माझं विमान प्रेम : भाग २ वरून पुढे चालू...
तर एकदाचे आमचे विमान नागपूर विमानतळाच्या धावपट्टीवर येऊन पोहोचले आणि (माझ्या पहिल्या) उड्डाणासाठी तयार झाले. मनातली धड-धड वाढत होती. पावसाने उघडीप दिली असली तरी काळ्या ढगांची दाटी होतीच आणि अशामध्ये विमानाने धावायला (वेळ स. ८:४०) सुरुवात केली व क्षणार्धात तुफान वेग पकडला.
त्या वेगात विमानाने पुढचे चाक हवेत उचलले, कारण त्या वेळी हलकासा छातीवर दाब आल्यासारखा होतो आणि शेवटी तो क्षण आलाच, जेव्हा विमानाने हवेत झेप घेतली. काय मस्त अनुभव होता तो...!!! मी खिडकीतून पाहात होतो तशी जमीन माझ्या पासून दूर जात होती आणि मी अक्षरशः उंच उंच जात होतो. काही क्षणात जमीन दिसेनासी झाली कारण आम्ही आता त्या काळ्या ढगांच्या गुफेत जात होतो. संपूर्ण विमानात मंद लाईट सुरु होती आणि आम्ही पूर्णपणे त्या काळ्या ढगात हरवून गेलो होतो. एखाद्या खोल/अंधाऱ्या गुफेत जाताना जी अवस्था होते तशी काहीशी माझी अवस्था झाली होती.
काही क्षण असेच अंधारातच गेले. मी विमानाच्या पंखाकडेच बघत होतो आणि मनात एकच (कर्मदरिद्री) विचार... "विमानातील पेट्रोल आता अचानक संपलं तर....? खड-खड-खड-खड.... ज्या वेगाने वर आलोय त्या पेक्षा दुप्पट वेगाने खाली जाऊ..." हळू-हळू तो बाहेरचा अंधार कमी होऊ लागला आणि आमचे विमान त्या अंधाऱ्या काळ्या ढगांच्या गुफेतून बाहेर आले. तुम्ही जर The Matrix Revolutions हा चित्रपट पाहिला असेल तर तुमच्या लक्षात येईल कि निओ आणि ट्रिनिटी जेव्हा मशीनच्या शहरात जातात तेव्हा त्यांचे यान मशीन्सना चकवण्यासाठी सरळ वरती उडत राहते आणि शेवटी काळ्या ढगांच्या पलीकडे गेल्यावर ट्रिनिटीला एक सुंदर असा सूर्याचा (निसर्गाचा) नजारा पाहायला मिळतो (कारण निओ त्यावेळी आंधळा झालेला असतो) अगदी तसच काहीस बाहेरच वातावरण होत. बाहेरचा तो स्वच्छ सूर्यप्रकाश आणि खाली पावसाचे काळे ढग अशा वातावरणात आमचे विमान आता स्थिर होण्यास सुरुवात झाली होती.
खाली पावसाने बरसायला सुरुवात केली असावी कदाचित पण आता आम्ही त्या ढगांच्या वरती आलो होतो. तिथे पांढऱ्या शुभ्र, कापसासारख्या, ढगांची मखमली गादीचं पसरली आहे कि काय असे वाटत होते. काही वेळाने त्या काळ्या ढगांचे अस्तित्वही नाहीसे झाले आणि सर्वत्र केवळ मखमली गालिचाच दिसत होता. त्या पांढऱ्या ढगांचे वेग-वेगळे आकार. जसे आपल्याला खालून दिसतात, हत्ती, घोडा आदी, तसेच पण खूप मोठे. विमानाने हलकेच वळण घेतले तेव्हा पोटात झालेल्या गुदगुल्या... बराच वेळ विमानात बसल्याने कान जड होऊ लागतात. मग जांभळ्या देऊन तो जडपणा घालवावा लागतो. अशा साऱ्या गमती-जमतीत तासा-दीड तासाचा वेळ कसा गेला ते कळलंच नाही आणि मग पुन्हा एक सूचना घुमली कि, "आपण आता थोड्याच वेळात इंदौरच्या विमानतळावर पोहोचणार आहोत. कृपया आपल्या खुर्चीच्या पेट्या बांधून घ्या."
अगदी पहिल्या विमानप्रवासापासून मला एक सवय आहे कि, मी शक्यतो माझ्या खुर्चीचा पट्टा काढत नाही. अगदी Transit time (मधल्या एखाद्या विमानतळावर थांबण्याची वेळ) मध्ये सुद्धा. त्यामुळे या सूचनेचा मला काही विशेष फरक पडला नाही. आता विमानाने हळू-हळू उतरायला सुरुवात केली होती. पांढऱ्या गर्द ढगांची व्याप्ती हळू-हळू विरळ होत चालली आणि खालची जमीन दिसू लागली. "बापरे, किती उंचीवर होतो आपण...!!!" खालून उंचच उंच वाटणाऱ्या इमारती पत्त्याच्या संच्याएवढ्या वाटत होत्या आणि शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या पाण्याच्या टाक्या तर एखाद्या कंदिलासारख्या दिसत होत्या. जस-जसे विमान खाली उतरू लागले तस-तसा पोटात हलकासा गोळा जाणवू लागतो. जमीन जशी जवळ येऊ लागली तसा विमानाचा वेग जाणवू लागला. जबरदस्त...!!!
विमान तसे छोटे असल्याने, Landing Gear बाहेर निघाल्याचे त्याच्या हवेत बसलेल्या धक्क्याने समजले. छोटे अशासाठी कि तोपर्यंत मी Boeing विमान पाहिले नव्हते. त्यामुळे माझ्या साठी ते त्या वेळेला मोठेच होते. विमान एकदाचे जमिनीला टेकले आणि काय सांगू कल्पनातीत वेगाला काय खीळ बसू लागली. थोडक्यात brakes लागले आणि विमानाचा वेग कमी कमी होऊन साधारण झाला.
इंदौर विमानतळावर लोक उतरले आणि विमानात आता मी व एखाद दुसराच कोणी तरी असे शिल्लक राहिलो. या काळात पुन्हा किंगफिशरच्या कर्मचार्याकडून आमच्या (विमानाच्या आतल्या) बोर्डिंग पासची तपासणी झाली. यालाच Transit Check म्हणतात. मग इंदौर मधली पुण्याला जाणारी मंडळी आत आली आणि विमान पुन्हा भरलं गेलं व उड्डाणासाठी सज्ज झालं. माझ्या बाजूची जागा एव्हाना रिकामी झाली होती. आता या वेळेस उड्डाणाची, पहिल्या वेळेसारखी, भीती नव्हती तर आनंद होता. मजा वाटत होती. विमानाने पुन्हा उड्डाण करून पुण्याच्या दिशेने झेप घेतली. या काळात विमानात खायला देण्यात आले. काही वेळात आम्ही पुण्याजवळ आलो. विमान उत्तरेकडून येत असल्याने आणि पुणे विमानतळाची धावपट्टी पूर्व-पश्चिम पसरली असल्याने विमानाला हवेत एक चांगले वळण घ्यावे लागते आणि त्या काळात पुण्याचे उंचावरून मस्त दर्शन होते.
तर असा हा माझा पहिला विमान प्रवास...
त्यानंतर बरेच विमान प्रवास झाले, केवळ GoAir आणि Air Asia या दोन विमान कंपन्या सोडल्या तर भारतात (Domestic) चालण्याऱ्या सर्व विमान कंपन्यांच्या विमानामधून प्रवास केला. पण सर्व केवळ Boeing च. प्रत्येक प्रवासाच्या अशाच सुरेख आठवणी माझ्या मनात आहेत. पण मला सगळ्यात जास्त मजा येते ती जम्मू ते श्रीनगर या केवळ २५ मिनिटांच्या प्रवासात. कारण याच काळात हिमालयाचे इतके मनोहारी रूप दिसते कि काय सांगू...!!! फक्त पायलटने व्यवस्थित मार्ग निवडला पाहिजे कारण माझ्या काही दिवसांपूर्वीच्या प्रवासात, मार्ग वेगळा असल्याने, मला ते काही व्यवस्थित दिसले नव्हते. पण जर तुम्ही श्रीनगर वरून पूर्वेकडे म्हणजे चंदिगढ किंवा डेहराडून कडे जात असाल तर मात्र खिडकी अजिबात चुकवायची नाही. कारण हा सर्व प्रवास हिमालयाच्या त्या मनोहारी रूपाचे दर्शन देणाराच असतो.
खरं तर आता मला विमान चालवायला शिकावस वाटत आहे. त्या संबंधीची बऱ्यापैकी माहिती पण काढली आहे. पण त्याचा एकूण खर्च आणि लागणारा वेळ पाहता तूर्तास तरी ते शक्य नाही. बघू पुढे कधी आणि कसे जमते कि नाही ते. सध्या तरी इथेच थांबतो. कंटाळा आला असेल तर एकदा तरी विमान प्रवास करून स्वतः अनुभव घ्या.. आणि काही चुकलं असेल तर माफ करा...
भाग समाप्त... पण प्रेम नाही....
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा