असे म्हणून मी गीता वाचली आहे किंबहूना मला गीता समजली आहे असे मला दाखवायचे नाही. मुळात मी "संस्कृत श्रीमदभगवदगीता" एक-दोनदा वाचली आहे. पण मला ती समजली असे म्हणता येणार नाही. मला काही अर्थ कळाला, पण जास्त करून लोकांकडून, जाणत्या व्यक्तींकडून मी गीतेचा अर्थ जास्त समजून घेतला. गीतेत कर्म आणि धर्मा बद्दल बरीच चर्चा केली आहे. नित्य गीता-पठण करणाऱ्या व्यक्तीस नेहमी नवीन आणि प्रगल्भ अनुभव येत असावा असे मला माझ्या वाचनाच्या सवयीमुळे वाटते. त्यामुळे गीता-पठण करणारे कर्म आणि धर्म व्यवस्थित समजू शकतील आणि माझ्या पुढील दाखल्यांमध्ये चूक आढळली तर सुधारणा हि सुचवू शकतील.
आता नमनाला घडाभर तेल ओतून झाल्यावर आपण वरील "कर्म-धर्म संयोग" निष्कर्षाबाबतचे मी विचार केलेले दाखले पाहू :
असं मानलं जातं कि, एकूण कालचक्राचे ४ युग पडतात.
१. सतयुग २. त्रेतायुग
३. द्वापरयुग ४. कलियुग
त्यानंतर प्रलय आणि चक्र पुन्हा सतयुगापासून सुरु...
तसेच, अशी धारणा आहे कि, धर्म ( अर्थ वरीलप्रमाणेच ) हा सुरुवातीला ४ पायांवर/खांबांवर उभा असतो आणि प्रत्येक युगात त्याचा एक पाय/खांब कमी होत जातो.
अर्थात सतयुगात ४ खांबांवर उभा असणारा धर्म त्रेतायुगात ३ खांबांवर, द्वापरयुगात २ तर कलियुगात १ खांबावर उभा असतो. याचा अर्थ सतयुगात जो धर्म (सदाचार ) ४ पायांवर स्थिर असतो तो त्रेतायुगात ३ पायांवर थोडासा अस्थिर होतो, पुढे द्वापारात आणखी थोडा अस्थिर आणि कलियुगात ठार पांगळा होतो. कलियुग संपते वेळी त्याचा हा शेवटचा पायही निकामी होतो आणि सर्वत्र अधर्म, अनाचार व्यापतो आणि असा धर्माचा डोलारा पडल्याने/कोसळल्याने प्रलय उत्पन्न होतो.
आता याचा कर्म-धर्म संयोगाशी काय संबंध तो पाहू.
आपण दर वर्षी दसऱ्याला रावण-दहन करतो. त्याचे काय कारण असे विचारले, तर आपल्याला सांगण्यात येते कि, रावण दुष्ट राक्षस होता त्याने श्री राम पत्नी सीता मातेचे "हरण" केले होते. त्याची शिक्षा त्याला याच दिवशी मिळाली त्याची आठवण आणि तो रावण आपल्या मधूनही निघून जावा म्हणून आपण रावण-दहन करतो.
आता आजमितीला पाहिलं तर हरण हि काही फार मोठी गोष्ट वाटणार नाही. कारण त्याही पेक्षा भयंकर अपराध आपण पाहतो/वाचतो/ऐकतो. मग रावणानी केलेल्या माता सीता-हरणालाच वाईट का मानण्यात येते?
याचा अर्थ मी रावणाने केलेल्या कृत्याचे समर्थन करतो असे नाही. अपराध हा अपराधाच असतो आणि त्याचे समर्थन होऊ शकत नाही. पण आपण जर रामायण वाचले तर आपल्या लक्षात येईल रावण हा महा-पंडित, मातृ आणि शिव भक्त होता. मातेसाठी शिवाची आराधना करून खुद्द शंभूंकडून शिव-लिंग मिळविणारा होता. जेव्हा रावण युद्धात धारातीर्थी पडला त्या शेवटच्या क्षणी प्रभू श्री रामचंद्रानी लक्ष्मणाला रावणाकडून ज्ञान घेण्याचे सांगितले. असे सारे काही असता केवळ माता सीतेचे हरण केले आणि तिचे पावित्र्य नष्ट न करता बंदिवासात ठेवले त्याची शिक्षा आपण युगा-न-युग रावण-दहन करून का देतो?
आता दुसरे उदाहरण बघू :
दयुत-सभेत द्रौपदीचे वस्त्र-हरण केले त्या दुर्योधन, दुःशासन आदी बंधूंना आपण वाईट मानतो पण त्यांच्या या कृत्याचा निषेध/शिक्षा म्हणून कधी त्यांचे दहन करत नाही. रावणाने असे तर काहीच केले नव्हते. मग शिक्षा रावणालाच का?
मी पुन्हा एकवार सांगतो मी कोणाचेही समर्थन करत नाही तर २ घटनांची केवळ तुलना करतो आहे.
या दोनही घटनांची कारणे जरी वेग-वेगळी असली तरी विटंबना तर झालीच होती. या पैकी कोणती घटना जास्त वाईट हे पाहण्यापेक्षा झालेला अधर्म महत्वाचा.
आता या २ घटना आणि धर्म व त्याचे पाय/खांब यांची सांगड आपण घालू आणि कर्म-धर्म संयोग समजता येईल का ते पाहू.
दोन्ही घटना हरणाच्या असल्या तरी त्या वेग-वेगळ्या युगात घडल्या. पहिली घटना, माता सीता-हरणाचा प्रसंग, त्रेतायुगातील आहे तर द्रौपदी वस्त्र-हरणाचा प्रसंग द्वापरयुगातील आहे.
त्रेतायुगात धर्म ३ पायांवर असल्याने धर्माचे पारडे जड होते पण तोच धर्म द्वापरयुगात २ पायांवर असल्याने धर्म आणि अधर्माचे प्रमाण सम-समान होते. त्यामुळे सतयुगात पर-स्री/पुरुषा बद्दल जाणते वा अजाणतेपणी विचार करणेसुद्धा महा-पातक मानले जाई (उदा. इंद्राला मिळालेला शाप आणि अहिल्या शिळा होऊन पडणे : त्रेतायुगाची सुरुवात ) त्याची व्याप्ती त्रेतायुगाच्या शेवटी पर-स्त्री हरणा पर्यंत येऊन पोहोचते. त्या नंतर ती पातळी आणखी खालावून वस्त्र-हरणापर्यंत पोहोचते तर आज-काल ( कालचक्राप्रमाणे आणि मान्यतेप्रमाणे कलियुगात ) ती आणखी घसरलेली/घसरत आहे.
अशाप्रकारे आज आपण इंद्र देवांचा राजा मानत असलो तरी त्याचे ( पावसाची देवता असूनही ) मंदिर बांधत नाही (निदान माझ्या माहितीप्रमाणे तर ते कुठेही नहिये. ) आणि मुलाचे नाव आपण देवेंन्द्र ( पदवी/उपाधी सारखे ) ठेवतो पण केवळ इंद्र, सहसा, नाही. तसेच काहीसे दुर्योधन, दुःशासन आदी बंधूंचे पण आहे.
काल-परत्वे धर्म, या नियमाप्रमाणे इंद्राला ( देवांचा राजा, सर्व-शक्तिमान असूनही ) शाप, रावणाला वीरोचित पण अमरत्वाच्या जवळ-पास जाणारे वरदान असूनही मृत्यू आणि दुर्योधन, दुःशासन आदींना अधर्माने मृत्यू आला.
इंद्र आणि रावण यांनी केलेला अपराध आणि दुर्योधन, दुःशासन यांचा अपराध या मध्ये ( पुन्हा केवळ तुलना, समर्थन नाही ) मिळालेली शिक्षा हि इंद्र आणि रावण यांची भयंकर आहे आणि हाच काय तो कर्म-धर्म संयोग असावा असे मला वाटते.
या सर्व घटना धार्मिक असून यातून कोणाचीही, जाणते वा अजाणतेपणी, बदनामी अथवा अपमान अथवा भावना दुखावण्याचा माझा हेतू नाही. माझे विचार कितपत योग्य हे वाचकाने स्वतः पडताळून पाहावेत.