गुरुवार, ३० मार्च, २०१७

कविता : भेट (अखेरची?)

खरंच नव्हती गं मनिषा माझी,
तुझ्या मित्रांना येऊन भेटण्याची 
होती केवळ एकच ईच्छा,
तुला आश्चर्यचकित करणारी भेट देण्याची 

तुझ्या डोळ्यांतील भाव टिपण्याची,
लटक्या रागाचे रूप पाहण्याची 

लटक्या बोलातून, कळी खुलावून,
हळूच हसून, जराशी लाजून, 
मग म्हणशील माझ्या कानामधी,
"का न बोललात मला, येण्याचे आधी?"

अन् मग जाताना येईल तुझा,
अपेक्षित असा "एक तरी" फोन कॉल 
"निघालात का?" "पुन्हा कधी याल?"
"पोहोचताच नक्की कॉल कराल"

पण नाहीच दिसला तो,
डोळ्यात तुझ्या भावही नीट 
अन् नाही आला कॉलही,
होती का हि आपली अखेरची भेट?

गाडीही आज तब्बल दीड तास लेट आहे,
तुझ्या कॉलचीच जणू तीही वाट पाहे

कधी वाटलंच एकटं तुला,
तर काढ माझी आठवण 
हक्काच होतं तुझ्याकडेही तुझंच,
नि:स्वार्थी प्रेमाचे मजरुपी तारांगण 

कधी जमल्यास आठव ते माझे दररोजचे,
प्रचंड व्यापातूनही वेळ काढून केलेले,
सकाळ, दुपार, संध्याकाळचे कॉल्स 

तुझा आवाज ऐकल्यावाचून, राहिलेली माझी जेवणं,
अखंड पाठवलेली मेसेजेस, माझी झालेली जागरणं 

अन् तुझे न आलेले रिप्लाय पाहून,
तुझ्या तसबिरीशी माझं बोलणं 

एखादं तर कधी,
केलंत का काही,
स्वत:हून आपण?

राग नाही हा,
केवळ विचारणं 

नसतील कदाचित प्रेमाच्या तुझ्या,
अपेक्षा अशा साधारण 

पण, 

एकदा तरी विचार करायचा, मला दूर लोटताना,
थोडंसं तरी समजून घ्यायचं, आपलं नातं संपवताना

का, समजून घेण्याचा वसा, केवळ नेहमी माझाच?
अन् कसेही वागायचा, मला नाकारायचा, अधिकार केवळ तुलाच?

दूर जर जायचेच होते, तुजला मजपासून,
का बोलाविलेस मग मला, तू अश्रू ढाळून?

असतेच नाकारायचे मज तुजला,
आलो असतो का मी भेटायला तुला?

निघालोय मी आता, परतीच्या प्रवासाला,
एकलाच... 
अन् भकास वाटे निसर्ग सौन्दर्यही आज 

असे म्हणतात दुराव्याने,
कळते एखाद्याची किंमत,
तुला न कळे पण,
तू जवळ असतानाही,
होती मला ती जाण
(खरंच हे सांगायची गरज आहे?)
तुझेच नव्हते प्रिये (खरंच आता मी हे म्हणू शकतो?)
मजविषयी चांगले मत 

गाडीने आता वेग घेतला आहे,
अन मनानेही मी दूर जात आहे 

दूर दूर... खूप दूर... 

तुझ्यापासून... 

कदाचित कायमचाच... 

केवळ तुझाच... असूनही नसलेला...


---- जयराज 



बुधवार, २९ मार्च, २०१७

कविता : एका खोट्या प्रेमाची गोष्ट

तो होता साधारण,
ती रुपगर्विता छान ।
दैवाने मिळविले त्यांना,
होण्या दोन जीव एक प्राण ।।१।।

होता प्रसन्न आज तो जाम,
व्यक्त केले तिजसमोर प्रेम ।
न समजून अन् अवघडून,
ती म्हणाली, "विश यू दि सेम" ।।२।।

वेडाच तो हरखून गेला,
मंदीरात तीला घेऊन आला ।
एकच मागणे मागितले देवाला,
"सुखी ठेव माझ्या प्रियेला" ।।३।।

विश्वास तीच्या मनी येण्यास,
त्याने केले अखंड सायास ।
तीचा केवळ एकच प्रयास, 
विना सायास त्याने ठेवावा विश्वास ।।४।।

आणि त्याने तो ठेवलाही,
तीच्या बहाण्यांवर,
तीच्या दुर्लक्षिण्यावर,
अन् तीच्या खोट्यांवरही ।। ५।।

तीचे शिक्षण, तीचा अहंकार,
समाजात तीला, होता म्हणे मान ।
प्रेमात झुकणे, तीचा आदर,
मोडून गेली त्याची मान ।।६।।

बोच वाटत होती तिजला, त्याच्या प्रवचनांची,
गरज वाटत नव्हती तिजला, त्याच्या उपदेशांची ।। ७।।

मस्त मस्तीत तीचे जगणे,
चूक असूनही माफी न मागणे ।
स्वतःस फार शहाणे समजणे, 
आपले सोडून इतर तुच्छ मानणे ।।८।।

छोट्या-छोट्या चुका त्याने दुर्लक्षिल्या,
पण मोठ्या चुकांनी बेबनाव झाला ।।९।।

तीचे बहाणे, दुर्लक्ष करणे,
तो मनाने सैरभैर झाला ।
त्याची तळमळ, काळजी करणे,
तीला अविश्वास वाटू लागला ।।१०।।

अन् मग आले एक जुने वादळ, त्यांच्या प्रेमात,
ज्याने आणिले अंतर, दोघांच्याही मनात ।।११।।

करावे तीचे वादळापासून रक्षण,
उभा ठाकला तो बनूनी ढाल ।
ओळखून काळाचे बदलते चलन,
तीनेही बदलली आपली चाल ।।१२।।

वादळाने मारले तडाखे बेगुमान,
रक्षुनी तिजला झाला तोच बदनाम ।।१३।।

बदलून चाल त्या वादळात,
गमावले तीने जीवापाड जपणाऱ्यास ।
त्याचेही खाडकन उघडले नयन,
गमावून प्रेम न करणाऱ्यास ।।१४।।

आता तो शांत आहे,
निराश, हताश नसला तरी,
थोडासा अबोल आहे ।।१५।।

प्रयत्न करतोय हसू आणण्याचा,
पाणीदार डोळ्यांत अश्रु लपविण्याचा ।
स्थिर, गंभीरपणे जीवन सावरण्याचा,
राखेतून पुन्हा उभे राहण्याचा ।।१६।।

हरविला आहे त्याचा जणू, जीवनाचा सुर,
जशा माझ्या कविता, बेताल अन् बेसुर ।।१७।।

आजही तो तीलाच आठवतो,
त्याच्या सुखांच्या क्षणांत ।
कारण नव्हती तीची साथ त्याला,
कधीही दुःखांच्या क्षणांत ।।१८।।

तीचं मन हळवं, तीच्या अश्रुंमुळे वाटतं,
त्याचं हळवं मन, त्याच्या लपविण्यातून दिसतं ।।१९।।

आणि कदाचित तीलाही कळेल,
जर कधी समजलंच असेल,
तीला त्याचं हळवं मन... ।।२०।।

मनापासूनच मागणं, देवही ऐकतो,
अजूनही तिजला सुखातच ठेवितो ।।२१।।

तीच्या सुखाचे गाऱ्हाणं मांडता,
एक चूक झालीच त्याची ।
"ठेव सोबतच आम्हां उभयतां",
मागणी अशी देवास मागण्याची ।।२२।।

कधी-कधी तो विचार करी,
का मिळालं मजं खोटं प्रेम? ।
म्हणूनच का ती म्हणाली होती,
केवळ "विश यू दि सेम?" ।।२३।।

त्याचा सोबती एकटेपणा, पुस्तकं आणि शब्द,
तीच्या क्षणिक सोबतीने, दुःख झाले होते एकवार निःशब्द ।।२४।।

आताशा तो तीचा विचार करत नाही,
कारण तीच्या परतण्याची त्यास आशा नाही ।
आणि आलीच ती कधी परत पुन्हा,
ती पूर्वीची, त्याचीच ती, असणार नाही ।। २५।।

दृष्टी नाही बदलली अजून, त्याने आयुष्य बघण्याची,
अजुनही आहे आस तयांस, खरे प्रेम गवसण्याची ।।२६।।

मिळावा तिजला मनासारखा,
मागणे तयाचे आता स्पष्ट ।
न लिहावी पुन्हा कोणी,
एका खोट्या प्रेमाची गोष्ट ।।२७।।

---- जयराज

तळटीप : वरील कवितेतील गोष्ट ही पुर्णतः काल्पनिक असून तिचा वास्तविक जीवनाशी काही एक संबंध नाही. असा संबंध कोठे आढळून आल्यास, तो एक निव्वळ योगायोग समजावा.

ताजा कलम : तसेच एका वाचकांनी असे सांगितले कि जर कविता खालून वर अशी उलटी (कडव्यांनी) वाचली तर सुखांत होतो. 



गुरुवार, २३ मार्च, २०१७

काही गमतीदार सत्य

या पोस्ट मध्ये आपण काही गमतीदार सत्य पाहणार आहोत. यापैकी बऱ्याच गोष्टी तुम्हाला माहित सुद्धा असतील. 
  • समजा आत्ता या क्षणाला (आकाशात तळपता दिसत असताना) सूर्य अचानक थंड झाला किंवा सूर्याने प्रकाश देणे बंद केले तर आपल्याला पुढचे जवळपास ७-८ मिनिटे ही घटना कळणार सुद्धा नाही.
  • मानवाने आजपर्यंत चंद्रावर पाऊल ठेवले आहे आणि तो सध्या मंगळावर जाण्याचा सुद्धा विचार करत आहे. पण मजेची गोष्ट अशी आहे कि, चंद्र, जो पृथ्वीच्या पृष्ठभागापासून जवळपास ३,००,००० कि.मी.अंतरावर आहे, तेथे जरी आपण पोहोचलो असलो तरी अजून पृथ्वीच्या अंर्तभागात, गाभ्यापर्यंत (जवळपास ६००० ते ७००० कि.मी.), पोहोचू शकलो नाही.
  • अंतराळात स्थित हबल टेलिस्कोप (Hubble Telescope) बद्दल तुम्ही ऐकूनच असाल. या टेलिस्कोप ने आजवर बऱ्याच आकाशगंगांची (Galaxies) माहिती/ओळख आपल्याला करून दिली आहे. पण हे एका शास्त्रज्ञाचे नाव (Edwin Hubble, 1889-1953) असून त्यांनीच सर्वप्रथम ब्रह्माण्डात अनेक आकाशगंगा आहेत हा सिद्धांत मांडला होता आणि जवळपास १४ आकाशगंगा शोधूनही काढल्या होत्या.
  • जगातल्या बहुतांश विमानांमध्ये आसन क्रमांक १३ (Seat No. 13) नाही.
  • तुम्ही जीवनात विना पॅराशूट (Parachute) केवळ एकदाच स्काय डायविंग (Sky Diving) करू शकता.
    - विनोद होता सोडून द्या.
  • जगात जेव्हा महासागर निर्माण झाले त्यावेळी पृथ्वीवर सलग जमीन आणि सलग पाणी होते. कालांतराने त्या जमिनीचे लौरेंशिअन आणि गोंडवाना असे दोन भाग झाले आणि कालांतराने त्यांचे पण तुकडे होऊन आजचे ७ खंड तयार झाले. अजूनही हे खंड एकमेंकांपासून, mm-cm ने, दूर-जवळ सरकतच आहेत. भूकंपामुळे हा सरकण्याचा वेग (shift) वाढतो.
  • आज जेथे हिमालय पर्वत उभा आहे तेथे अंदाजे ५० दशलक्ष वर्षांपूर्वी टेथिस नावाचा समुद्र होता. लौरेंशिअन आणि गोंडवाना भागातील नद्यांनी आणलेल्या गाळाने तेथे मृदा (माती) संक्षेपित केली आणि त्या गाळावर, पृथ्वीच्या हालचालीमुळे, लौरेंशिअन आणि गोंडवाना प्रदेशाचा दाब पडून वळ्या पडल्या. त्या वळ्या वाढत-वाढत जाऊन शेवटी, हिमालयाची निर्मिती झाली. 
  • आजही शुद्ध आर्य लोक, ज्यांच्या इथे येण्याने भारतीय उपखंडात संस्कृती निर्माण झाली असे मानतात, हे लडाख जवळील एका खेड्यात, जगापासून अलिप्त असे, राहतात. त्यांचे रोटी-बेटी व्यवहारही गावातच चालतात आणि ते ही पारंपारिकपणे.
    - एका न्यूज चॅनेल वरचा रिपोर्ट.
  • जातिवंत घोडा, कितीही थकलेला असला तरी, उभ्यानेच विश्रांती घेतो.
    - अश्व परीक्षेचा एक नियम
  • मी अशी माहिती ऐकली आहे कि, जर आपण ATM मशीन मध्ये आपला पासवर्ड उलट क्रमाने (पासवर्ड ६७८९ असेल तर उलट क्रम ९८७६ असा) टाकला तर पैसे निघताना हळू-हळू/अडकत निघतात आणि तात्काळ पोलिसाना पण माहिती पोहोचते. 
    आता मी कधी असं करून पाहिलं नसलं तरी एखाद वेळेस, देव न करो, पण कधी ATM कक्षात लुटपाटीची वेळ आलीच तर हा प्रयोग करता येईल आणि प्रयोग फसलाच तर मशीन Wrong Password म्हणेल. मग घाबरल्याने चुकीचा पासवर्ड टाकला असं सांगता येईल.
  • रडार (RADAR) हे RAdio Detection And Ranging चे संक्षिप्त रूप आहे. पण ते आता नामासारखे (Noun)  प्रचलित झाले आहे.
  • हिरा चमकतो.... चूक. हिरा केवळ प्रकाश परावर्तित करतो, त्यामुळे चमकदार दिसतो.
  • बहिणाबाईंच्या कविता त्यांनी रचल्या असल्या तरी, त्यांना अक्षर-ओळख नसल्याने, लिहिल्या आणि प्रकाशित केल्या त्यांच्या मुलाने, म्हणजेच कवी सोपानदेव चौधरी यांनी.
  • मानवी मेंदूचा डावा भाग, शरीराच्या उजव्या भागावर नियंत्रण ठेवतो.
  • "मेरी झांसी नही दून्गि" हे मनकर्णिका उर्फ राणी लक्ष्मीबाई यांनी मराठीतून म्हटले होते.
  • केरळमधील कोडिन्ही (Kodinhi) गावात भारतातील सर्वात जास्त जुळी आढळतात.

मंगळवार, २१ मार्च, २०१७

कविता : मनोविजय


मनः, शांत
निश्चल निवांत,
दृढःचल अवीट
वादळ अन् वाट ||१||

दुःखाच्या राशीत
मायेविन कुशीत,
तर्पण अर्पण
प्रियेचे दर्पण ||२||

सगुण निर्गुण
गुणांचे अवगुण,
क्रोधाचे दमन
सत्कार्यी नमन ||३||

मनन चिंतन
बळास भजन,
दुर्दम्य प्रवास
सहवास साहस ||४||

तमस् तपस्
जिद्द अन् आस,
अथक निर्धार
विजय सादर ||५||


- जयराज


सोमवार, २० मार्च, २०१७

कविता : एकांत

होते जे सारे प्रेम मजकडे,
ते सारे वाटून मी दिले,
ना होता पैसा, ना अडका,
हृदय ही माझे, रिते झाले ||१||

कळेना कसा प्रेमात, वाहवत गेलो,
मुकेपणाने एकांगी, प्रेम करत गेलो,
बाहेरुन हसत, आतून रडत गेलो,
चुकिच्या हृदयी, जीव ओतत गेलो ||२||

का सहन केला, मी अपमान?
का न जागला, माझा स्वाभिमान?
अहंकारापुढे प्रेमाने माझ्या, झुकविली मान,
गैरसमज अहंकाराचा, समजे स्वतःस महान ||३||

खऱ्या प्रेमात नसते, स्पर्शाची आशा,
सुखद सहवास, अन् मौजेची नशा,
खरे प्रेम म्हणजे, त्यागाची भाषा,
सुख समाधान, विचार, एकच दिशा ||४||

रिते हृदय माझे, रितीच आशा,
रित्या माझ्या मनी, एकच मनिषा,
उडाला तो खोट्या, अत्तराचा सुवास,
न व्हावा कमी, प्रेमावरचा विश्वास ||५||

- जयराज

मंगळवार, १४ मार्च, २०१७

कविता : पोकळी

नाकारुन मज निघून गेलीस,
सुख स्वप्ने पायाखाली ।
मिळवावी तुज मनाविरुध्द,
पण ती माझी फितरत नाही ।।१।।

चूक माझी मोठी वाटली,
आपल्या हजारो विसरुन गेलीस ।
एका चुकिची हजार माफी,
माफिचा तुझा चकार नाही ।।२।।

जायचेच होते तीला जर देवा,
का माझ्या जीवनात आणलेस?
होतेच खोटे प्रेम जर तीचे,
का न मला तू सजग केलेस? ।।३।।

रडत नाही मी आता,
खोट्या प्रेमाची हीच व्यथा ।
एकांगी जीव कुणी टाकता,
मारी त्यास नशीब चापटा ।।४।।

खंबीर उभा हिमालयाप्रत मी,
निश्चल, आधार भासे सर्वांस ।
तप्त लाव्हारस अन् ज्वालामुखी,
चाहूल नसे जन-माणसांस ।।५।।

वर्षांमागून वर्ष आणिक,
दिवसांमागून दिवस गेले ।
काय सांगू अन् कसं सांगू,
शब्दच मला सोडून गेले ।।६।।

न जमले या जन्मात जरी,
पुढील जन्मी प्रयत्न करेन ।
जन्म जन्मांतरीचे नाते आपुले,
असे कसे अधुरे ठरेन? ।। ७।।

तू हि कर प्रयत्न पुन्हा 
या न जमल्यास पुढल्या जन्मा ।
घडल्या चुका दोहो बाजूंनी 
न घडाव्या पुन्हा हातुनी ।।८।।

कर सदा विचार डोक्यानी 
प्रेमात मात्र केवळ हृदयानी ।
मिळालाच असा प्रेमळ कोणी,
नकोस तोडू त्याला मनानी ।।९।।

- जयराज 



सोमवार, १३ मार्च, २०१७

शिक्षण : समज आणि गैरसमज


आज या पोस्टमध्ये आपण शिक्षणाबद्दलची आजची समाज मानसिकता याबद्दल थोडसं उहापोह करुयात. शिक्षण पध्दतीबद्दल नाही. तर व्यक्ती शिक्षित आहे म्हणजे नेमके काय आणि शिक्षणाबद्दलची लोकमानसिकता याबद्दलचे "माझे विचार"...!!!

प्रथमतः माझी शिक्षणाविषयीची व्याख्या तुम्हांस सांगतो...

शिक्षण असणे म्हणजे केवळ पदवी असणे नव्हे. विचार करणे, प्रश्न निर्माण होणे आणि त्यांची योग्य उत्तरे मिळविण्याची धडपड करणे हेच खरे शिक्षण...

आता वरील व्याख्या मी मानतो. कदाचीत एखादा/दी हे मान्य करणार नाही. त्याला माझा आक्षेप नाही.

आता मला असं का वाटलं यावर थोडासा प्रकाश टाकू... हे करत असताना मी एक वैज्ञानिक आणि एक अध्यात्मिक उदाहरण/विचार मांडणार आहे.

सुरुवातीला वैज्ञानिक दाखला पाहू...

तर आपल्याला माहित आहेच कि जगप्रसिध्द वैज्ञानिक अल्बर्ट आईनस्टाईन यांनी थेअरी आॅफ रिलेटिव्हिटी (Theory of Relativity) चा (सन 1905) सिध्दांत मांडला होता, ज्याद्वारे प्रकाशाच्या वेगाचे, आणि एकूणच सर्व गतिमान वस्तूंच्या वेगाचे, अचूक मापन करण्यात आले. पण त्याच्या जवळपास सव्वा दोनशे वर्षांपूर्वीच न्यूटनने प्रकाशाच्या वेगाचे मापन करत असताना, प्रकाश हा कणांनी (particles) बनलेला असून, अंतराळात सर्वदूर पसरलेल्या ईथर (Ether) मधून तो सर्वत्र प्रवास करतो असा सिध्दांत मांडला होता आणि तो सर्व जगाने मान्य पण केला होता. या काळापर्यंत मानवाने अवकाशात झेप घेतली नव्हती (1957 साली सोव्हिएत युनियनने स्फुटनिक नावाचा उपग्रह अवकाशात सोडला आणि मानवाला अवकाशाचे दार खुले झाले.). त्यामुळे अवकाश हे निर्वात (Empty) आहे की खरंच काही ईथर नावासारखा पदार्थ तेथे सर्वत्र पसरला आहे याचा सबळ/प्रत्यक्षदर्शी पुरावा आपल्याकडे नव्हता. वैज्ञानिक जमिनीवर राहूनच केवळ निरीक्षण (Observation) आणि प्रयोगांद्वारे (Experiments) काही सिध्दांत (Theorems) मांंडत होते आणि ते (Experimental Results) जोपर्यंत सर्वत्र लागू होत असत, तोपर्यंत त्यांवर आक्षेप घेतला जात नसे. त्यामुळे जवळपास सव्वा दोनशे वर्ष अंतराळात ईथर पसरलेला आहे असा एक सर्वमान्य समज होता.

खरे पाहता, अल्बर्ट आईनस्टाईनसुध्दा हीच थेअरी शिकून स्वीस मधील पेटंट आॅफिसमध्ये कारकून (Clerk) म्हणून काम करत होते. पण त्यांच्या मनात या अवकाशात पसरलेल्या ईथरविषयी "शंका" निर्माण झाली आणि ही ईथरची संकल्पना कशी बिनबुडाची आहे हे सांगणारा एक पेपर त्यांनी प्रकाशित केला. इतक्यावरचं शांत न राहता अनेक प्रयोगांद्वारे त्यांनी ते सिध्दही करून दाखविले. आज आपण पाहतोच आहोत की आईनस्टाईन बरोबर होते. पण याचा अर्थ न्यूटन चुकीचे नव्हते. कालपरत्वे न्यूटन यांना काही गृहितक (Assumptions) मानावे लागले आणि त्याद्वारे त्यांनी प्रकाशाचे आणि त्याच्या वेगाचे जे स्पष्टीकरण दिले ते बहुतांशी आजच्या स्पष्टीकरणाशी मेळ खाते. जर आईनस्टाईनच्या मनात न्यूटनच्या थेअरीविषयी शंका आली नसती तर प्रकाशाच्या वेगाचे, अंतराळातील घटकांच्या वेगाचे अचूक निदान करणे शक्य झाले असते काय?

आता दुसरा दाखला आपण आध्यात्मिक पाहू...

असे म्हटले जाते, जेव्हा एखादा मानवी जीव आईच्या पोटात हुंकार भरत असतो तो हुंकार जर आपण लक्ष देऊन ऐकला तर तो म्हणत असतो, "कोSहम्?" म्हणजे "कः अहम्(मी कोण आहे)?" तो एक मानवी जीव आहे हे माहित असूनही तो ही शंका का घेतो? अध्यात्मात मनुष्य जीवालाच श्रेष्ठ का मानले गेले? मानवी जीवालाच मुक्ती का प्राप्त होते? असे अनेक प्रश्न सर्वसामान्यांपासून, सर्वश्रेष्ठ (अध्यात्मिक, योगी, ज्ञानी) लोकांना नेहमी पडत असतात आणि या प्रश्नांची उत्तरं सर्वचजण आपापल्या परीने हुडकत असतात. मग संत ज्ञानेश्वरांसारखे त्यासाठी आपल्या गुरुंकडे, निवृत्तीनाथांकडे, या शंका घेऊन आपला पारमार्थिक सोपान सुकर करुन घेतात तर संत तुकाराम खुद्द विठ्ठलालाच या शंका विचारतात. मग शंका येणं चुकिचं कसं ठरु शकतं? लौकिकर्थाने संतमंडळी कधी शाळेत गेली नाहीत. मग त्यांचे शिक्षण नव्हते असे आपण म्हणतो का? असे असेल तर, त्यांचे अभंग, कविता, चारित्र्य आपण शाळेत, महाविद्यालयात अभ्यासासाठी का घेतो?

मानवी मन म्हटलं की शंका या येणारचं. स्वामी विवेकानंदांनी एके ठिकाणी म्हटलं आहे, "जर दिवसभरात तुम्हांला एकही अडचण आली नाही तर तुमचा प्रवास नक्कीच चुकीच्या दिशेने होत आहे आणि जर तुम्हांला दिवसभरात एकही शंका आली नाही तर तुम्ही दिवसभरात एकही नवी गोष्ट शिकला नाहीत." ज्या प्रश्नांच्या मागे आपण झपाटून लागत नाही, त्याशिवाय आपल्याला नवीन ज्ञान कसे प्राप्त होणार?

आपण जर व्यवस्थित निरीक्षण केलं तर सर्वात जास्त शंका कोणाला येतात, तर त्या लहान मुलांना. कारण नाविन्याची आवड आणि शिकण्याची क्षमता त्यांच्यात प्रचंड असते. पण पु. लं. च्या भाषेत सांगायचं झालं तर आपली "गप्प बसा संस्कृती" असल्याने आपण त्यांच्या किती प्रश्नांना उत्तरे देतो? मग उत्तरंच मिळत नसतील तर लहान मुलांचा भ्रमनिरास नाही का होणार? त्यांचे मन नवीन विचार कसा करु शकणार? आईनस्टाईनला पडला तसा प्रश्न यांना कसा पडणार? "बाबा वाक्यंं प्रमाणम् (पूर्वापार जे चालत आले आहे ते योग्यच आहे)" या न्यायाने ते तसेच चालत राहणार. मग प्रगती कशी होणार?

तसेच नात्यांमध्येही आपल्याला अनेकदा काही शंका येतात. त्यांचही असंच बोलून, प्रसंगी कृतीमधून, निरसन झालं तर नात्याचे नवीन पैलू आपल्याला नाही का दिसणार? हे पण एक प्रकारचे शिक्षणच नाही का? शंका घेणाऱ्या व्यक्तीच्या जागी स्वतःला ठेवून, "ती शंका का आली?", "ती कशी दूर करता येईल?", असा विचार करण्याची ताकद शिक्षणामुळेच मिळते ना? हां, पण नात्यांमध्ये शंका येणे म्हणजे हलक्या कानाचे होणेे (कोठेतरी, कोणाचे तरी ऐकून शंका घेणे) असे अजिबात नाही. जे तुम्ही स्वतःच्या डोळ्याने पाहिले, स्वतः जाणून घेतले, केवळ त्याच गोष्टींविषयी प्रश्न करावेत. इतर गोष्टींसाठी नात्यांमधील विश्वास आणि मोकळा संवादच महत्वाचा असतो.

त्यामुळे "तुम्ही शंकाच कशी घेतली?" हा प्रश्न कसा गैरलागू आहे हे तुमच्या लक्षात येईल. कसं असतं, आज-काल इतकी महाविद्यालये (Colleges) झाली आहेत की, कोणत्याही पदवीसाठी, कोणालाही प्रवेश घेणं सोपं झालयं...!!! मेरीट अथवा पात्रतेची फारशी आवश्यकता नाही. पैसा असेल तर राखीव व्यवस्थापन जागांमधून (Management Quota) मधून किंवा मग दूर कुठल्यातरी अशाच लहान-मोठ्या, नवख्या महाविद्यालयात कोणालाही कुठल्याही पदवीसाठी प्रवेश घेता येतो. थोडाफार रट्टामार करुन पदवी पण मिळविता येते. पण त्या ज्ञानाचा वापर ठोकताळ्यासारखा करायचा, आणि चार लोकांकडून कौतुक ऐकायचे, कि विचारपूर्वक प्रगतीसाठी, सर्वांगीण उत्कर्षासाठी करायचा हे ज्याने त्याने ठरवायचे असते. आता शंका विचारल्याने लगेच सगळेच काही आईनस्टाईन नाही होत पण आपली मनं शंकामुक्त होऊन सत्कार्यासाठी नक्कीच लावू शकतो.

पदवीमुळे एखाद्या विषयाची आपल्याला ओळख होऊ शकते. फार फार तर थोडं-बहुत ज्ञान मिळालं असं आपण म्हणू शकतो. पण म्हणजे आपण सर्वज्ञ झालो असे नाही. मी अभियांत्रिकी (Engineering) ची पदवी घेतली आहे म्हणजे मला त्याचे संपूर्ण ज्ञान आहे असे म्हणणे किती चुकिचे ठरेल हे आपण समजू शकता. खुद्द न्यूटन एका मुलाखतीत म्हणाले होते, "वाळवंटातील एका वाळूच्या कणाइतकीच मला विज्ञानाची माहिती आहे." मग आपल्यासारख्या पामरांनी त्या पदवीच्या कागदाचा का आणि कसला गर्व धरावा?

आता मला सांगा केवळ एखादी पदवी असणं म्हणजे शिक्षण असणं असं म्हणणं कितपत योग्य? वरील केवळ माझे विचार आहेत. त्यामुळे त्यांच्याशी सगळे सहमत होतीलच असे नाही. त्यामुळे नेहमीप्रमाणे शेवटी, चूक भूल द्यावी घ्यावी...!!! विचार करा आणि विचारांच्या प्रवाहाला अडवू नका...!!!

गुरुवार, ९ मार्च, २०१७

गीत : एक आवडते गाणे : सुन्यासुन्या मैफिलीत माझ्या


सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या, तुझेच मी गीत गात आहे
अजूनही वाटते मला की, अजूनही चांदरात आहे !


कळे न मी पाहते कुणाला ? कळे न हा चेहरा कुणाचा ?
पुन्हा पुन्हा भास होत आहे, तुझे हसू आरशात आहे !


सख्या तुला भेटतील माझे, तुझ्या घरी सूर ओळखीचे

उभा तुझ्या अंगणी स्वरांचा, अबोल हा पारिजात आहे !

उगीच स्वप्नात सावल्यांची, कशास केलीस आर्जवे तू ?
दिलेस का प्रेम तू कुणाला ? तुझ्याच जे अंतरात आहे ?


उगाच देऊ नकोस हाका, कुणी इथे थांबणार नाही
गडे, पुन्हा दूरचा प्रवासी, कुठेतरी दूर जात आहे !

गीत - सुन्यासुन्या मैफिलीत माझ्या 
चित्रपट - उंबरठा (१९७७)
गीतकार - सुरेश भट
संगीत - पं. हृदयनाथ मंगेशकर
स्वर - लता मंगेशकर


मंगळवार, ७ मार्च, २०१७

माझं विमान प्रेम : भाग ३

माझं विमान प्रेम : भाग २ वरून पुढे चालू...

तर एकदाचे आमचे विमान नागपूर विमानतळाच्या धावपट्टीवर येऊन पोहोचले आणि (माझ्या पहिल्याउड्डाणासाठी तयार झाले. मनातली धड-धड वाढत होती. पावसाने उघडीप दिली असली तरी काळ्या ढगांची दाटी होतीच आणि अशामध्ये विमानाने धावायला (वेळ स. ८:४०) सुरुवात केली व क्षणार्धात तुफान वेग पकडला. 

त्या वेगात विमानाने पुढचे चाक हवेत उचलले, कारण त्या वेळी हलकासा छातीवर दाब आल्यासारखा होतो आणि शेवटी तो क्षण आलाच, जेव्हा विमानाने हवेत झेप घेतली. काय मस्त अनुभव होता तो...!!! मी खिडकीतून पाहात होतो तशी जमीन माझ्या पासून दूर जात होती आणि मी अक्षरशः उंच उंच जात होतो. काही क्षणात जमीन दिसेनासी झाली कारण आम्ही आता त्या काळ्या ढगांच्या गुफेत जात होतो. संपूर्ण विमानात मंद लाईट सुरु होती आणि आम्ही पूर्णपणे त्या काळ्या ढगात हरवून गेलो होतो. एखाद्या खोल/अंधाऱ्या गुफेत जाताना जी अवस्था होते तशी काहीशी माझी अवस्था झाली होती.  

काही क्षण असेच अंधारातच गेले. मी विमानाच्या पंखाकडेच बघत होतो आणि मनात एकच (कर्मदरिद्री) विचार... "विमानातील पेट्रोल आता अचानक संपलं तर....? खड-खड-खड-खड....  ज्या वेगाने वर आलोय त्या पेक्षा दुप्पट वेगाने खाली जाऊ..." हळू-हळू तो बाहेरचा अंधार कमी होऊ लागला आणि आमचे विमान त्या अंधाऱ्या काळ्या ढगांच्या गुफेतून बाहेर आले. तुम्ही जर The Matrix Revolutions हा चित्रपट पाहिला असेल तर तुमच्या लक्षात येईल कि निओ आणि ट्रिनिटी जेव्हा मशीनच्या शहरात जातात तेव्हा त्यांचे यान मशीन्सना चकवण्यासाठी सरळ वरती उडत राहते आणि शेवटी काळ्या ढगांच्या पलीकडे गेल्यावर ट्रिनिटीला एक सुंदर असा सूर्याचा (निसर्गाचा) नजारा पाहायला मिळतो (कारण निओ त्यावेळी आंधळा झालेला असतो) अगदी तसच काहीस बाहेरच वातावरण होत. बाहेरचा तो स्वच्छ सूर्यप्रकाश आणि खाली पावसाचे काळे ढग अशा वातावरणात आमचे विमान आता स्थिर होण्यास सुरुवात झाली होती. 

खाली पावसाने बरसायला सुरुवात केली असावी कदाचित पण आता आम्ही त्या ढगांच्या वरती आलो होतो. तिथे पांढऱ्या शुभ्र, कापसासारख्या, ढगांची मखमली गादीचं पसरली आहे कि काय असे वाटत होते. काही वेळाने त्या काळ्या ढगांचे अस्तित्वही नाहीसे झाले आणि सर्वत्र केवळ मखमली गालिचाच दिसत होता. त्या पांढऱ्या ढगांचे वेग-वेगळे आकार. जसे आपल्याला खालून दिसतात, हत्ती, घोडा आदी, तसेच पण खूप मोठे. विमानाने हलकेच वळण घेतले तेव्हा पोटात झालेल्या गुदगुल्या... बराच वेळ विमानात बसल्याने कान जड होऊ लागतात. मग जांभळ्या देऊन तो जडपणा घालवावा लागतो. अशा साऱ्या गमती-जमतीत तासा-दीड तासाचा वेळ कसा गेला ते कळलंच नाही आणि मग पुन्हा एक सूचना घुमली कि, "आपण आता थोड्याच वेळात इंदौरच्या विमानतळावर पोहोचणार आहोत. कृपया आपल्या खुर्चीच्या पेट्या बांधून घ्या." 

अगदी पहिल्या विमानप्रवासापासून मला एक सवय आहे कि, मी शक्यतो माझ्या खुर्चीचा पट्टा काढत नाही. अगदी Transit time (मधल्या एखाद्या विमानतळावर थांबण्याची वेळ) मध्ये सुद्धा. त्यामुळे या सूचनेचा मला काही विशेष फरक पडला नाही. आता विमानाने हळू-हळू उतरायला सुरुवात केली होती. पांढऱ्या गर्द ढगांची व्याप्ती हळू-हळू विरळ होत चालली आणि खालची जमीन दिसू लागली. "बापरे, किती उंचीवर होतो आपण...!!!" खालून उंचच उंच वाटणाऱ्या इमारती पत्त्याच्या संच्याएवढ्या वाटत होत्या आणि शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या पाण्याच्या टाक्या तर एखाद्या कंदिलासारख्या दिसत होत्या. जस-जसे विमान खाली उतरू लागले तस-तसा पोटात हलकासा गोळा जाणवू लागतो. जमीन जशी जवळ येऊ लागली तसा विमानाचा वेग जाणवू लागला. जबरदस्त...!!! 

विमान तसे छोटे असल्याने, Landing Gear बाहेर निघाल्याचे त्याच्या हवेत बसलेल्या धक्क्याने समजले. छोटे अशासाठी कि तोपर्यंत मी Boeing विमान पाहिले नव्हते. त्यामुळे माझ्या साठी ते त्या वेळेला मोठेच होते. विमान एकदाचे जमिनीला टेकले आणि काय सांगू कल्पनातीत वेगाला काय खीळ बसू लागली. थोडक्यात brakes लागले आणि विमानाचा वेग कमी कमी होऊन साधारण झाला. 

इंदौर विमानतळावर लोक उतरले आणि विमानात आता मी व एखाद दुसराच कोणी तरी असे शिल्लक राहिलो. या काळात पुन्हा किंगफिशरच्या कर्मचार्याकडून आमच्या (विमानाच्या आतल्या) बोर्डिंग पासची तपासणी झाली. यालाच Transit Check म्हणतात. मग इंदौर मधली पुण्याला जाणारी मंडळी आत आली आणि विमान पुन्हा भरलं गेलं व उड्डाणासाठी सज्ज झालं. माझ्या बाजूची जागा एव्हाना रिकामी झाली होती. आता या वेळेस उड्डाणाची, पहिल्या वेळेसारखी, भीती नव्हती तर आनंद होता. मजा वाटत होती. विमानाने पुन्हा उड्डाण करून पुण्याच्या दिशेने झेप घेतली. या काळात विमानात खायला देण्यात आले. काही वेळात आम्ही पुण्याजवळ आलो. विमान उत्तरेकडून येत असल्याने आणि पुणे विमानतळाची धावपट्टी पूर्व-पश्चिम पसरली असल्याने विमानाला हवेत एक चांगले वळण घ्यावे लागते आणि त्या काळात पुण्याचे उंचावरून मस्त दर्शन होते.

तर असा हा माझा पहिला विमान प्रवास... 

त्यानंतर बरेच विमान प्रवास झाले, केवळ GoAir आणि Air Asia या दोन विमान कंपन्या सोडल्या तर भारतात (Domestic) चालण्याऱ्या सर्व विमान कंपन्यांच्या विमानामधून प्रवास केला. पण सर्व केवळ Boeing च. प्रत्येक प्रवासाच्या अशाच सुरेख आठवणी माझ्या मनात आहेत. पण मला सगळ्यात जास्त मजा येते ती जम्मू ते श्रीनगर या केवळ २५ मिनिटांच्या प्रवासात. कारण याच काळात हिमालयाचे इतके मनोहारी रूप दिसते कि काय सांगू...!!! फक्त पायलटने व्यवस्थित मार्ग निवडला पाहिजे कारण माझ्या काही दिवसांपूर्वीच्या प्रवासात, मार्ग वेगळा असल्याने, मला ते काही व्यवस्थित दिसले नव्हते. पण जर तुम्ही श्रीनगर वरून पूर्वेकडे म्हणजे चंदिगढ किंवा डेहराडून कडे जात असाल तर मात्र खिडकी अजिबात चुकवायची नाही. कारण हा सर्व प्रवास हिमालयाच्या त्या मनोहारी रूपाचे दर्शन देणाराच असतो. 

खरं तर आता मला विमान चालवायला शिकावस वाटत आहे. त्या संबंधीची बऱ्यापैकी माहिती पण काढली आहे. पण त्याचा एकूण खर्च आणि लागणारा वेळ पाहता तूर्तास तरी ते शक्य नाही. बघू पुढे कधी आणि कसे जमते कि नाही ते. सध्या तरी इथेच थांबतो. कंटाळा आला असेल तर एकदा तरी विमान प्रवास करून स्वतः अनुभव घ्या.. आणि काही चुकलं असेल तर माफ करा... 

भाग समाप्त... पण प्रेम नाही.... 


रविवार, ५ मार्च, २०१७

आज कुछ तुफानी करते है : एक अनुभव

     दिनांक ३ आणि ४ मार्च, २०१७, रोजी मी श्रीनगरमध्ये होतो. तेथील अनुभव, हिमालय यांचं वर्णन मी छायाचित्रांसह (with photo) नंतर करेनच. पण या पोस्ट मधे मी थोडा मजेशीर अनुभव सांगणार आहे.

     तर झालं असं, मी ३ तारखेला जम्मूहून विमानाने साधारण सकाळी ११:३0 वा. श्रीनगर विमानतळावर उतरलो. उतरताना पायलटने सूचना सांगितली की बाहेरचे तापमान ८°c आहे. ऐकताना मजा वाटली पण विमानतळाबाहेर पडल्यावर त्याची तीव्रता जाणवू लागली.

     बरं श्रीनगरला जायचं मी अगदी ऐनवेळी ठरवलं असल्याने केवळ विमानाचं तिकीट काढलं होतं आणि तिथं जाऊन केवळं आराम करायचा असं ठरवलं होतं. त्यामुळे माझ्यासोबत नेहमी प्रवासात असणाऱ्या (एकमात्र) बॅगेत मी काहीच गरम कपडे घेतले नव्हते.

     आराम करायचा यासाठी ठरवलं होतं कि, मी वैष्णोदेवी यात्रा, कट्रा रेलवे स्थानकापासून, जिथे गेस्ट हाऊसवर मी उतरलो होतो तिथून, येऊन जाऊन चालत करणार होतो व दुसऱ्या दिवशी जम्मूतील काही मंदीरांचे दर्शन करणार होतो. त्यामुळे, श्रीनगरला जाऊन आराम करायचा माझा मानस होता.

     ठरल्याप्रमाणे, न थांबता (सलग २ तास ४० मिनीटे चालत आणि मधल्या मंदीरांचे दर्शन घेत, पण तेथे न बसता), मी वैष्णोदेवी भवनपर्यंत गेलो आणि तिथे दर्शन घेऊन, तेथील राम मंदीर व वरच्या अंगाचे भैरव मंदीर येथे काही काळ पायांना आराम देवून, व्यवस्थित संध्याकाळी परत आलो. पण माझ्या पायाला काही दिवसांपूर्वी दुखापत झाली असल्याने, त्या दुखापतीने दुसऱ्याच दिवशी पुन्हा डोके वर काढले. माझे राहण्याचे ठिकाण कट्रा रेलवे स्थानकावर आणि जम्मूतील हाॅटेल पण रेलवे स्थानकाजवळच असल्याने मी कसाबसा जम्मूला गेलो आणि दिवसभर हाॅटेलवर आराम केला.

     दुसऱ्या दिवशी सकाळी श्रीनगरला निघालो तेव्हा पायांना चांगलाच आराम वाटत होता आणि माझ्यातला प्रवासी आता जागा झाला होता. "श्रीनगरला जायचं आणि बर्फ बघायचा नाही?" माझं मन मलाच प्रश्न विचारु लागलं. मग मी विमानतळावर सारी security checking झाल्यावर श्रीनगरच्या हाॅटेलला फोन लावला आणि माझ्यासाठी गाडीची व्यवस्था करण्याची विनंती केली. त्यांनीही ती लगेच मान्य केली.

     मी विमानतळावर उतरताच हाॅटेलची गाडी आली होती. त्याने हाॅटेलवर पोहोचलो आणि "लगेच निघालो तर गुलमर्ग होऊ शकेल" असे कळताच, खोलीत केवळ बॅग टाकून, तसाच गुलमर्गसाठी निघालो. तासाभरात गुलमर्गला पोहोचलो आणि पुढचे ३-४ तास बर्फाचा आणि बर्फवृष्टीचा आनंद घेतला. येताना शंकराचार्यांचे, शंभू मंदीराचे दर्शन घेऊन, संध्याकाळी उशीरा हाॅटेलवर परत आलो आणि रात्री जेवण करुन झोपी गेलो.

     दिवसभरचा थकवा आणि गादी गरम ठेवणारी मशीन यांमुळे त्या कडाकीच्या थंडीतही गाढ झोप आली. झोपण्यापूर्वी मला "२४ तास गरम पाण्याची व्यवस्था आहे" असं सांगण्यात आलं होतं आणि मी पण, माझ्या स्वभावानुसार, त्याची खात्री करुनच झोपलो होतो.

     दुसऱ्या दिवशी दुपारी १२:३५ वा. माझे पुढील विमान होते. पण जम्मू आणि श्रीनगर विमानतळावर Extra Security Checking होत असल्याने, आपल्याला विमानतळावर उड्डाणाच्या कमीत-कमी २ तास आधी पोहोचणे अपेक्षित असते. त्यानुसार मला हाॅटेलवरुन सकाळी १०:०० वा. निघणे गरजेचे होते.

     रात्रीच्या गाढ झोपेतून सकाळी उठायला 8 वाजले. थंडीचा जोर कालपेक्षा कमी नव्हता. पहिल्यांदा गरम पाणी आहे की नाही ते पुन्हा पाहिले. गरम पाणी येत होते. मग घरी फोन करुन आंघोळीला जायला सकाळचे 9 वाजून गेले.

     श्रीनगरमध्ये Electricity चा problem असावा, कारण रात्री मी आल्यापासून वीजेचा लपंडाव सुरु होता. नंतर निघताना (४ मार्च २०१७) श्रीनगर विमानतळावर पण तासाभरात एक-दोनदा वीज गेली होती. तशीच ती सकाळी ८:३० च्या सुमारास पुन्हा गेली होती. हाॅटेलमध्ये जनरेटर होते पण त्यावर Geyser(गिझर) चालत नव्हते. त्यासाठी त्यांनी Boiler बसविला होता.

     मी आंघोळीला गेलो आणि पाहतो तर काय, बर्फासारखे थंड पाणी येत होते. आता आली का पंचाईत...!!! तशी मला बारमाही थंड पाण्याने आंघोळीची सवय असली तरी श्रीनगरचे ते बर्फाळ थंड पाणी पाहता, ते पाणी अंगावर घेण्याची माझी छाती काही होईना...!!! आणि आंघोळीशिवाय काही न खाण्या-पिण्याची लहानपणापासूनची सवय... मोडेल ती सवय कसली? म्हणून आंघोळ टाळणेही जमत नव्हते. बरं पुन्हा आज दिवसभर सलग, लागोपाठ, जवळपास ७-८ तासांचा, विमानप्रवास असल्यानेही विना आंघोळ रहावेसे वाटत नव्हते. काय करावं या विचारात मी स्वागतकक्षाला (Reception) फोन लावला व त्यांना गरम पाणी येत नसल्याचं सांगितलं. त्यांनीही लगेच Boiler पाहून मला सांगितलंं की, "Boiler आता थंड झाला आहे." त्यामुळे मला वीज येण्याची वाट बघण्याचे सांगितले आणि मग Geyser वापरण्यास सांगितले. पण Geyser ने सुध्दा पाणी गरम होण्यास अर्धा तास लागणार होता. तसेच वीज कधी येईल त्याचा भरवसा काय? जवळपास सकाळचे ९:३० होत आले होते आणि कोणत्याही परिस्थितीत सकाळी १०:०० वा. हाॅटेलवरुन निघायचेच होते. त्यामुळे वीजेची वाट बघण्यात काहीच अर्थ नव्हता.

     मग मोठ्या कष्टाने आजची आंंघोळ टाळायची ठरवली आणि केवळ तोंड, हात, पाय धुवून निघायचे ठरविले. थोडे थंड पाणी तोंडावर मारताच अक्षरशः माझे तोंड सुजल्यासारखे वाटले. पण मग थोडीशी सवय झाल्यासारखी वाटली आणि एकदम तशाच बर्फाळ पाण्याने आंघोळ करायची ठरविली. शाळेत असताना आम्हांला हिवाळ्यातच सकाळी पोहायला नेत असत. त्या दिवसांची आठवण झाली. आता त्या तापमानात आणि इथल्या तापमानात कमालीचा फरक असला तरी "आंघोळ तर करायचीच" असा निश्चय झाल्याने, शंभू महादेवाला स्मरुन, हर हर गंगे, हर हर महादेवचा जप करत ते बर्फाचे पाणी, छे चक्क बर्फ, अंगावर घेतले एकदाचे...!!!

     अहाहा..!!! काय विलक्षण अनुभव होता तो...!!! सुरुवातीला एक-दोन मग पाणी अंगावर पडले तेव्हा खूप थंडी जाणवली पण नंतर मात्र गंमत वाटू लागली. मस्त एक-दीड बादली पाण्याने आंघोळ करुन बाहेर आलो त्यावेळी हृदय अक्षरशः बाहेर येऊन धडकत आहे की काय असे वाटत होते. सर्वांगातून थंडगार वाफा निघत होत्या.

     आणि मजेची गोष्ट अशी की, मी आंघोळ करुन बाहेर पडायला आणि वीज यायला एकच गाठ पडली. पण आंघोळ तर झाली होती आणि ही वीज पुन्हा कधी जाईल याचा काही भरवसा नव्हता. त्यामुळे तीचा आता काही एक उपयोग नव्हता...

     आता थंडी कमी जाणवू लागली होती. उत्साहाच्या भरात, "आज कुछ तुफानी करते है" म्हणत, अशा थंडीत, थंड पाण्याने आंघोळ तर केली पण त्याचा काही दुष्परिणाम झाला तर...? आता माझ्या डोक्यात हे विचार येऊ लागले. पण "जेव्हा होईल तेव्हा पाहू" या विचाराने सामानाची बांधा-बांध केली आणि विमानतळावर जायला निघालो.

     त्यानंतर पुढचा प्रवासही व्यवस्थित झाला आणि हि पोस्ट लिहीत असताना नुकत्याच सलग आलेल्या ३ शिंका सोडल्या तर, आत्त्तापर्यंत तरी मी धड-धाकट आहे. पुढचे देव जाणे...!!! असा हा माझा एक तुफानी अनुभव...!!! तुमचाही असा काही तुफानी अनुभव असेल तर नक्की सांगा...!!!