आज या पोस्टमध्ये आपण शिक्षणाबद्दलची आजची समाज मानसिकता याबद्दल थोडसं उहापोह करुयात. शिक्षण पध्दतीबद्दल नाही. तर व्यक्ती शिक्षित आहे म्हणजे नेमके काय आणि शिक्षणाबद्दलची लोकमानसिकता याबद्दलचे "माझे विचार"...!!!
प्रथमतः माझी शिक्षणाविषयीची व्याख्या तुम्हांस सांगतो...
शिक्षण असणे म्हणजे केवळ पदवी असणे नव्हे. विचार करणे, प्रश्न निर्माण होणे आणि त्यांची योग्य उत्तरे मिळविण्याची धडपड करणे हेच खरे शिक्षण...
आता वरील व्याख्या मी मानतो. कदाचीत एखादा/दी हे मान्य करणार नाही. त्याला माझा आक्षेप नाही.
आता मला असं का वाटलं यावर थोडासा प्रकाश टाकू... हे करत असताना मी एक वैज्ञानिक आणि एक अध्यात्मिक उदाहरण/विचार मांडणार आहे.
सुरुवातीला वैज्ञानिक दाखला पाहू...
तर आपल्याला माहित आहेच कि जगप्रसिध्द वैज्ञानिक अल्बर्ट आईनस्टाईन यांनी थेअरी आॅफ रिलेटिव्हिटी (Theory of Relativity) चा (सन 1905) सिध्दांत मांडला होता, ज्याद्वारे प्रकाशाच्या वेगाचे, आणि एकूणच सर्व गतिमान वस्तूंच्या वेगाचे, अचूक मापन करण्यात आले. पण त्याच्या जवळपास सव्वा दोनशे वर्षांपूर्वीच न्यूटनने प्रकाशाच्या वेगाचे मापन करत असताना, प्रकाश हा कणांनी (particles) बनलेला असून, अंतराळात सर्वदूर पसरलेल्या ईथर (Ether) मधून तो सर्वत्र प्रवास करतो असा सिध्दांत मांडला होता आणि तो सर्व जगाने मान्य पण केला होता. या काळापर्यंत मानवाने अवकाशात झेप घेतली नव्हती (1957 साली सोव्हिएत युनियनने स्फुटनिक नावाचा उपग्रह अवकाशात सोडला आणि मानवाला अवकाशाचे दार खुले झाले.). त्यामुळे अवकाश हे निर्वात (Empty) आहे की खरंच काही ईथर नावासारखा पदार्थ तेथे सर्वत्र पसरला आहे याचा सबळ/प्रत्यक्षदर्शी पुरावा आपल्याकडे नव्हता. वैज्ञानिक जमिनीवर राहूनच केवळ निरीक्षण (Observation) आणि प्रयोगांद्वारे (Experiments) काही सिध्दांत (Theorems) मांंडत होते आणि ते (Experimental Results) जोपर्यंत सर्वत्र लागू होत असत, तोपर्यंत त्यांवर आक्षेप घेतला जात नसे. त्यामुळे जवळपास सव्वा दोनशे वर्ष अंतराळात ईथर पसरलेला आहे असा एक सर्वमान्य समज होता.
खरे पाहता, अल्बर्ट आईनस्टाईनसुध्दा हीच थेअरी शिकून स्वीस मधील पेटंट आॅफिसमध्ये कारकून (Clerk) म्हणून काम करत होते. पण त्यांच्या मनात या अवकाशात पसरलेल्या ईथरविषयी "शंका" निर्माण झाली आणि ही ईथरची संकल्पना कशी बिनबुडाची आहे हे सांगणारा एक पेपर त्यांनी प्रकाशित केला. इतक्यावरचं शांत न राहता अनेक प्रयोगांद्वारे त्यांनी ते सिध्दही करून दाखविले. आज आपण पाहतोच आहोत की आईनस्टाईन बरोबर होते. पण याचा अर्थ न्यूटन चुकीचे नव्हते. कालपरत्वे न्यूटन यांना काही गृहितक (Assumptions) मानावे लागले आणि त्याद्वारे त्यांनी प्रकाशाचे आणि त्याच्या वेगाचे जे स्पष्टीकरण दिले ते बहुतांशी आजच्या स्पष्टीकरणाशी मेळ खाते. जर आईनस्टाईनच्या मनात न्यूटनच्या थेअरीविषयी शंका आली नसती तर प्रकाशाच्या वेगाचे, अंतराळातील घटकांच्या वेगाचे अचूक निदान करणे शक्य झाले असते काय?
आता दुसरा दाखला आपण आध्यात्मिक पाहू...
असे म्हटले जाते, जेव्हा एखादा मानवी जीव आईच्या पोटात हुंकार भरत असतो तो हुंकार जर आपण लक्ष देऊन ऐकला तर तो म्हणत असतो, "कोSहम्?" म्हणजे "कः अहम्(मी कोण आहे)?" तो एक मानवी जीव आहे हे माहित असूनही तो ही शंका का घेतो? अध्यात्मात मनुष्य जीवालाच श्रेष्ठ का मानले गेले? मानवी जीवालाच मुक्ती का प्राप्त होते? असे अनेक प्रश्न सर्वसामान्यांपासून, सर्वश्रेष्ठ (अध्यात्मिक, योगी, ज्ञानी) लोकांना नेहमी पडत असतात आणि या प्रश्नांची उत्तरं सर्वचजण आपापल्या परीने हुडकत असतात. मग संत ज्ञानेश्वरांसारखे त्यासाठी आपल्या गुरुंकडे, निवृत्तीनाथांकडे, या शंका घेऊन आपला पारमार्थिक सोपान सुकर करुन घेतात तर संत तुकाराम खुद्द विठ्ठलालाच या शंका विचारतात. मग शंका येणं चुकिचं कसं ठरु शकतं? लौकिकर्थाने संतमंडळी कधी शाळेत गेली नाहीत. मग त्यांचे शिक्षण नव्हते असे आपण म्हणतो का? असे असेल तर, त्यांचे अभंग, कविता, चारित्र्य आपण शाळेत, महाविद्यालयात अभ्यासासाठी का घेतो?
मानवी मन म्हटलं की शंका या येणारचं. स्वामी विवेकानंदांनी एके ठिकाणी म्हटलं आहे, "जर दिवसभरात तुम्हांला एकही अडचण आली नाही तर तुमचा प्रवास नक्कीच चुकीच्या दिशेने होत आहे आणि जर तुम्हांला दिवसभरात एकही शंका आली नाही तर तुम्ही दिवसभरात एकही नवी गोष्ट शिकला नाहीत." ज्या प्रश्नांच्या मागे आपण झपाटून लागत नाही, त्याशिवाय आपल्याला नवीन ज्ञान कसे प्राप्त होणार?
आपण जर व्यवस्थित निरीक्षण केलं तर सर्वात जास्त शंका कोणाला येतात, तर त्या लहान मुलांना. कारण नाविन्याची आवड आणि शिकण्याची क्षमता त्यांच्यात प्रचंड असते. पण पु. लं. च्या भाषेत सांगायचं झालं तर आपली "गप्प बसा संस्कृती" असल्याने आपण त्यांच्या किती प्रश्नांना उत्तरे देतो? मग उत्तरंच मिळत नसतील तर लहान मुलांचा भ्रमनिरास नाही का होणार? त्यांचे मन नवीन विचार कसा करु शकणार? आईनस्टाईनला पडला तसा प्रश्न यांना कसा पडणार? "बाबा वाक्यंं प्रमाणम् (पूर्वापार जे चालत आले आहे ते योग्यच आहे)" या न्यायाने ते तसेच चालत राहणार. मग प्रगती कशी होणार?
तसेच नात्यांमध्येही आपल्याला अनेकदा काही शंका येतात. त्यांचही असंच बोलून, प्रसंगी कृतीमधून, निरसन झालं तर नात्याचे नवीन पैलू आपल्याला नाही का दिसणार? हे पण एक प्रकारचे शिक्षणच नाही का? शंका घेणाऱ्या व्यक्तीच्या जागी स्वतःला ठेवून, "ती शंका का आली?", "ती कशी दूर करता येईल?", असा विचार करण्याची ताकद शिक्षणामुळेच मिळते ना? हां, पण नात्यांमध्ये शंका येणे म्हणजे हलक्या कानाचे होणेे (कोठेतरी, कोणाचे तरी ऐकून शंका घेणे) असे अजिबात नाही. जे तुम्ही स्वतःच्या डोळ्याने पाहिले, स्वतः जाणून घेतले, केवळ त्याच गोष्टींविषयी प्रश्न करावेत. इतर गोष्टींसाठी नात्यांमधील विश्वास आणि मोकळा संवादच महत्वाचा असतो.
त्यामुळे "तुम्ही शंकाच कशी घेतली?" हा प्रश्न कसा गैरलागू आहे हे तुमच्या लक्षात येईल. कसं असतं, आज-काल इतकी महाविद्यालये (Colleges) झाली आहेत की, कोणत्याही पदवीसाठी, कोणालाही प्रवेश घेणं सोपं झालयं...!!! मेरीट अथवा पात्रतेची फारशी आवश्यकता नाही. पैसा असेल तर राखीव व्यवस्थापन जागांमधून (Management Quota) मधून किंवा मग दूर कुठल्यातरी अशाच लहान-मोठ्या, नवख्या महाविद्यालयात कोणालाही कुठल्याही पदवीसाठी प्रवेश घेता येतो. थोडाफार रट्टामार करुन पदवी पण मिळविता येते. पण त्या ज्ञानाचा वापर ठोकताळ्यासारखा करायचा, आणि चार लोकांकडून कौतुक ऐकायचे, कि विचारपूर्वक प्रगतीसाठी, सर्वांगीण उत्कर्षासाठी करायचा हे ज्याने त्याने ठरवायचे असते. आता शंका विचारल्याने लगेच सगळेच काही आईनस्टाईन नाही होत पण आपली मनं शंकामुक्त होऊन सत्कार्यासाठी नक्कीच लावू शकतो.
पदवीमुळे एखाद्या विषयाची आपल्याला ओळख होऊ शकते. फार फार तर थोडं-बहुत ज्ञान मिळालं असं आपण म्हणू शकतो. पण म्हणजे आपण सर्वज्ञ झालो असे नाही. मी अभियांत्रिकी (Engineering) ची पदवी घेतली आहे म्हणजे मला त्याचे संपूर्ण ज्ञान आहे असे म्हणणे किती चुकिचे ठरेल हे आपण समजू शकता. खुद्द न्यूटन एका मुलाखतीत म्हणाले होते, "वाळवंटातील एका वाळूच्या कणाइतकीच मला विज्ञानाची माहिती आहे." मग आपल्यासारख्या पामरांनी त्या पदवीच्या कागदाचा का आणि कसला गर्व धरावा?
आता मला सांगा केवळ एखादी पदवी असणं म्हणजे शिक्षण असणं असं म्हणणं कितपत योग्य? वरील केवळ माझे विचार आहेत. त्यामुळे त्यांच्याशी सगळे सहमत होतीलच असे नाही. त्यामुळे नेहमीप्रमाणे शेवटी, चूक भूल द्यावी घ्यावी...!!! विचार करा आणि विचारांच्या प्रवाहाला अडवू नका...!!!
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा