शुक्रवार, २ जून, २०१७

काही सुभाषितं : भाग २

================================================
१. कालेः मृदुयोः भवति, कालेः भवति दारुणः |
सः साध्नोति परं स्नेहः, विघ्नांश्चापि विनश्यति ||

अर्थ : जी व्यक्ती वेळप्रसंगी मृदू, हळवा बनतो, (अन्) वेळप्रसंगी कठोर, कडक बनतो, असा तो परम प्रेम तर प्राप्त करतोच पण त्याच्या विघ्नांचाही विनाश होतो.
================================================
२. शृंगार वीर करूणा, अदभुत हास्य भयानकः ।
बीभत्स रूद्र शांतः च, काव्ये नव रसा: मतः ।।

अर्थ: शृंगार, वीर, करूण, अदभुत, हास्य/विनोद, भयानक/भीती, बिभत्स, रौद्र आणि शांत असे काव्यात "नवरस (नऊ रस)" मानले जातात. 
================================================
३. येषां न विद्या न तपो न दानं,
ज्ञानं न शीलं न गुणो न धर्म: ।
ते मृत्यू लोके भुवि भारभूता,
मनुष्यरूपेन मृगाश्चरत्नी ।।

अर्थ: जे शिक्षित नाहीत, ज्यांचे तप नाही, न ते दान करतात. ज्यांच्याकडे ज्ञान, चांगले चारित्र्य, चांगले गुण आणि सदाचार नाहीत. असे सर्व लोक या मृत्यू लोकात (भूमीवर) भार असल्यागत असून, मनुष्य रूपातील मृग चरत असल्यागत जगत आहेत. 
अर्थात, "खायला काळ आणि भुईला भार" असे आहेत. 
================================================
४. सर्वत्र सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामयाः ।
 सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चिद् दुःखमाप्नुयात ।।

अर्थ:
सर्व सुखी व्हावेत, सर्व निरोगी व्हावेत. सर्वांनी चांगले तेच पहावे. कोणासही दुःख न लाभावे.
================================================
५. रथेयुतानां परिवर्तनाय, पुरातनानां इव वाहनानां ।
उत्पतीभूमौ तुरुगोत्तमानां, दिश: प्रसस्थे रविरुत्तरस्याम ।।

अर्थ: हा सुर्य देवतेच्या उत्तरायणाचा श्लोक आहे. यामध्ये सुभाषितकार सुर्य नारायणाच्या उत्तराणायचे कारण थोडेसे गमतीदार प्रकारे सांगताना म्हणतो, "आपल्या (सुर्य देवतेच्या) रथाचे जुने झालेले घोडे बदलण्यासाठी, उत्तम घोड्यांची पैदाईश करणाऱ्या उत्तर दिशेला सुर्य प्रस्थान करतो."
================================================
६. आघ्रातं परिचुम्बितं ननु मुहुर्लीढं ततश्चर्वितं ।
त्यक्तं वा भुवि नीरसेन मनसा, तत्र व्यथा मा कृथाः ।।
हे सद्रत्न, तवैतदेव कुशलं, यद्वानरेणादराद ।
अंत:सारविलोकनव्यसनिना चूर्णीकृतं नाश्मना ।। 

अर्थ: हे एक व्यंगात्मक सुभाषित आहे. त्या व्यंगाचे रहस्य मी नाही सांगणार, पण ज्याला कळेल तो त्याचा आणखी सुंदर आनंद घेऊ शकेल. बस इतकंच सांगेन कि हे व्यंग एका खूप जुन्या लोक कथेवर आधारित असून, सुभाषिताच्या शेवटच्या ओळीत दडलेलं आहे. 

यात सुभाषितकार म्हणतो, "हे चांगल्या रत्ना, माकडाने तुझ्यावर आघात केले, चाटलं, चोखल, चावूनही पाहिलं. शेवटी कंटाळून निराश मनाने तुला जमिनीवर फेकून दिले. पण त्याचे वाईट वाटून घेऊ नकोस. कारण हे तुझ्या बाबतीत माकडाकडून चांगलेच झाले असे समज. (कारण) प्रत्येक गोष्टीच्या ''गाभ्यात काय आहे?'', हे पाहण्याची इच्छा (उत्सुकता) असणाऱ्या त्याने तुझे दगडाने ठेचून तुकडे नाही केले."
================================================
७. लोभाविष्टो नरो वित्तम, वीक्षते न तु संकटम् ।
दुग्धम् पश्यति मार्जारो, न तथा लगुडाहतिम् ।।

अर्थ: लोभी मनुष्याला धन दिसते, पण त्यामुळे पुढे येणाऱ्या संकटाची चाहूल मात्र दिसत नाही. जसे मांजर केवळ दुधाकडे पाहते पण काठी घेतलेल्या हाताकडे नाही. 
================================================
८. क्षणशः कणश्चैव विद्यामर्थं च साधयेत ।
क्षणत्यागे कुतो विद्या कणत्यागे कुतो धनम ।।

अर्थ: क्षणा-क्षणाने ज्ञान आणि कणाकणाने धन मिळवावे. क्षणाचा त्याग केल्यास विद्या कोठुन मिळणार आणि कणाचा त्याग केल्यास धन कोठुन मिळणार?
================================================
९. दानं भोगो नाश:, तिस्त्र: गतयो भवन्ति वितस्य ।
यो न ददाति, न भुक्ते, तस्य तृतीया गतीर्भवति ।।

अर्थ: दान देणे, उपभोग घेणे आणि नाश (चोरी आदी स्वरूपात) हे तीन धन जाण्याचे मार्ग आहेत. जो दानही देत नाही, न त्याचा उपभोग घेतो, त्याचे (वित्त) नक्कीच तिसऱ्या (नाश, चोरी) मार्गाने जाते. 
================================================
१०. अर्थानाम् अर्जने दुःखम्, दुःखम् अर्जितानाम् च रक्षणे ।
आये दुखं, व्यये दुःख, धिगर्थाः कष्टसंश्रयाः ।।

अर्थ: धन कमावताना दुःख/त्रास होतो, आणि त्या कमावलेल्या धनाचे रक्षण करतानाही त्रास/दुःख होते. येता दुःख, जाता दुःख अशा कष्टप्रद ठरणाऱ्या धनाचा धिक्कार असो. 
हे सुभाषित, "कोल्हाला द्राक्षे आंबट" असे नसून थोडेसे व्यंगात्मक आहे. याचा भावार्थ असा कि, धन/लक्ष्मी चंचल असून ते येत-जात राहते. त्यामुळे त्यांच्या येण्याने माजूही नये आणि निघून जाण्याने दुःखीही होऊ नये. 
================================================
११. जयन्ति ते सुकृतिन:, रससिद्ध: कवीश्वरा ।
नास्ति येषां यश: काये, जरामरणजं भयम् ।।

अर्थ: सुंदर रचना करणारे (सुकृतिन:) असे रससिद्ध कवी विजयी होतातच. त्यांच्या यशस्वी शरीराला,आजारपण, मृत्यू आदी भय नसतेच. 
अर्थात, "अहंकाराचा वारा न लागो राजसा, माझिया विष्णुदासा भाविकांसी" आणि "मरावे परी कीर्तीरुपी उरावे" या दोन उक्तींचा समन्वय असणारे हे सुभाषित...!!!
================================================
१२. आलसस्य कुतो विद्या, अविद्यस्य कुतो धनम् ।
अधनस्य कुतो मित्रा:, अमित्रस्य कुतो सुखम् ।।

अर्थ: आळशी मनुष्याकडे विद्या कुठून असणार? आणि अशा अडाणी मनुष्याकडे धन कोठून येणार? अशा निर्धन मनुष्याचे मित्र कोठून असणार? आणि ज्याला मित्रच नाहीत तो सुखी कसा असणार?
================================================
१३. परोपकाराय फलन्ति वृक्षा: ।
परोपकाराय वहन्ति नद्य: ।
परोपकाराय दुहन्ति गाव: ।
परोपकारार्थमिदं शरीरम् ।

अर्थ: परोपकारासाठीच वृक्ष बहरतात, परोपकारासाठीच नद्या वाहतात, परोपकारासाठीच गायी दूध देतात, तसेच (आपले) शरीरही परोपकारासाठीच असावे. 
================================================
१४. गर्जसि मेघम् न यच्छसि तोयं, चातक पक्षी व्याकुलितोऽहम् ।
दैवादिह यदि दक्षिणवातः, क्व त्वं क्वाहं क्व च जलपातः ।।

अर्थ: हे मेघा, तू केवळ गर्जना करतोस पण बरसत नाहीस. मी एक व्याकुळ चातक पक्षी आहे. दुर्दैवाने जर दक्षिणेचे(कडून) वारे वाहू लागले तर, तू कोठे असशील, मी कोठे असेन आणि पाऊस तरी कोठे असेल?
चातक पक्षी केवळ पावसाचे पाणी पितो अशी आख्यायिका असल्याने, "गरजेल तो बरसेल काय?" या म्हणीप्रमाणे चातक पक्षी आपली व्यथा मांडतो, अशी सुभाषितकाराने कल्पना केली आहे. 
================================================
१५. साहित्य संगीत कला विहीन:, साक्षात पशु पुच्छ विषाण विहीन: ।
तृणम् न खादन्नपि जीवनमान:, तद भाग देयम् परम पशुनाम ।।

अर्थ: साहित्य, संगीत, (एखादी) कला यांव्यतिरिक्त असणारी व्यक्ती म्हणजे साक्षात शेपटी आणि शिंगे नसलेला पशुच आहे. जगण्यासाठी अशी व्यक्ती गवत खात नाही हे पशूंचे परम भाग्यच मानावे. 
जसे पु. ल. म्हणतात, "जगण्यासाठी शिक्षण घेताना आपण एखाद्या कलेशी नाळ जुळवावी. कारण ते शिक्षण तुम्हाला जगण्याचे मार्ग/उत्पन्न देत असेल तर ती कला तुम्हाला का जगावे, ते सांगेल."
================================================
१६. हंसः श्वेतः बकः श्वेतः, को भेदो बकहंसयो: ।
नीरक्षीरविवेके तु, हंसो हंसो बको बकः ।।

अर्थ: हंस पांढरा असतो, बगळाही पांढरा असतो, मग हंस आणि बगळ्यात काय फरक आहे? पण जेव्हा पाणी आणि दूध ओळखण्याची (वेगळे करण्याची) वेळ येते, तेव्हा कळते, हंस हा हंस असतो आणि बगळा हा बगळाच. 
एका प्रचलित समाजमान्यतेनुसार, दूध आणि पाणी एकत्र करून राजहंसास दिल्यास, तो केवळ त्यातील दूध ग्रहण करून पाणी शिल्लक ठेवतो, असे म्हटले जाते. 
================================================
१७. काकः कृष्णः पिकः कृष्णः, को भेदो पिककाकयो: ।
वसन्तसमये प्राप्ते, काकः काकः पिकः पिकः ।।

अर्थ: कावळा काळा आणि कोकीळ पण काळाच. मग दोहोंमध्ये काय फरक? वसंत ऋतू येताच कळते कावळा हा कावळा असतो आणि कोकीळ हा कोकिळ...!!!
कोकीळ पक्षी वसंत ऋतूत आपल्या मनोहर आवाजात गातो. 
================================================
सुभाषित १६ आणि १७ एकच अर्थ सांगतात कि व्यक्तीची परीक्षा त्याच्या रंग-रुपावरुन न करता गुणांवरून करावी. 
================================================
१८. शैले शैले न माणिक्यं, मौक्तिकं न गजे गजे ।
साधवो न हि सर्वत्र, चन्दनं न वने वने ।।

अर्थ : प्रत्येक शिखरावर माणिक मिळेलच असे नाही, प्रत्येक हत्तीपाशी मोती (मोत्याने सजविला) असेलच असे नाही. त्याचप्रमाणे सर्वत्र सज्जन आणि प्रत्येक वनात चंदन सापडेल/भेटेल असे नाही. 
================================================
१९.  कृपणेन समो दाता, न भूतो न भविष्यति ।
अस्पृशन्नेव वित्तानि य:, परेभ्यः प्रयच्छति ।।

अर्थ: हा एक काव्यशास्त्रविनोदाचा (व्यंगाचा) भाग आहे. यात असे म्हटले आहे, "कंजूष मनुष्यासारखा दानी मनुष्य न कधी झाला, न भविष्यात कधी होईल. कारण आपल्या धनाला स्पर्श न करताच तो ते इतरांना (वारसाला, चोराला, कर रूपाने राजाला) दान करून टाकतो."
================================================
२०. शनैः विद्या, शनैः वित्तं, शनैः पर्वतमूर्धनी |
शनैः कन्था, शनैः पन्था, पञ्चैतानि शनैः शनैः ||

अर्थ : विद्या सावकाशीने (सखोल) शिकावी. धन सावकाशीने (प्रामाणिकपणे) मिळवावे. पर्वत सावकाशीने चढावा. गोधडी सावकाशीने बनवावी. मार्ग सावकाशीने आक्रमणावा. अशा या पाच गोष्टी सावकाशीने म्हणजेच धीराने कराव्यात.
================================================
२१. गुणा: सर्वत्र पूज्यन्ते, पितृवंश निरर्थक: ।
वासुदेवं नमस्यन्ति, वसुदेव: न मानवा: ।।

अर्थ: गुणांची सर्वत्र वाहवा होते किंवा गुणच सर्वत्र पुजले जातात. वाड-वडिलांचा वंश महत्वाचा नसतो. (जसे) श्रीकृष्णाला नमस्कार केला जातो, (त्याचे वडील) वसुदेवांना नाही. 
स्वकर्तृत्व, स्वगुणांवर मोठे व्हावे. खानदान, मोठ्या आई-वडिलांचे अपत्य या गोष्टी गौण असतात, असे सांगणारे हे सुभाषित...!!!
================================================


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा