शनिवार, ४ नोव्हेंबर, २०१७

देवपद आणि गुरुपद

मंत्रीपद, चिटणीसपद, अध्यक्षपद अशा अनेक पदाला पोहोचल्या गेलेल्या व्यक्ती आपण पाहतो. नाही म्हटलं तरी प्रत्येकाला काही ना काही तरी पद हे चिटकलेलेच असते. पण हे पद म्हणजे तरी काय? व्यवहाराच्या दृष्टीने ती जागा भूषविणे..!!! म्हणजे अध्यक्षपदी असलेली व्यक्ती, अध्यक्षस्थान भूषविते. इतका साधा सरळ त्याचा अर्थ आहे. 

पण, देवपद किंबहूना काही बाबतीत गुरुपदसुध्दा, म्हणजे अनुक्रमे देव किंवा गुरू होणे असू शकते काय? उदा. एखाद्या व्यक्तीला आपण गुरू मानतो आणि आदराने आपण त्यांचा उल्लेख, "ते/त्या मला गुरुस्थानी किंवा माझ्यासाठी गुरुपदी आहेत", असा करतो. 
तसेच एखाद्या व्यक्तीच्या चांगल्या वागण्याने ती व्यक्ती "देवपदाला" पोहोचली असे म्हणतो. 

आता वरील दोन्ही व्यक्ती खरंच अनुक्रमे गुरु आणि देव बनते का? माझ्या मते नाही. कारण, गुरू या नावातच खरं तर मोठेपण दडलंय आणि देवात देवत्व....!!! त्यामुळे गुरु कोणाला म्हणावे अन् केवळ चमत्कार करणाऱ्यालाच देवत्व बहाल करावे का हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. 

देवपद आणि गुरूपद अशी संकल्पना आहे कि, ती व्यक्ती त्या पदाला (चरणाला/पायांना) पोहोचली, न की ते स्थान भूषविले...!!! आता असे मला वाटते, बरं का... उगाच गैरसमज नसावा. कारण देवाला पाहणाऱ्या अथवा पाहिलेल्या फारच कमी व्यक्ती आहेत आणि ज्या व्यक्तीला आपण गुरुपदी मानतो त्या व्यक्तीच्याही गुरुपदी कोणी तरी असतेच/असेलच नाही का? गुरुंचे गुरु असणाऱ्या श्री गुरुदेव दत्तांनीही आपल्या अवतार कार्यात आपले २४ गुरु केले/मानले. देव आणि गुरू असे दोन्ही स्थान भूषविणाऱ्या श्री गुरुदेव दत्तांशी कोणी बरोबरी करू शकत असेल तर ते खुद्द श्री गुरुदेव दत्तच असे मला वाटते. फार तर एखादी व्यक्ती गुरुपदाला किंवा देवपदाला पोहोचली म्हणताना, गुरुंच्या आणि देवाच्या चरणाला पोहोचली असा अर्थ होईल. 

थोडंसं अध्यात्मिक आहे, त्यामुळे बरोबर की चूक हे ही माहित नाही, पण, भक्ती सर्वात श्रेष्ठ...!!! भक्ती म्हणजे लीनता आणि लीन चरणांवरच होतात. थोडक्यात, स्थान भूषविण्यापेक्षा, "पदां"वर लीन होणं श्रेष्ठ नाही का? 


बुधवार, १८ ऑक्टोबर, २०१७

कविता : एक दिवा त्यांचे घरी

एक दिवा त्यांचे घरी, 
लढती जे सीमेवरी |
व्हावी सुखी दिवाळी साजरी, 
सुख स्वतःचे कुर्बान करी ||१||

एक दिवा त्यांचे घरी, 
समाजसेवेचे व्रत धरी |
वाटून अर्धी आपली भाकरी, 
भुकेल्यांचे पोट भरी ||२||

एक दिवा त्यांचे घरी, 
काळ्या आईची सेवा करी |
जरी निसर्ग झाला लहरी, 
उपाशी पोट, मुद्रा हसरी ||३||

एक दिवा त्यांचे घरी, 
नसेल कर्ता ज्यांचे घरी |
कोणी लढाई, कोणी कर्जबाजारी, 
आप्त एकले त्यांच्या माघारी ||४||

हर्षे करू दिवाळी साजरी, 
सुख, मांगल्य आपुल्या दारी |
दिसता अभागी कोठे जरी, 
लावू दिवा त्यांचे घरी ||५||

.||. शुभ दिपावली .||.


--- जयराज 

गुरुवार, १२ ऑक्टोबर, २०१७

माझे आवडते वाद्य

संगीत आणि लहान मुलं यांच परमेश्वराशी काही अनोखं नातं असावं असं मला नेहमी वाटत आलं आहे. दोन्हीही निष्कपट, निष्कलंक आणि त्यांच्या लीलाही तितक्याच मनोहारी...!!! मला तर असं वाटतं कि परमेश्वराने आधी संगीत निर्मिले आणि मग, ते संगीत ऐकत, विश्वाची उत्पत्ती केली असावी. त्या सुंदर संगीताचेच सार आणि त्याची व्यापकता, विशालता या विश्वात ठायी-ठायी उतरलेली दिसते.  

स्वर आधी कि नाद या कोड्यात न जाता मी संगीताला नेहमीच पूजत आलो आहे. मला स्वर, राग यांची माहिती नक्कीच कमी असेल किंबहुना काहीच नसेल, पण खरंच जेव्हा एखादं श्रवणीय संगीत ऐकू येतं, तेव्हा मी भान हरपून जातो. अशी दिव्यत्वाची प्रचिती आपल्यापैकी अनेकांनीही घेतली असेल. 

झाडांच्या पानांची सळ-सळ, वाऱ्याचा वाहताना येणारा आवाज, पक्ष्यांची किलबिल, गाड्यांची वाहतूक, मनुष्य, प्राण्यांची गर्दी अशा सर्वच ठिकाणी नाद आणि पर्यायाने संगीत आहे. जिथे हालचाल आहे, तिथे संगीत आहे. जिथे हालचाल आहे, तिथे चैतन्य आहे. अर्थात, जिथे संगीत आहे, तिथे चैतन्य आहे. 

मला स्वरही आवडतात आणि नादही आवडतो. पण स्वरांपेक्षा माझा ओढा नादाकडेच अधिक..!!! तो नाद जर "संतूर" मधून येत असेल, तर माझे मन भान हरपूनच जाते. सोबतीला तबला असेल तर स्वर्ग मजसाठी दोन बोटेच...!!! 

संतूरमधून येणारा हळुवार नाद मनावर मोहिनी टाकतो. मनाच्या एका कोपऱ्यात लपलेल्या आपल्या अंतरात्म्याला हळुवारपणे साद घालतो. परमेश्वराच्या समीप नेतो. 

पं. शिवकुमार शर्मा हे एक अग्रगण्य संतूर वादक...!!! त्यांचा मुलगा राहुल शर्मा हे पण संतूर वादकच...!!! एके रात्री त्यांचं (राहुल शर्मा) संतूर वादन मी TV वर पाहत बसलो होतो. संपूर्ण एक तास तो कार्यक्रम मी, स्तब्ध होऊन, बघत होतो. खरं तर अनुभवत होतो. त्या रात्रीच मी संतूर वाद्याचा दिवाना, भक्त झालो. 

आता काहींना असे वाटेल कि मी आता संतूर शिकायला सुरुवात करतो कि काय? पण तसे काही नाही. तो माझा विचार पण नाही. कारण अशाने, "मला हे वाजवता येतं" या अहंकाराने, मी त्या वाद्याची मधुरता आस्वादण्याचे विसरून जाईन, असे मला वाटते. लीनता आल्याव्यतिरिक्त मी त्याचा आस्वाद कसा घेऊ शकेन? पंच-पक्कवान्नाचा आस्वाद घ्यायचा असेल तर आपल्याला मान वाकवुनच घास घ्यावा लागतो. प्रिय व्यक्तीपुढे, दिव्यत्वापुढे मान झुकतेचं. परमेश्वराची भक्ती मान झुकवुनच केली जाते. 

मीरा-राधेने श्रीकृष्णाला, हनुमान-शबरीने श्रीरामांना, भक्ताने परमेश्वराला अनुभवावे, पहावे तसे मला या वाद्याप्रती अनुभवायचे आहे. 

या वाद्यासोबत तबल्याची साथ असेल तर येणारी रंगात काही औरच...!!! तबल्याच्या कणखरपणात याचा मंजुळ स्वर मिसळला कि कर्णमधुरता आणखी वाढते. पुरुषाला प्रकृतीची साथच जणू...!!! मंजुळ बासरीच्या स्वरात संतूरचा स्वर कोलाहल वाढवणारा न होता आणखीनच मंजुळ होतो...!!! पं. शिवकुमार शर्मा आणि पं. हरिप्रसाद चौरसिया यांची जुगलबंदी ऐकाच....!!! जसा सुंदर आवाज ऐकताना आपल्याला स्वर्गीय गंधर्वांची आठवण येते, तसेच हि जुगलबंदी ऐकतानाही स्वर्गसुखाची अनुभूती येते...!!!

अनेक विमान लँड झाल्यावर, transit-time मध्ये जे संगीत वाजवतात ते हेच संतूर, तबला, बासरी यांचं fusion असतं. ते मला नेहमीच आवडतं. पण यामध्ये एक वाद्य संतूर असतं, हे मला आता त्या रेकॉर्डिंग्स ऐकताना आठवू लागलं आहे.

एक शब्दही न बोलता, संतूर माझ्याशी खूप काही बोलून जातं. प्रेम व्यक्त करायला शब्दांची गरज नसते, हे ही शिकवून जातं. स्पर्श न करताही रोमांच उभं करतं. अस्थिर मनाला स्थिर करतं. दुःख दूर सारून सुखाची अनुभूती देतं. 

माझे शब्द, माझी पुस्तकं, गीत-संगीत, थोडेच असलेले जवळचे लोकं इतकीच माझी संपदा...!!! त्यात आता संतूरचीही भर पडली आहे. तुम्हीही संगीताचा आस्वाद घ्यावा... आणि हो, संतूरच्या रेकॉर्डिंग्स असतील तर मला जरूर पाठवा...!!! 


शुक्रवार, १८ ऑगस्ट, २०१७

कविता : आयुष्य माझं थोर आहे

आयुष्य माझं थोर आहे,
कारण माझं पाप फार आहे ।
रौरवापेक्षा भयंकर नरक,
देव बनवण्यात व्यस्त आहे ।।१।।

आयुष्य माझं थोर आहे,

ऐऱ्या-गैऱ्यानेही मजवर घसरावे,
अडाण्यानेही माझे शिक्षण काढावे ।
इतकं सारं आलबेल आहे,
जगणं माझं कवडीमोल आहे ।।२।।

आयुष्य माझं थोर आहे, 

कोणीही यावे, कसेही बोलावे,
मी मात्र संयमानेच वागावे ।
लाथाडण्यास मज, तुला अधिकार आहे,
माझं ओरडणं मात्र कठोर आहे ।।३।। 

आयुष्य माझं थोर आहे,

पापं माझी पाहताना,
बंद डोळे देवाचेही उघडे ।
घडलीच सत्कर्मे कधी चुकून,
तेव्हा मात्र "देवशयनी" आहे ।।४।।

आयुष्य माझं थोर आहे,

पापीही मजसमोर देव आहे,
अपराध तयाचे न्यून आहे ।
मन मोडणे तुला माफ आहे,
मी मात्र निष्ठूर आहे ।।५।।

आयुष्य माझं थोर आहे,

भोग भोगणे चालूच आहे,
सध्या तर गतजन्मीचे आहे ।
हयातीचे अजून बाकीच आहे,
पापाचा घडा तुडुंब वाहे ।।६।।

आयुष्य माझं थोर आहे,

संस्कार, विकार सारेच सारखे,
न घडल्या चुकीचेही फटके ।
नियती अन देवांचे रंजन,
जगणेच माझे क्रूर खेळ आहे ।।७।।

आयुष्य माझं थोर आहे... 

--- जयराज 


मंगळवार, १ ऑगस्ट, २०१७

काही सुभाषितं : भाग ३

================================================
१. वृथा वृष्टिः समुद्रेषु ।
वृथा तृप्तस्य भोजनम् ।
वृथा दानं समर्थस्य ।
वृथा दीपो दिवाऽपि च ।।

अर्थ: समुद्रात पाऊस, पोट भरल्या व्यक्तीस जेवण देणे, श्रीमंत व्यक्तीस दान देणे आणि दिवसा दिवा लावणे व्यर्थ आहे. 
================================================
२. आकाशात पतितं तोयं, यथा गच्छति सागरम् ।
सर्व देव नमस्कार:, केशवं प्रति गच्छति ।।

अर्थ: आकाशातून पडलेले पाणी जसे सागरास मिळते. तसे, सर्व देवांना केलेला नमस्कार केशवाला सुद्धा पोहोचतो. 
===============================================
३. अंजलिस्थानी पुष्पाणि, वासयन्ति करद्वयम् ।
अहो सुमनसाम् प्रीती, वामदक्षिणायॊ: समा ।।

अर्थ: ओंजळीत घेतलेली फुले दोन्ही हातांना सुगंधित करतात. खरेच फुलांची प्रीत काय वर्णन करावी, डावे-उजवे दोहोंसाठी समान...!!!
याचा भावार्थ असा कि, फुलांसारखे कोमल व स्वच्छ मन असणाऱ्या व्यक्ती कधीही आपलं-परकं, चांगलं-वाईट असा भेद न करता सर्वांना सारखे महत्व आणि प्रेम देतात. 
================================================
४. अश्वम् नैव गजम् नैव, व्याघ्रम् नैव च नैव च ।
अजापुत्र बलिं दद्यात, देवो दुर्बल घातक: ।।

अर्थ: घोडा नाही, हत्ती नाही आणि वाघ तर मुळीच नाही. बोकडाच्या पुत्राचा बाली दिला जातो. देव सुध्दा दुर्बलांचाच घात करतो. 

अर्थात, जो सामर्थ्यवान आहे त्याचीच देव सुध्दा मदत करतो, अशा अर्थाचा हे सुभाषित. दैवाची/देवाची मदत मिळविण्याआधी स्वत: स्वतःची मदत करणे आवश्यक असते. "प्रयत्नांती परमेश्वर" असा याचा भावार्थ आहे. 
===============================================
५. कुजतं राम रामेती ,मधुरं मधुराक्षरं ।
आरूह्य कविता शाखां, वंदे वाल्मिकी कोकिलं ।।

अर्थ: कवितेच्या शाखेवर आरूढ होऊन, राम-राम अशा मधुर अक्षरांचा मधुरपणे कुंजन (जप) करणाऱ्या कोकीळरूपी वाल्मिकी ऋषींना नमस्कार असो. 
वाल्मिकी ऋषींनी रामायण पद्य (कविता/सुभाषित/श्लोक) स्वरूपात लिहिले असल्याने रामायणाचा "कविता शाखा" तर वाल्मिकींचा कोकीळ असा सुंदर उल्लेख बुध कौशिक ऋषी करतात. 
===============================================
६. राम रामेती रामेती, रमे रामे मनोरमे ।
सहस्त्रनाम ततुल्यं, रामनाम वरानने ।।

अर्थ: राम राम असा जप करत त्यामध्ये मन रमविणे हे विष्णुंच्या सहस्त्र नाम जपण्यासारखे आहे.
===============================================
७. भर्जनम् भव बीजानां, अर्जनं सुख संपदाम् ।
तर्जनं यमदूतानां, रामरामेती गर्जनम् ।।

अर्थ: भव-सागरातील (संसारामधील/जगामधील) सर्व दुःखांचा समूळ नाश करण्यासाठी,  सुख-संपदा (भौतिकापेक्षा आत्मिक अर्थाने घ्यावी) मिळविण्यासाठी, यमदूतांना घाबरवण्यासाठी (मरणाची भीती घालवण्यासाठी), राम राम असे म्हणावे. 
कदाचित याच कारणासाठी अंत्ययात्रेत रामनामाचा जप करत असावेत. 
===============================================
८. दक्षिणे लक्ष्मणो यस्य, वामे तु जनकात्मजा ।
पुरतो मारुतिर्यस्य, तम् वन्दे रघुनंदनं ।।

अर्थ: ज्याच्या उजव्या (दक्षिण) बाजूस लक्ष्मण आणि डाव्या (वाम) बाजूस जनकपुत्री (माता सीता) आहे. ज्याच्या समोर (पुरत:) मारुती आहे अशा रघुनंदनाला (प्रभू श्रीरामांना) नमस्कार असो...!!!
===============================================
९. श्रीरामचंद्रचरणौ मनसा स्मरामि ।
श्रीरामचंद्रचरणौ वचसा गृणामि ।
श्रीरामचंद्रचरणौ शिरसा नमामि ।
श्रीरामचंद्रचरणौ शरणं प्रपद्ये ।।

अर्थ: श्रीरामचन्द्राच्या चरणांचे मी मनात स्मरण करतो, श्रीरामचन्द्राच्या चरणांचे मी वाणीने कौतुक करतो, श्रीरामचन्द्राच्या चरणांवर मी माथा टेकवून नमन करतो, (आणि) श्रीरामचन्द्राच्या चरणांपाशीच मी शरण जातो. 
===============================================
१०. रामो राजमणि: सदा विजयते, रामं रमेशं भजे ।
रामेणाभिहता निशाचरचमू:, रामाय तस्मै नमः ।।
रामान्नास्ती परायणं परतरं, रामस्य दासोSस्म्यहं ।
रामे चित्तलय: सदा भवतु मे, भो: राम माम उद्धरम् ।।

अर्थ: राजांमध्ये श्रेष्ठ (राजमणी) अशा श्रीरामांचा नित्य विजय होतो. सीतापती (रमेश=रमा+ईश, रमेचा देव, रामाची पत्नी म्हणून रमा) रामाचे भजन करा. श्रीरामांकडून राक्षसांचा (निशाचर चमू = रात्री टोळीने भटकणारे उर्फ राक्षस) नाश झाला, त्यामुळे/अशा श्रीरामांना नमस्कार,वंदन असो...!!! 
श्रीरामांपेक्षा मोठा असा कोणताही आश्रय नाही. मी श्रीरामांचा दास आहे. माझे मन रामातच (रामनामातच) लीन असावे. हे प्रभू श्रीराम, माझा उद्धार करावा...!!!
==============================================
सुभाषित क्र. ५ ते १० रामरक्षा स्तोत्रातील श्लोक आहेत. 
===============================================
११. दुःखेश्वनुद्विग्नमना:, सुखेषु विगतस्पृहः ।
वीतरागभयक्रोध:, स्थितधीर्मुनिरुच्यते ।।

अर्थ: दुःखामुळे जो उद्विग्न होत नाही अन् केवळ सुखाच्या मागे लागत नाही (किंवा सुखाने हुरळूनही जात नाही). जो ओढ, भय, क्रोध रहित आहे, असा स्थिर बुद्धीचा (स्थित-धी) मुनी, साधू जाणावा. 
===============================================
१२. त्वमेव माता पिता त्वमेव, त्वमेव बन्धुश्च सखा त्वमेव ।
त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव, त्वमेव सर्वं मम् देव देव ।।

अर्थ: तुम्हीच माझी आई आहात, तुम्हीच माझे पिता आहात. तुम्हीच माझे बंधू आणि तुम्हीच माझे मित्रही आहात. तुम्हीच माझी विद्या/ज्ञान आहेत, तुम्हीच माझे वित्त आहात. हे देवाधिदेवा, तुम्हीच माझे सर्वस्व आहात. 
"तू माझा सांगाती" असे आपल्या आराध्याबाबत सांगणारा श्लोक. 
===============================================
१३. यस्य नास्ति स्वयं प्रज्ञा, शास्त्रं तस्य करोति किम्? ।
लोचनाभ्यां विहीनस्य, दर्पणः किं करिष्यति ।।

अर्थ: ज्याला स्वत:ची बुद्धीच नाही, त्याला शास्त्र काय ज्ञान देणार? जसे अंध व्यक्तीस आरसा तरी काय दाखवणार?
===============================================
१४. विद्या ददाति विनयं, विनयाद्याति पात्रताम् ।
पात्रत्वाद्धनमाप्नोति, धनाद्धर्मं ततस्सुखम् ।।

अर्थ: विद्येने नम्रता येते, नम्रतेमुळे पात्रता येते. अशा पात्रतेमुळे धन मिळते. (आणि) त्या धनाने धर्मकार्य (सत्कार्य) केल्याने सुख मिळते. 
===============================================
१५. मर्कटस्य सुरापानं, मध्ये वृश्चिक दम्शनम् ।
तन्मध्ये भूतसञ्चारो, यद्वा तद्वा भविष्यति ।।

अर्थ: दारू पिलेल्या माकडाला विंचवाने दंश केला आणि त्यातून त्याच्यात भुताने संचार केला, तर काहीही होऊ शकते. 
===============================================
१६. पठन्ति चतुरो वेदान्, धर्मशास्त्राण्यनेकशः ।
आत्मानं नैव जानन्ति, दर्वी पाकरसं यथा ।।

अर्थ: काही विद्वान, चार वेद, धर्मशास्त्र आदींचे पठण करतात. पण आमटीत असलेला चमचा जसा त्याची चव जणू शकत नाही, तसे हे आत्म्यास जाणत नाहीत. 
केवळ पोपटपंची करून पंडित म्हणवून घेणारे, विद्वान असतीलच असे नाही. जो आत्म्यास, अंतरंगास समजू शकतो तो विद्वान. 
"तुज आहे तुजपाशी परी जागा चुकलासी अशा अर्थाचा हा श्लोक. 
===============================================
१७. शतेषु जायते शूरः, सहस्रेषु च पण्डितः ।
वक्ता दशसहस्रेषु, दाता भवति वा न वा ।।

अर्थ: शंभर लोकांत एक शूर मिळू शकेल, हजारांत एखादा पंडित भेटेल, दहा हजारांत एक उत्तम वक्ता असू शकेल पण दानी मनुष्य फार क्वचित सापडेल. 
===============================================
१८. तुष्यन्ति भोजने विप्रा, मयूरा घनगर्जिते ।
साधवो परसम्पत्तौ, खलः परविपत्तिषु ।।

अर्थ: ब्राह्मण जेवणाने, मोर मेघ गर्जनेने, साधू दुसरयांच्या संपत्तीने (म्हणजे दुसऱ्याच्या भरभराटाने) तर दुर्जन दुसऱ्याला दुःखात किंवा संकटात पाहून खुश होतात. 
================================================


बुधवार, २६ जुलै, २०१७

पुणे आणि मी : भाग २

पुणे आणि मी : भाग १ वरून पुढे... 

हा (सागर), पक्का पुणेकर अवलिया, CDAC कोर्सच्या वेळी प्रॅक्टिकल्स ला माझ्या बाजूच्या संगणकावर (Computer) बसायचा आणि माझी व याची, त्यावेळी ओळख नसतानाही मला अनेक नावं त्याने ठेवली होती. हेही मला याच पठ्याने नंतर ओळख झाल्यावर सांगितले आणि हद्द म्हणजे नंतरही माझ्या जवळच्या मित्रांसोबत माझ्या नातवा-परतंवडां पर्यंतची नावं याने तयार केलेली आहेत. आता त्याच्याच ती किती लक्षात आहेत, हा भाग निराळा....!!!

आम्ही दोघेही सुरुवातीला एकाच कंपनीत (CDAC) कामाला लागलो. याच्यामुळेच पुण्यात फिरणं मला अगदी सुसह्य झालं... कधीही याच्या घरी गेलो की जेवल्याशिवाय न जाऊ देणारा हा....!!! याच्या घरातील कार्यक्रम असो वा सोसायटीत... अध्यक्षस्थानी हेच...!!! आणि मला निमंत्रण वगैरे सोपस्कार नाहीत.... "हा कार्यक्रम आहे... ये..." डायरेक्ट....!!!

गणेशोत्सवात पेठांमधील रस्ते बंद झाले की गल्ली-बोळांतून नेऊन पुणे दर्शन घडविणारा हाच...!!! ओंकारेश्वरहून सरळ शनिवार पेठेत आणि तिथून थेट शनिवारवाडा.... टिळक रोडकडे जाताना वन वे कुठला... कुठल्या रोडने कधी ट्रॅफिक नसतं... अलका चौकातून किंवा डेक्कनहून सदाशिव पेठेत किंवा स्वारगेटला जाताना गर्दी कशी चुकवायची... लक्ष्मी रोडवर फिरायचं असेल तर गाडी कुठं लावायची, हमखास पार्किंग कुठं मिळेल याची इत्थंभूत माहिती यानेच दिली....

लकडी पुलावरचा, "दुचाकी वाहनांना प्रवेश बंद...!!!" हा फलक (Board) मात्र मीच याला PMT मधून दाखवला. तोवर इतर पुणेकरांप्रमाणे त्यालाही हे ऐकूनच माहिती होते...!!! 

कार चालवत असेल तर फार नाही पण बाईकवर, मग पुढे बसलेला असो वा मागे, स्वारगेट चौकातल्या सिग्नल पाशीही, "ओ काका, असं सरळ निघायचं, म्हणजे सगळ्यांना जागा मिळते" असं बिनधास्त ओरडून, सर्वांना पुणेरी शैलीत वाहतुकीचे नियम सांगणारा हा...!!!

याच्यामुळे पुण्याच्या गल्ल्यांमध्ये मी हरविण्याची शक्यता कमीच...!!!

आमच्यात मतभेद खूपदा होतात. किंबहूना, एखाद्या गोष्टीवर आमचं "लवकर" एकमत होणं फारच दुर्मिळ...!!! मग ते कोणासाठी तरी एखादी भेटवस्तू खरेदी करणं असो वा कार, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय विषयांवरील चर्चा असोत... मतभेद होणारचं...!!! उलट तसं नाही झालं तर आम्हांलाच चुकल्या-चुकल्यासारखं वाटतं. असे जरी असले तरी आमच्यात "मनभेद" अजिबात नाही. आधी भांडून मग, कधी त्याने, कधी मी कमीपणा घेत, वेळ निभावून नेतो. कदाचित, याच विजोड प्रवृत्तीमुळे म्हणा हवं तर, पण आमची मैत्री मस्त टिकून आहे. 

आमची मैत्री अशी,
टिळक-आगरकर जशी...!!!

(टिळक-आगरकरांचे नाव केवळ उदाहरणादाखल... वैचारिक मतभेद असले तरी समान उद्दिष्ट्य आणि निखळ मैत्री हे दर्शविण्यासाठी... )

पुणेकर आणि त्यांचा इरसालपणा, पुणेरी पाट्या हे तर सर्वांसाठी हक्काचे विनोदाचे विषय...!!! त्यातून दुपारी १ ते ४ झोपण्याच्या सवयीचे तर वाजवीपेक्षा जास्तच... चितळ्यांचे दुकान दुपारी १ ते ४ बंद म्हणजे बंदच, असे विनोदाने सांगताना त्यांचा दिवसही पहाटे ३-४ वाजता सुरू होतो, हे कोणी लक्षात घेत नाही... आणि हे खुद्द चितळ्यांच्याच एका मुलाखतीत वाचल्याचे स्मरते... मग आता दुपारी घेतली थोडी विश्रांती तर कुठं बिघडलं...? पुणेकर असले तरी माणसंच आहेत ती...!!! जगात कोल्हापूर, सोलापूर आणि पुण्याचा माणूस, त्याच्या बोलण्याच्या अंदाजावरुन, कुठेही सहज ओळखता येतो...

पुण्याच्या गणेश विसर्जनाच्या मिरवणूकीला मी कधी गेलो नाही, पण, मानाच्या गणपतींसह इतर मंडळाचे देखावे मात्र अनेकदा पाहिले... कित्येक रविवारच्या संध्याकाळ मस्त पर्वतीहून पुण्याचा रम्य देखावा पाहण्यात घालवल्या... कधी मित्रांसमवेत तळजई... कधी जवळपासचे गड-किल्ले... सिंहगड तर अगदी फार्म हाऊस वाटावे इतके वीकेंड घालवले आहेत... छत्रपतींच्या पावनस्पर्शाने पुलकित झालेले किल्ले आजही खूप सुंदर अनुभुती देतात...

काहीच नसलं तरी शुक्रवारच्या संध्याकाळी सातारा रोड येथील "कोल्हापूरी कट्टा" (आता ते हॉटेल बंद तरी झालंय किंवा दुसर्‍या नावाने तरी सुरू आहे) मध्ये जाऊन मस्त चिकन थाळी, तांबडा - पांढरा वरपायचा... अन् शनिवार किंवा रविवारच्या संध्याकाळी सिटी प्राईड, सातारा रोड, मध्ये एखादा चित्रपट...!!!

जगासाठी पुणे हा एक मोठ्या भूभागाचे क्षेत्र असेल, पण, पुण्याचे पुणेरीपण पेठांमध्येच दडले आहे. फार फार तर शिवाजीनगर, जंगली महाराज रस्ता, सातारा रोड, पर्वती आणि आसपासचा प्रदेश आदी यांत सामिल करता येईल... कर्वे रस्ता, कोथरूड या ठिकाणीही मोठ्या संख्येने पुणेकर दिसून येतात... कात्रज, औंध, बाणेर, कोरेगांव पार्क यांना फार तर जुळे पुणे अथवा नवं पुणे म्हणता येईल... विद्यापीठ तर कधी काळी पुण्याहून खूपच दूरचा प्रदेश मानला जात असे, हे आता सांगूनही खोटं वाटेल, इतकं पुणे पसरलं आहे.

पेठांतील रस्ते, त्यावरची होणारी कोंडी, पुण्याच्या बसेस, रिक्षा हे तर ग्रंथ लिहता येईल असे विषय....!!! पण, पेठांतील वाडे, मंडई, विद्यापीठ यांसारख्या जुन्या परंतु डौलदार अन् दिमाखदार वास्तू, हे पुण्याचे खरे वैभव...!!!

ज्ञानोबा माऊली अन् तुकोबारायांचे पुणे...!!! शहाजीराजांच्या बेचिराख झाल्या या प्रांतात पुन्हा नंदनवन फुलविणाऱ्या राष्ट्रमाता जिजाऊंचे पुणे...!!! स्वराज्य संस्थापक, युगप्रवर्तक छत्रपती शिवाजी महाराजांचे पुणे...!!! स्वराज्याची सीमा दिल्ली पर्यंत नेणाऱ्या थोरल्या बाजीरावांचे पुणे...!!! अटकेपार मराठी ध्वज फडकविणाऱ्या रघुनाथराव पेशवे उर्फ राघोभरारींचे पुणे...!!! ब्रिटिशांनाही चळाचळा कापायला लावणाऱ्या लोकमान्य बाळ गंगाधर टिळक आणि स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांचे पुणे...!!! थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले अन् सावित्रीबाई फुलेंचे पुणे...!!! पु. ल. देशपांडे, शांता शेळकेंचं पुणे...!!! विद्येचे माहेरघर अन् महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसा असलेले पुणे...!!! दुचाकी स्वारांचे, पेन्शनरांचे, विद्यार्थांचे अन् आता IT Hub बनू पहात असलेले पुणे...!!! शुध्द मराठी भाषेचे पुणे....!!! पारंपारिक गणेश विसर्जन मिरवणुकीचे पुणे...!!! पुण्याला पुणे म्हणणाऱ्यांचे पुणे...!!!

अशा पुण्याचा पुणेकरांनी जाज्वल्य अभिमान का न बाळगावा...?

पेठांमधील वाड्यांनी आता आपली जागा सोडण्यास सुरुवात केली आहे. पुण्याचे ग्रामदैवत, कसबा गणपती, ज्या मंदिराचा जीर्णोद्धार जिजामाता मासाहेबांनी पुण्यात प्रथम वस्तीस आल्यावर केला, असे सांगितले जाते, त्या आमच्या श्रद्धास्थानाच्या बाजूला मोठी इमारत बांधली जात आहे. त्याच्या आवाजाने त्या दगडी कौलारू मंदिरातील शांतता कमी होत चालली आहे, असे मला वाटते...

हळूहळू का होईना पण पुणे बदलत चाललंय हे मात्र खरं... बदल हा निसर्ग नियमच आहे. या बदलांतही लाल महाल, विश्रामबाग वाडा, केसरी वाडा आदी काही ऐतिहासिक वास्तू आपले अस्तित्व टिकवून आहेत किंवा टिकविण्याचा प्रयत्न करत आहेत...!!! शनिवारवाडा मात्र ब्रिटिश काळात आगीच्या भक्ष्यस्थानी पडला अन् आता त्या भग्नावशेषात केवळ त्याची भव्यता अन् निर्माण केलेल्या हिरवळीतून (बगीचा) त्याच्या सुंदरतेची फक्त कल्पनाच करायची...!!! 

बदल, विकास करत असताना आपला हा सांस्कृतिक अन् ऐतिहासिक ठेवा आपण जतन करायलाच हवा असे एक इतिहास प्रेमी म्हणून मला नेहमीच वाटते.

संपूर्ण भारतावर माझे खूप प्रेम आहे आणि त्यातील माझे जन्मगाव सोलापूर, तुळजापूर, कोल्हापूर, वैष्णौदेवी (कट्रा) आणि पुणे इथं मला कधीच एकटं वाटत नाही... माझ्या घरात असल्यासारखंच वाटतं...

पुण्यावर जितकं बोलावं तितकं कमीच आहे... त्यामुळे आता इथेच थांबतो...!!! राग व्यक्त करताना घडाघडा बाहेर पडणारे शब्द प्रेम व्यक्त करताना थोडेसे अबोल होतात, असंच काहीसं माझं झालं आहे... मनातल्या साऱ्या भावना शब्दांत थोडीच व्यक्त करता येतात? आणि तसंही अखंड बोलत राहण्याचा जन्मसिद्ध अधिकार केवळ पुणेकरांनाच आहे...!!! 

खरंच, पुणे तिथे काय उणे...?

शेवट करताना पु. लं. ची पुण्यावरची कविता लिहितो,

मी राहतो पुण्यात,
मी राहतो पुण्यात
म्हणजे विद्वत्तेच्या ठाण्यात.
इथल्या मंडईचेदेखील विद्यापीठ आहे.
आणि विद्यापीठाची मंडई झाली आहे.
बोलणे हा इथला धर्म आहे
आणि ऐकणे हा दानधर्म आहे.
म्हणून वक्ते उपदेश करतात
आणि श्रोते उपकार करतात.
उपचारांना मात्र जागा नाही. 


पुणे आणि मी : भाग १

सप्तर्षी, सप्तसुर, सप्तरंग, सप्तपदी, सप्तजन्म असा "सात" या आकड्याचा सुप्रभाव आहे. सात हा अंक अशा अनेक कारणांमुळे शुभ मानला जातो. एका अभ्यासाने असेही निरीक्षण नोंदवले आहे की, जर तुमची एखाद्या सोबतची मैत्री ७ वर्षे टिकली, तर ती जन्मभर टिकून राहते. आता तुम्ही म्हणाल, "आज मी ७ या आकड्याबद्दल इतकं का बोलतोय...? पुण्याचा आणि ७ आकड्याचा काय संबंध?"

सांगतो...!!!

पुण्याचा आणि ७ आकड्याचा अर्था-अर्थी काही संबंध नसला तरी आज दिनांक २६ जुलै २०१७ रोजी मला पुण्यात, एकट्याने, येऊन ७ वर्षे पूर्ण झाली. आज असलेली विनायक चतुर्थी हा पण एक सुयोगच म्हणायचा...!!! खरं तर यात, "कुतूहल वाटण्यासारखे काय?" असे अनेकांना वाटेल... पण, यापूर्वी, कोठेही एकट्याने न जाणारा मी ७ वर्षांपूर्वी, सोमवार, २६ जुलै २०१० रोजी, एकट्याने पुण्यात आलो अन् कायमचा इथलाच बनून गेलो...

खरं पाहता, मी पुण्यात कायमचा रहायला १८ आॅगस्ट २०१० रोजी आलो. मग आजची तारीख कशी? सांगतो....!!!

तर, जून २०१० ला मी अभियांत्रिकी (Engineering) शाखेचा पदवीधर झालो अन् भारतातील अनेक बेरोजगार व्यक्तींमध्ये आणखी एकाची भर पडली. त्यानंतर नौकरी शोधण्यापेक्षा एखादा कोर्स करावा जेणेकरून नौकरी लागण्यासाठी फायदा होईल या हिशेबाने मी आणि माझ्या काही मित्रांनी सी-डॅक (C-DAC) चा, ६ महिन्यांचा, कोर्स करायचे ठरविले. त्यासाठी पुण्यातील नामांकित "सनबिम इन्फोटेक" मध्ये मी मुलाखतीसाठी आजच्याच दिवशी आलो.

तशी मुलाखत दुसर्‍या दिवशी, मंगळवार, २७ जुलै २०१० रोजी, होती. पण माझ्या नेहमीच्या सवयीप्रमाणे मी आदल्या दिवशीच पुण्यात दाखल झालो. तसा यापूर्वी एक-दोनदा पुण्यास माझ्या चकरा झाल्या होत्या, पण त्या घरच्यांसोबत...!!! या वेळेस मात्र, "मी एकटाच जाणार", हे घरी निक्षून सांगून आलो होतो. तशी, तेव्हा पुण्याची मला काहीच माहिती नव्हती...!!!

ढगाळ वातावरण... नुकताच पाऊसही पडून गेला होता... जसा रेल्वे स्थानकावर उतरलो तसं ठरवलं, आधी आपल्या आराध्याचे, श्रीगणेशाचे, दर्शन घ्यायचे...!!! बाहेर येऊन एका PMT वाहकाला (कंडक्टर) दगडूशेठ गणपतीला जाणाऱ्या बसबद्दल विचारले. योगायोगाने तिथे उभी बसच तिकडे जाणार होती. त्या बसनेच निघालो. पण ना मला तो थांबा माहीत होता, ना ते मंदिर कुठे आहे ते माहित होते... त्या तुडुंब भरलेल्या बसमध्ये, तिकीट काढताना, बस कंडक्टरलाच त्याबद्दल विचारले आणि मंदिर आल्यावर मला सांगण्याची विनंतीही केली... "इतक्या गर्दीत त्यांच्या हे लक्षात राहिलं का?" ही शंका होतीच... पण सारं काही गजाननावर सोपवून मी त्या गर्दीत उभा राहून जमेल तितकं अन् जमेल तसं पुणे दर्शन करत होतो. मंदिराजवळ आल्यावर त्या सद्गृहस्थ कंडक्टर काकांनी आवाज देऊन मंदिर जवळ आल्याची सूचना दिली...

मंदिरात गेलो... नुकतीच आरती झाली होती... बऱ्यापैकी गर्दी असली तरी आरती झाली असल्याकारणाने पांगापांगीला सुरुवात झाली होती. आत जाऊन गजाननाचे दर्शन घेतले आणि "आता यापुढे तूच माझा सांगाती आहेस...", हे ही त्याला सांगितलं... बराच वेळ मंदिरातच, भान हरपल्यागत, बसून होतो. थोड्या वेळाने शुध्द आली आणि मग पुढे कॉलेजच्या दिशेने निघालो...

दुसऱ्या दिवशी मुलाखत उत्तम झाली आणि त्याच संध्याकाळी माझी निवड झाल्याचेही समजलं... खूप आनंद झाला... त्यानंतर १५ - २० दिवसांनी कोर्स सुरू होणार होता. माझ्या २ मित्रांनाही त्याच कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला आणि आम्ही तिघे १८ आॅगस्ट २०१० रोजी पुण्यात राहण्यास आलो. गुरुवार, १९ ऑगस्ट २०१०, पासून कोर्स सुरू झाला...

ज्या दिवशी मी पहिल्यांदा, म्हणजे २६ जुलै २०१० रोजी, पुण्यात आलो, त्याच दिवशी मी पुण्याचा होऊन गेलो होतो.

काय दिलं नाही पुण्यानं मला...!!!

नौकरीसाठी लागणारं शिक्षण दिलं... पहिली नौकरी मिळवून दिली. तीही विद्वत्तेच्या प्रांगणात... म्हणजे पुणे विद्यापीठात...!!! अगदी मुख्य इमारतीसमोर माझं CDAC चं कार्यालय होतं... CDAC संस्था ही भारत सरकारच्या अखत्यारीत असून ती व्यावसायिक शिक्षण देण्याबरोबरच Software Development चं ही काम करते, हे अनेकांना माहित नाही. ब्रिटिशकालीन ती (विद्यापीठाची मुख्य इमारत) भव्य वास्तू, शिल्पशास्राचा एक अजोड नमुना आहे... करियरच्या सुरुवातीची २ वर्षे मी त्या पवित्र ठिकाणी काढली... पुढेही आणखी काही वर्षे तिथे काढली असती पण काही कारणाने, "करियर Growth व्हावी म्हणून" 😋, मी तिथून निघालो आणि हिंजवडीत 3DPLM, आताची Daasault Systems, मध्ये लागलो तो आजतागायत तिथेच आहे.

पावसाळ्यात, विशेषतः श्रावणात, विद्यापीठाचे निसर्ग-सौंदर्य लाजवाब असते... ते पाहून अभिमानाने म्हणावेसे वाटते, "पुण्यासारखी हिरवळ शोधून सापडणार नाही (निसर्ग-सौंदर्य याच अर्थाने म्हणतोय, गैरसमज टाळावा)."

पुण्यानं, पुण्यात म्हणता यावं असं स्वतःच, हक्काचं घर दिलं... भलेही ते PMC हद्दीत ना का येईना... पण सांगताना पुण्यात घर आहे असं सांगण्यासारखं नक्कीच आहे. पुण्याचं हृदयचं इतकं मोठं आहे की, पिंपरी-चिंचवड, हडपसर महानगरपालिका हद्दीतील लोकं सुध्दा आम्ही पुण्यात राहतो असं अभिमानाने सांगतात, मग माझं घर तर PMC हद्दीला चिटकून आहे. पण माझे मूळचे पुणेकर असलेले मित्र मला, "PMC हद्दीत पण नाही" म्हणून डिवचतात, हि गोष्ट वेगळी...!!! 😃

निखळ मैत्री असणाऱ्या मैत्रिणी दिल्या... मग ती दर राखीपौर्णिमेला न विसरता राखीसाठी घरी बोलावणारी आणि कधी काही कारणास्तव जाणं न झाल्यास, मोठ्या बहिणीगत, रागावणारी एखादी अक्का असो वा सतत अभ्यास करत मलाही अभ्यास करायला प्रोत्साहन देणारी, वेळप्रसंगी धीर देणारी, एखादी विदर्भाची वाघीण असो...!!! सोलापूरकर  म्हणत प्रत्येक नवीन खाद्यपदार्थांचे केवळ फोटो पाठविणारी, पण सर्व सहलींसाठी, मी नाही येणार हे माहीत असलं तरी, हमखास निमंत्रण देणारी एखादी पक्की पुणेकर असो वा माझ्या लांबच लांब चालण्याच्या सवयीवर, "तू पागल है?" असं म्हणत रागमिश्रीत कौतुक करणारी, एखादी सरदारणी टाईप मुलगी असो....!!!

जशा मैत्रिणी तसेच मित्र....!!! मित्र कसले बंधूच...!!! मग तो दूर राजस्थानहून आलेला थोरल्या बंधूगत एखादा मित्र कम् भाऊ आणि वहिनी असो वा माझ्या बुध्दिमत्तेची तारीफ करत मला हरभऱ्याच्या झाडावर चढवणारे विदर्भ, मराठवाडय़ातील मित्र असोत....!!! किंवा आता परदेशात असूनही मैत्रीचे नातं घट्ट टिकविणारा एखादा भाऊच असो...!!!

सर्वसामान्य मनुष्याच्या, छोटंसं का होईना पण स्वतःचं घर, पोटापाण्यासाठी साजेशी नौकरी, आपली म्हणता येतील अशी जवळ असणारी माणसं, यांपेक्षा वेगळ्या अपेक्षा तरी काय असतात म्हणा...?

या सर्वांची नावं देणे येथे खरंच शक्य नाही. पण ही सारी मित्र-मंडळी माझ्यासाठी खासच आहेत...!!!

या सर्वांत एका व्यक्तीशिवाय ही यादी संपूर्ण होणारच नाही आणि ती व्यक्ती म्हणजे,
श्री. सागर शेडगे....!!! 

तसा तो अजून चि. सागरच आहे. पण पुणे म्हटलं कि नावापुढे "श्री." आणि व्यक्तीपुढे "कर" जोडावेच लागतात, म्हणून...!!! 😋 😃

याचं नाव मी येथे बिनधास्त छापतोय त्याचं कारणच असं की, त्यासाठी मला त्याची परवानगी घेण्याची आवश्यकता आहे, असं अजिबात वाटत नाही. म्हणजे वरती उल्लेख केलेल्या व्यक्तींबद्दल ती आहे असं नाही... त्यांचीही नावं मी लिहिली असती, पण लेखनाच्या काही मर्यादा असतात.... सागर आणि माझ्या मैत्रीत अशा मर्यादा नाहीत...!!! याचं नाव मी आधी देतो आणि मग वेळ मिळेल तसा याला सांगतो, अशी आमची मैत्री...!!!


क्रमश:... 

पुणे आणि मी : भाग २ 


गुरुवार, २० जुलै, २०१७

शंका, संशय आणि बदनामी : भाग २

शंका, संशय आणि बदनामी : भाग १ वरून पुढे... 

तर मागील भागात आपण शंका आणि संशय जाणून घेतले आता पुढचा भाग "बदनामी" पाहू...!!!

खरं पाहता बदनामी हा विषय पूर्णतः वेगळा असला तरी बहुतांश प्रमाणात त्याचा संबंध संशयाशी  येतो. कसा ते पाहू...!!!

समजा, आपण कोणाला तरी, काही कामानिमित्त म्हणा किंवा सहज आठवण आली म्हणून म्हणा, फोन केला आणि तो बिझी (busy) लागला. आपला कॉल (call) आलेला पाहून, नंतर जर त्याने स्वतःहून कॉल केला तर ती व्यक्ती आपली कदर करते हे लक्षात येतं. पण काही कारणाने नाहीच जमलं त्या व्यक्तीस आपल्याला कॉल करणं (होऊ शकत असं कधीतरी, पण नेहमीच होऊ लागलं तर तो एक सूचक इशारा आपण मानू शकतो. कोणता सूचक इशारा हे सुज्ञास सांगणे न लागे. असो.) आणि म्हणून पुन्हा थोड्या वेळाने आपण फोन केला आणि त्याने तो उचलला तर आपण सहज विचारून जातो, "मघाशी पण फोन केला होता. पण busy लागला." व्यक्ती अगदीच जवळची असेल तर मग, "कोणाशी बोलणं चालू होतं?" असंही विचारतो कदाचित. तसेच "घरी पोहोचताच फोन अथवा message कर." असे आपण बोलून जातो. 

आता वरील वाक्यांतून कोणाला ती काळजी वाटेल तर काहींना संशय...!!!

वरील दोन्ही वाक्यात आपल्या हाती पुरावा असा काही नाही. त्यामुळे तो संशय कि काळजी हे प्रसंगानुरूप ठरू शकेल. केवळ वाचण्याचा स्वर (tone) बदलून पहा, म्हणजे मी काय म्हणतो ते लक्षात येईल. 

त्यामुळे एखाद्याला संशयीच ठरवायचं असेल तर वरील वाक्यं फक्त स्वर बदलून  त्याच्या तोंडची म्हणून सांगितली कि त्यांचा अर्थ किती बदलतो आणि विचारणारा व्यक्ती "संशयी" म्हणून "बदनाम" होतो. 

बघा हं, म्हणजे ज्या वाक्यांचा आधी "इतकी काळजी करणारा /री कोणी असेल का?" असा अर्थ काढला जात असेल, तो आता सरळ "विश्वास नव्हता, म्हणून असे विचारत होता /ती" असा बनतो/लावला जातो. 

मी पुन्हा सांगतोय, कदाचित प्रसंगानुरूप हे बदलूही शकते पण हा (वरील) अर्थाचा/निष्कर्षाचा प्रवास जर "काळजी ते अविश्वास" असा असेल तर यात चुकीचे कोण? विचारणारा की निष्कर्ष काढणारा?

वरील प्रश्नांची उत्तरं खरं तर शंका आणि संशय यावर अवलंबून आहे. "काळजी ते अविश्वास" हा प्रवास, प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे, शंकेमुळे झाला कि संशयाने हे जाणून घेणे महत्वाचे ठरेल. 

संशयाने झाला असेल तर ती विचारणाऱ्याची चूक आणि शंकेने झाला असेल तर निष्कर्ष काढणाऱ्याची असे माझे स्पष्ट मत आहे. 

कारण मी मागील लेखात म्हणालो तसे, "शंकेचे निरसनच असे करावे कि पुढे शंका घेण्यास जागा राहू नये. संशयास मात्र अंत नसतो." त्यामुळे "शंके"मुळे झालेला हा प्रवास हेच सिद्ध करतो कि, निष्कर्ष काढणारा, विचारणाऱ्याच्या शंकेचे निरसन करण्यात अपयशी ठरला. 

संशयाने शंका, शंकेने संशय अशा दुष्ट चक्रात अडकणे वाईटच...!!! अगदी चकवा मागे लागल्यागत अवस्था...!!! त्यामुळे, शंका निर्माण झाली तर त्याचे योग्य निरसन हाच एकमात्र उपाय आहे. असा उपाय करत असताना प्रसंगी आपला अहंकार, ताठा, बडेजाव आदी गोष्टी बाजूला सारून व्यक्तीला अथवा व्यक्तीसोबतच्या आपल्या नात्याला महत्व द्यावे, असे मला वाटते. 

नात्यासाठी कमीपणा घेणे अथवा सरळ नात्याला शरण जाणे हे परमेश्वराला शरण जाण्याइतकेच महत्वाचे आहे आणि कोणत्याही परिस्थितीत नातं  टिकवणं हीच नात्याची खरी कदर असते. 

शंका निरसन करणे म्हणजे "खोट्या शपथा घेणे" अथवा "एक खोटे लपविण्यासाठी १० खोटे बोलणे" असे नव्हे. तसेच आतातायीपणा करत, विश्वासाच्या नावाखाली स्वैराचार करण्याची परवानगी मिळवणे असेही नव्हे. 

एखाद्यास संशयी ठरवायचंच म्हटलं की, त्याच्या तोंडच्या वाक्यांना थोडासा मसाला लावणे किंवा त्यांचा स्वर बदलणे आणि सगळ्यात सोपं म्हणजे, त्याची वाक्यं अर्धवट सांगणं. इतकं केलं कि, समोरचा बदनाम होतोच. आता मी बदनाम कसं करायचं हे नाही सांगत आहे तर नाहक बदनाम कसं केलं जातं हे सांगतोय. थोडंसं पाहिलेलं, थोडंसं अनुभवलेलं...!!! पण हे सत्य नसतं. 



वरील प्रतिमा (Image) केवळ एक उदाहरण म्हणून पहावी. यामध्ये घटना तुमच्यासमोर आहे आणि कॅमेऱ्यातून दिसणारी प्रतिमा म्हणजे जो त्रयस्थ व्यक्ती आहे त्याला सांगितलेली गोष्ट अशा अर्थाने...!!! यामध्ये कॅमेरा मुद्दामहून वापरला, म्हणजे तो दोन अर्थाने वापरता येईल. 

    १. त्रयस्थ व्यक्तीला सांगितलेला भाग 
    २. घटना समजून घेतल्यावर, त्रयस्थ व्यक्तीच्या मनातील विचार 

त्यामुळे असं खोटं-नाटं सांगून एखाद्याची बदनामी केली गेली, तर जेव्हा सत्य समोर येते त्यावेळेस अशा लोकांची पळता भुई थोडी तर होतेच, पण तोंड लपवायलाही जागा उरत नाही. काळ हा अतिशय बलवान असल्याने सत्य कधी ना कधी समोर येतेच. 

सत्य परेशान हो सकता है, पराजित नहीं ।

एखाद्याची बदनामी करायची कि नाही हे ज्याच्या त्याच्या सद्-सदविवेकबुद्धीवर आणि त्या व्यक्तीशी आपला असलेला जिव्हाळा यावर अवलंबून असते. आपल्या चुकांकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष करून दुसऱ्यास बदनाम करणे आणि आपण निर्दोष असल्याचे सिद्ध करणे हा केवळ एक भ्रमाचा भोपळा आहे. उलट तो आपल्यावरच फुटण्याची जास्त शक्यता आहे.

एखाद्याची खोटी बदनामी करायला हिम्मत लागत नाही, हिम्मत लागते ती स्वत:च्या चुका मान्य करायला आणि त्या सुधारण्याला...!!! 

आपली चूक/पाप लपवण्यासाठी, नाहक एखाद्यास बदनाम करण्यापूर्वी एकदा अवश्य विचार करा...!!!

काही चुकले असल्यास, आवडले नसल्यास अवश्य कळवा...!!! चू. भू. दे. घे. 

जिस दिल में बसा था प्यार तेरा,
उस दिल को कभी का तोड़ दिया, हाय, तोड़ दिया ।
बदनाम न होने देंगे तुझे, 
तेरा नाम ही लेना छोड़ दिया, हाय, छोड़ दिया ।।



शुक्रवार, १४ जुलै, २०१७

शंका, संशय आणि बदनामी : भाग १

विषय तसा नाजूक अन् गंभीर आहे. त्यामुळे मी मला आलेले अनुभव, आसपास घडणारे/घडलेले प्रसंग यांच्या माध्यमातून माझे विचार मांडायचा प्रयत्न करणार आहे. माझ्या विचारांशी सारे सहमत होतीलच असे नाही आणि सर्वांनी सहमत व्हावे अशीही अपेक्षा नाही. कदाचित माझे विचार चुकीचे वाटले तर दुरुस्त करावेत अशी आशा नक्कीच आहे...!!!

सुरुवात होते ते "शंका" अन् "संशय" वेगळे कि एकच यावरून... वरपांगी पाहता दोन्ही शब्दांचा अर्थ एकच वाटण्याची दाट शक्यता आहे. पण थोडासा खोलवर विचार केला तर कदाचित दोन्ही शब्दांतील सूक्ष्म फरक आपल्या ध्यानात येईल. 

एखादी गोष्ट, घटना यांबद्दल प्रत्यक्षदर्शी अथवा साक्षी, पुरावे यांच्या आधारे विचारलेले, पडलेले प्रश्न म्हणजे "शंका" तर अपरोक्ष घटनांचा संबंध जोडून आलेले प्रश्न म्हणजे "संशय" असं मला वाटतं...!!!

आता वरील वाक्य/विचार यांचा थोडा उहापोह करतो... कारण "शंका" आणि "संशय" यांच्यामधील गल्लत दूर झाली तरच पुढे "बदनामी" विषयी आपण बोलू शकू...!!!

आता असं बघा, शाळेत शिक्षक आपल्याला काही शिकवतात आणि नंतर विचारतात, "काही शंका असतील तर विचारा." तसेच पोलीस जेव्हा गुन्ह्यातील सराईताला पकडण्यासाठी माग काढतात, तोसंशयावरून. मी सराईत असा शब्द मुद्दामहून वापरला कारण सहजासहजी कोणताही पुरावा मागे न ठेवता किंवा पुरावे नष्ट करतच काम करण्याची त्याची पद्धत असते. अशावेळेस पोलीस सुरुवातीला "तुम्हांला कोणाचा संशय?" असा प्रश्न विचारतात आणि "संशयिताला" पुढील तपासासाठी बोलावले जाते. 

जर उपरोक्त उदाहरणांचा नीट विचार केला तर असं लक्षात येईल, जेव्हा शिक्षक विद्यार्थ्यांना शंका विचारायला सांगतात, तेव्हा त्यांनी विद्यार्थ्यांना तो पाठ पुराव्यानिशी दाखवून, पडताळलेला असतो. येथे पुरावा म्हणजे प्रमेय ( Theorems), प्रयोग (Experiments) इत्यादी, असे घ्यावे. याउलट, जेव्हा पोलीस संशयाबद्दल विचारतात, तेव्हा आपल्याकडे पुराव्यांपेक्षा अपरोक्ष किंवा कोणीतरी सांगितलेली गोष्ट किंवा विपरीत (संशयास्पद) हालचाल यांपलीकडे फारसे काही नसते. 

याचाच सरळ अर्थ असा कि, शंका हि तेव्हाच घेतली जाते जेव्हा आपल्याकडे काही परिस्थितीजन्य पुरावे उपलब्ध असतात पण संशयास असा आधार गरजेचा नसतो. थोडक्यात, "कोणीतरी कान भरले" तर "हलक्या कानाचे" होणे म्हणजे "संशयी" आणि  जे समोर आहे त्यानुसार प्रश्न करणे म्हणजे "शंका" असे मला वाटते. आता हे आपण आपल्या बुद्धीच्या आणि तर्कांच्या आधारे पडताळून पाहावे. 

संशयावरून शंका  येणे हे बुद्धीस पटण्यासारखे आहे पण शंकेवरून संशय घेणे हे शंका निरसनाची पद्धती, व्यक्ती आणि त्याच्या खरे-खोटे बोलण्याचा इतिहास तसेच शंकेचे दिलेले स्पष्टीकरण यांवरून ठरते. 

संशय आला म्हणून पुरावे गोळा करणे आणि मग त्या पुराव्यांवरून शंका घेणे किंवा त्यांचे स्पष्टीकरण मागणे चुकीचे ठरेल काय? हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पण माझ्या दृष्टीने म्हणाल तर, वरपांगी दिसणारा संशय दूर करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. असा संशय भयंकरच असतो. जसे व. पु. म्हणतात,

"संशय हा कॅन्सर सारखा असतो. तिसऱ्या अवस्थेत तो आपले खरे स्वरूप प्रकट करतो."

त्यामुळे, संशय आला तर तो प्रथम दूर करणे गरजेचे असते. पण संशयाने कोणावरही आरोप करण्यापूर्वी शंकेस जागा घेण्यासारखे काहीतरी आपल्या हाती असणे गरजेचे असते. अन्यथा, विनाकारण एखादी व्यक्ती दुखावली जाऊ शकते. 

तसेच, कोणी शंका (आता शंका म्हणजे काय हे वर सांगितल्याप्रमाणे साक्षी, पुरावे आदी. परिस्थितीजन्य पुरावे) घेतलीच तर त्या व्यक्तीचे शंका निरसन व्यवस्थितपणे, कसलाही आतातायीपणा न करता, अहंकार न बाळगता करणेही गरजेचे असते. 

शंकेचे निरसनच असे करावे कि पुढे शंका घेण्यास जागा राहू नये. संशयास मात्र अंत नसतो. तसेच शंकेस संशय म्हणून नाकारणेही चुकीचेच...!!!

या शंकेविषयी मी माझ्या जुन्या, शिक्षण : समज आणि गैरसमज , या लेखात काही उदाहरणं दिली आहेत ती एकदा जरूर पाहावीत. 

माझ्या मते या भागापुरतं इतकं पुरेसं होईल. हे विचार पटले नसतील तर पुढे "बदनामी" यावरचं माझं विवेचन पटणार नाही. ज्यांना हे विचार पटले त्यांसाठी मी "शंका, संशय आणि बदनामी : भाग २" लिहणारच आहे. पण ज्यांना नाही पटले त्यांनी अवश्य कळवावे. चू. भू. दे. घे. 

क्रमश:..

शंका, संशय आणि बदनामी : भाग २




रविवार, ९ जुलै, २०१७

कविता : गुरु (गुरुपौर्णिमा विशेष)

काय मागू गुरुकडं?, सारंच त्याने दिलं |
शांती, समाधान, मोक्ष, इतकंच आता राहिलं ||१||

अंधारल्या वाटेवर, गुरुच झाला दिवा |
तुटून पडलो चुकांवर, जैसा सिंहाचा छावा ||२||

थोरांपुढे झुकायला, गुरुनेच शिकवलं |
अहंपणा दूर सारुन, नम्र होण्यास सांगितलं ||३||

गुरुच माझा पाठिराखा, सखा माझा गुरु |
योग्य मार्गी लावतो माझे, भरकटणारे तारू ||४||

येती मजवर संकटे, होता माझी फसवणूक |
सांभाळून घेतले मज, दावून आपली चुणूक ||५||

गुरुस न सांगे मी, संकटं माझी मोठी |
भिडे आधी गुरूच तयांस, ठेवून मज पाठी ||६||

सुखाची बरसात होता, करतो मज तो समोर |
गुरुदेवांस नित्य स्मरता, मन माझे भाव-विभोर ||७||

काय सांगु महिमा गुरूचा, काय वर्णू थोरवी? |
गुरुच माझा मेघ-मल्हार, गुरुच राग भैरवी ||८||

आई माझी समर्थ, अन् समर्थच माझे गुरू |
साथ गुरूची लाभता, उणा कल्पतरू ||९||

झाल्या मजकडून खूप चुका, घडले असतील अपराध |
गुरुविन कोण घेईल, ते सारे पदरात? ||१०||

काया झीजो सत्कार्यी, मनी गुरुनाम |
गुरुदेवांस वंदन जैसे, पुण्य गंगास्नान ||११||

     --- जयराज 

शुक्रवार, ७ जुलै, २०१७

कविता : विश्वास

विश्वास असावा म्हणती जरी,
कसा ते न सांगे परी,
सदा अपेक्षी दुसऱ्याकरवी,
का न दावी स्वतःहूनी ?

आधी डोळ्यांवर पट्टी धरी,
दरी पाहून धक्का मारी,
बचावता म्हणती, "परीक्षा खरी", 
हाच असतो का विश्वास...? 

बाळ जाई उंचावरी,
तरी हासे जगावरी,
"झेलतील मज वरचे वरी" ,
तो असतो विश्वास...!!!

विमान उडे गगनावरी, 
थकला चालक आराम करी, 
ऑटो-पायलट कामावरी,
तो असतो विश्वास...!!!

शेती असे पावसावरी,
वरुणराज भारी लहरी,
बळी तरी बी पेरी,
तो असतो विश्वास...!!!

नसला तो श्रीमंत जरी,
होते त्याची कारभारीण तरी,
हिमतीने संसार करी,
तो असतो विश्वास...!!!

घडती पापे जन्मभरी,
जाणते वा अजाणतेपणी,
"मिळेल मुक्ती गंगातीरी",
तो असतो विश्वास...!!!

सत्य सारे वदेन जरी,
साथ न कधी सुटेल तरी,
राहील प्रेम आयुष्यभरी, 
तो असतो विश्वास...!!!

वर्तेन मी स्वैराचारी,
करावी लागेल लाचारी,
नकोत प्रश्न वागण्यावरी,
असा कधीच नसतो विश्वास...!!!

--- जयराज 




गुरुवार, २९ जून, २०१७

पापकर्म

"जगात अशाही काही व्यक्ती आहेत, ज्यांना स्वतःचे पापकर्म वाईट वाटणार नाहीत, पण ते उघड करणाऱ्याचे विचार मात्र नक्कीच वाईट वाटतील...!!!"

आता इथे पापकर्म म्हणजे त्रासदायक, दुष्कर्म, चुकीच्या घटना अशा अर्थाने घ्यावे. 

आता उदाहरणच द्यायचं झालं तर, समजा, एखाद्या ठिकाणी चोरी झाली आणि त्या चोरीच्या वस्तूंपैकी काही वस्तू एखाद्या व्यक्तीकडे सापडल्या किंवा त्याच्या हालचाली संशयास्पद वाटल्या म्हणून त्याला चौकशीसाठी बोलावण्यात आले. भले त्याने त्या वस्तू स्वत: चोरल्या नसाव्यात, दाम देऊन खरेदी  केलेल्या असाव्यात किंवा चोरीत मदत केली म्हणून चोराने त्यास दिल्या असाव्यात. पण शेवटी त्या चोरीच्याच वस्तू. त्यामुळे पहिली "शंका/संशय" त्यावरच येणार हे कोणाही "बुद्धी" असणाऱ्या व्यक्तीला वेगळे सांगायला नको. त्याने चोरी अथवा चोरीत मदत केली नाही हे त्याला योग्य पुराव्यांनिशी सिद्ध करावे लागेल. 

मग त्या व्यक्तीच्या सुरुवातीच्या पुराव्यांवरून, हावभाव/कृतींवरून जर त्याचे चोरांशी काही संबंध आढळलेच आणि त्यावरून त्याला, "तुझे चोरांशी कसे काय संबंध?" किंवा "यापूर्वी कधी चोरीच्या वस्तू खरेदी केल्या होत्या का?" किंवा "यापूर्वी कधी चोरी अथवा चोरीत मदत केली का?" असे काही प्रश्न विचारले गेले तर, "असे प्रश्न मला विचारलेच कसे जाऊ शकतात?" असे म्हणणे असंबंध तर आहेच पण मूर्खपणा शाबीत करणारे पण ठरते. कारण असे प्रश्न विचारणारा कितीही जवळचा असला तरी, या गोष्टी "विश्वासा"च्या कसोटीपेक्षा "बुद्धीच्या/तर्कांच्या" कसोटीवर सिद्ध होणे अपेक्षित असते. 

विश्वास तेव्हाच निर्माण होतो,जेव्हा विश्वास ठेवण्यालायक कृती केली जाते. 

शपथा घेऊन खोटे बोलण्यापेक्षा, पुराव्यांनिशी सिद्ध करावे.
उदा. मी चोराशी फारसं बोलत नाही, असे शपथेवर सांगावे आणि त्यांच्या संभाषणाची टेप, कागदपत्रंच उघड व्हावी, असे काहीसे विसंगत. 


त्यामुळे विश्वासाच्या नावाखाली अंध-विश्वासाची अपेक्षा करू नये. 

मग अशा व्यक्ती, त्या उघड करणाऱ्यास, संशयी, "माझ्याच गळ्यात पडलेला", "असल्याचं तोंडही पाहायचं नाही", "लायकी" नसलेला, कमी/छोट्या "खानदानाचा" अशा "शेलक्या" शब्दांचा आहेर करतात. ते केवळ असलाच "आहेर" करू शकतात, कारण बाकी सारा "नगदी आहेर" त्यांनी केवळ घेतलेला असतो. घेण्याचे त्यांना माहीत असते. देण्याचे नव्हे. 

काही "सदा सुखी" व्यक्ती तर, हे प्रश्न त्या घटनेशी दुरान्वयेही संबंध नसलेल्या व्यक्तीला जोडून, "त्याला असे प्रश्न तुम्ही विचारले असते का?" किंवा "त्याला असे प्रश्न कोणी विचारले तर चालतील का?" असेही तोंड वर करून विचारतात. "विचारणारा कोण आहे", "कशा संबंधात/संदर्भात, कारणावरून विचारतो आहे" याचा विचार न करता, भलताच अर्थ काढून आपली बौद्धिक पातळी दाखवून देतात. "पडलो तरी नाक वर" या न्यायाने, घडल्या घटनांची माफ़ी मागणे, पुन्हा अशी चूक न करण्याची किंवा खबरदारी घेण्याची शाश्वती देणे या गोष्टी तर दूरच पण उलट त्या प्रश्न विचारणाऱ्याचीच, नरकाश्रू ढाळत, बदनामी करणे आणि स्वत:ला निर्दोष दाखवत राहणे, असा उद्योग करतात. 

आपली समाजातील पत, प्रतिष्ठा, वजन, वर्तन, चारित्र्य स्वच्छ आहे म्हणून आपले "कसेही वागणे" सहन केले जावे हा केवळ "पोकळ अट्टाहास" आहे. कदाचित, आपल्या अशा वागण्याने, समाजातील तीच पत, प्रतिष्ठा धुळीस मिळू शकते. नाव कमवायला वेळ लागतो, पण बदनाम व्हायला क्षणही पुरेसा असतो. समाजाला शहनिशा करायला वेळही नसतो आणि गरजही नसते. उलट, एखाद्याचे बदनाम होणे समाजाच्या दृष्टीने मनोरंजनाचा खेळ होतो. नको तिथे "बडेजाव" करणे कदाचित अशा वेळी घातकही ठरू शकते. 

वरील उदाहरणातील चौकशीची बातमी जर समाजात आली तर समाज त्या व्यक्तीस थेट चोर समजून बदनामी करायलाही कमी करणार नाही याची जाण ठेवावी आणि म्हणूनच फुकाचा "माज" दाखविण्यापेक्षा संयमाने अशा गोष्टी हाताळल्या जाव्यात, असे मला वाटते. 

विश्वासाच्या गमजा मारण्यापूर्वी एक गोष्ट लक्षात ठेवावी, रामायण सांगत असतानाही, सीतामाईची रावणाच्या तावडीतून सुटका केल्यावर, "अग्निपरीक्षा" घेऊनच प्रभू श्रीरामांनी स्वीकार केला होता, असे सांगितले जाते. शहाण्यास जास्त सांगणे न लागे. ती अग्निपरीक्षाही कमी पडली म्हणून, प्रजेच्या शंका निरसनासाठी, नंतर सीतामाईंना वनवासास पाठवले ही पुढची गोष्ट. 

आंधळ्या विश्वासापेक्षा बुद्धीने ठेवलेला विश्वास जास्त भक्कमही असतो आणि चिरंतन टिकतो, हे ध्यानात असू द्या. 

पाप, दुष्कर्म करण्याला घाबरा...!!! त्यांच्या उघड होण्याला किंवा परिणामाला नव्हे...!!! 

तळटीप : वरील लेख, विचार थोडेसे कटू भासत असले तरी, त्यातून मला कोणाचाही अपमान, उपमर्द करायचा नाही, ना कोणाच्याही भावना दुखवायच्या आहेत. तसेच जाणते वा अजाणतेपणी कोणासही बदनाम करण्याचाही हेतू नाही. हे केवळ माझे विचार असून, कोणत्याही व्यक्ती, प्रसंग यांच्याशी त्यांचा आढळेला संबंध केवळ योगा-योग असावा. 


मंगळवार, २७ जून, २०१७

कविता : श्रावण

तृप्त तृप्त ही धरा, साज हरित बावरा |
मिलन होई प्रियकरा, करिते सण साजरा ||१||

शुभ्र कुंद नभही हा, सूर्य भासे हासरा |
ऊन पाऊस पाठशिवी, खेळ जसा नाचरा ||२||

खळ खळ वाहे हा झरा, दुधाचा माठ सांडला |
सरिता धावे माहेरी, आनंदे भेटी बापाला ||३||

धुंद धुंद ही हवा, मंद मंद गारवा |
चिंब चिंब मन होई, पाहून ऋतू हिरवा ||४||

हर्ष हर्ष जगती या, आनंद व्यापू राहिला |
शांत स्वच्छ मन ही हे, पिऊनी टाकी दुःखाला ||५||

--- जयराज




गुरुवार, २२ जून, २०१७

कविता : शंका

माझ्या पसंतीचीही माझ्या मनास,
"शंका" आता येत आहे ।
सोने समजून पितळास,
मी का पूजत आहे? ।।१।।

"संशयी" तर आधीच मज,
पितळाने ठरविलं होतं ।
अश्रूंतून चमक दावून,
आप्तांसही चकविलं होतं ।।२।।

पितळास ईच्छा, सोने होण्याची,
नव्हती ती जाण, स्वतःच्या अस्तित्वाची ।
प्रकाशापेक्षा आवड, झगमगाट अनुभवण्याची,
अंतरंगापेक्षा बाह्यरूपावर भुलण्याची ।।३।।

पितळ म्हणे, "मीच शुद्ध",
"नजर असे, तुझीच अशुद्ध" ।
"सोन्याच्या गुणांशी, माझा काय संबंध?",
"नसावेत मजवर, सोन्याचे निर्बंध" ।।४।।

चकाके कितीही पितळ जरी,
सोनाराची नजर, पारखी भारी ।
"शंका" घेउनी पितळावरी,
सोनार तयांस, दूर सारी ।।५।।

---- जयराज 


मंगळवार, २० जून, २०१७

इन्द्र जिमि जृंभ पर : अर्थ


कवी भूषण यांनी, "ब्रिज/ब्रज" भाषेत, छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या स्तुती-काव्याचा, मी थोडक्यात येथे, अर्थ सांगण्याचा प्रयत्न करत आहे. 
शेवटच्या २ कडव्यांचा अर्थ वाचताना लागू शकतो पण पहिल्या दोन कडव्यांसाठी मला इंटरनेट (Internet) चा आधार घ्यावा लागला. शब्दार्थापेक्षा भावार्थ समजून घ्यावा हि विनंती आणि काही दुरुस्ती आढळल्यास कळवावे. 


इन्द्र जिमि जृंभ पर, बाड़व सुअंभ पर
रावण सदंभ पर रघुकुल राज है ।।

पवन बारि बाह पर, संभु रति नाह पर
ज्यों साहस बाह पर राम ध्वज राज है ।।

दावा दृम दण्ड पर, चीता मृग झुण्ड पर
भूषण वितुण्ड पर जैसे मृग राज है ।।

तेज तम अंस पर, कान्हा जिमि कंस पर
त्यों म्लेच्छ बंस पर सेर सिवराज है ।।


अर्थ:
इंद्र जसा दानवी शक्तींवर, वामन जसा बली (हिरण्यकश्यपुचा वंशज) वर, रघुकुलाचा राजा (प्रभू श्रीराम) जसा रावणावर, शंभू जसा रतीच्या पतीवर (कामदेवावर), परशुराम जसा सहस्त्राजुनावर, वणवा जसा जंगलातील झाडांवर, चित्ता जसा हरणांच्या अन् सिंह जसा हत्तींच्या कळपावर, प्रकाशाचा किरण जसा अंधारावर, श्रीकृष्ण जसा कंसावर प्रभाव टाकतो (हावी होतो), तसा प्रभाव, भूषण सांगतो, शूर शिवाजी राजाचा मुस्लिम पातशाहींवर पडतो. 


मंगळवार, १३ जून, २०१७

कविता : उपवास

हसत हसत बोलत असता, गंभीर ती झाली ।
बोल तिचे ऐकून मित्रा, शकले हृदयाची झाली ।।१।।

"केले नाहीत मी उपवास, केले नाहीत व्रत" ।
"खरंच करायला हवे होते, मिळण्या चांगला वर" ।।२।।

एक छोटी स्माईल देऊन, मीही मग म्हणालो, ।
"करून पहा आता मग, अजून न तुझा जाहलो" ।।३।।

"उपवास न केला म्हणून, मिळाला मज जैसा दुष्ट" ।
"उपवासाने नक्की मिळेल, प्रेमळ, शांत, श्रीमंत अन् सुष्ट" ।।४।।

वाईट नाही ती हो खरंच, वाईट आहे मीच ।
चांगल्या मुलीस कसा मिळेल, माझ्यासारखा नीच? ।।५।।

          --- जयराज 

शुक्रवार, ९ जून, २०१७

कविता : मन उदास उदास

मन उदास उदास,
नसे आनंद मनास ।
कस्तुरीहून दूर जावा,
तिचा नित्याचा सुवास ।। १।

मन उदास उदास,
जणू जगही भकास ।
वाटे बसावे अंधारी,
नसे प्रकाशाची आस ।।२।।

मन उदास उदास,
श्रावणात वैशाख मास ।
सारी सुखे चरणतळी,
नाही उभारी मनास ।।३।।

मन उदास उदास,
जसा एकांगी प्रवास ।
सारे असुनी सोबती,
चाल वाटे एकांतवास ।।४।।

मन उदास उदास,
जावे शरण स्वतःस ।
तुझे आहे तुजपाशी,
परी जागा चुकलास ।।५।।

---- जयराज 


बुधवार, ७ जून, २०१७

मन अन् भावना

मनुष्य हा कितीही प्रगत झाला असला तरी तो एक "प्राणी" आहे , हे शाश्वत सत्य आपण आधी मान्य केले पाहिजे, असे मला वाटते. एक गोष्ट जी मनुष्य प्राण्याला इतर प्राण्यांपासून वेगळी करते ती म्हणजे, त्याची "विचार व्यक्त करण्याची क्षमता", ज्याला आपण "मानवी मन" असे म्हणून ओळखतो. 

मी मुद्दामहून इथे विचार व्यक्त करण्याची क्षमता असे म्हटले आहे. कारण, निसर्गाने/परमेश्वराने प्रत्येक प्राण्याला विचार करण्यासाठी बुद्धी दिलेली आहे आणि जो प्राणी विचार करू शकतो त्याला मन आहे, असे आपण नक्कीच म्हणू शकतो. आपली भारतीय संस्कृती तर इतकी उदार आहे कि, केवळ सजीवच काय पण निर्जीवासही मन आहे, असे मानते. तसं नसेल तर उगाच आपण दसऱ्याला शस्त्र, यंत्रं यांची पूजा करून त्यांचा आशीर्वाद घेतो?

पण भावना/विचार व्यक्त करण्याचे तंत्र म्हणा किंवा सामर्थ्य म्हणा हे मनुष्य प्राण्यांत इतरांपेक्षा जरा जास्त किंवा पद्धतशीर आहे, असे म्हणावयास हरकत नाही. तसे इतर प्राणीही आपल्या भावना व्यक्त करतातच. उदाहरणच द्यायचं झालं तर आपला पाळीव कुत्रा... आपल्याला पाहताच अंगावर उडी मारतो पण अनोळखी व्यक्तीवर गुरकावुन भुंकतो. नाठाळ घोडा, ओळखीचा/प्रेमाचा (जो त्या घोड्यावर खूप माया करतो, असे त्या घोड्याला जाणवते) माणूस दिसताच, त्याच्या केवळ आवाजाने किंवा हस्तस्पर्शाने शांत होतो. पण बैल, हत्ती? अतिशय सहनशील प्राणी. कितीही त्रास होऊ दे, संपूर्ण सामर्थ्यानिशी गुमानं काम करत राहतात. फार क्वचित प्रसंगी हे आपला त्रागा व्यक्त करतात आणि ते हि रौद्रपणे...!!! 

पण मनुष्य प्राण्याचे असे नसते. भावना कोठे व्यक्त/उघड्या कराव्यात, कोठे लपवाव्यात याचाही तो विचार करतो. तो जितका सहनशील तितकाच उथळपणे भावना व्यक्त करू शकतो. यात एक सूक्ष्म फरक आहे. कुत्रा, घोडा, बैल, हत्ती आदि., व्यक्तीच्या प्रेम करण्याच्या प्रकारावरून त्यास आपलेसे करतात तर मनुष्य आपल्या भावना व्यक्त करण्यापूर्वी समोरच्या व्यक्तीची उपयुक्तता, स्वतःचा स्वार्थ आदि. खूप साऱ्या गोष्टींची शहनिशा करतो आणि खात्री पटली तरच आपल्या भावना व्यक्त करतो. निःष्पक्ष प्रेम पाहण्याची दृष्टी जी प्राण्यांत आढळते, तीचा मनुष्य प्राण्यांत अभाव आढळतो. अगदी आढळतच नाही असे नाही, पण फार कमी लोकांमध्ये हि शक्ती दिसून येते, असा माझा एकंदर अनुभव आहे. आता मी काही फार पावसाळे पाहिलेला वयस्कर नसलो तरी जितक्या प्रकारच्या माणसांच्या सहवासात आलो त्यांवरून इतके तर नक्कीच म्हणू शकतो. 

हताश होणं, निराश होणं, दुःखी होणं, आनंदी होणं या साऱ्या लीला सर्वच सजीव (अगदी वनस्पतीसुद्धा) अनुभवतात. फक्त ते व्यक्त करण्याची प्रत्येकाची पद्धत वेग-वेगळी असू शकते. आपला पालनकर्ता खुश असेल तर दूध-भाकरी खाऊनही खुश असणारा कुत्रा, मालकाच्या दुःखात हाडांकडे (Non-Veg) पाहूनही खुश होत नाही. मालकाच्या केवळ थोपटण्यावरून घोडा, आपल्या मालकाची स्थिती जाणतो आणि मग रमत-गमत जायचे का जीव फुटेस्तोर धावायचे, हे ठरवतो. अशी दुसऱ्याच्या सुख-दुःखात संपूर्ण समर्पित होण्याची वृत्ती किती व्यक्तींकडे दिसून येते? 

भले काही व्यक्ती खूप सहनशील, अबोल, आपले दुःख, त्रास कोणासमोर व्यक्त करत नसतील. पण खरंच ते दुसऱ्याच्या सुखात सुख मानत असतील? का आपल्याला कोणी समजूनच घेणार नाही हि भावना बळावून ते काहीच बोलत नसतील?

आणखी एक फरक म्हणाल तर पहा, आपण आपले प्रेम प्राण्यांप्रती व्यक्त करताना कधी त्यांच्या स्त्रीलिंगी अथवा पुल्लिंगी असण्याचा, त्याची जात, प्रकार यांचा विचार करतो? नाही ना? आपले प्रेम असा भेद प्राण्यांत करत नाही. पण, जेव्हा मनुष्याचा विचार करतो तेव्हा आपण समोर कोण आहे त्याचा विचार करण्यावर भर देतो. म्हणजे आपण एक ठोकताळा बनवला आहे कि, अमुक-अमुक प्रकारची व्यक्ती असली कि ती भावनाप्रधान असलीच पाहिजे. मग त्या व्यक्तीशी आपण कसे वागावे-बोलावे याचे काही अलिखित नियम बनवतो. मग ती व्यक्ती आपल्याशी कशीही बोलो-वागो, खरोखर भावनाप्रधान असो वा असण्याचे ढोंग करत असो, आपण त्याचे भांडवल नाही करायचे. कारण केवळ आपण त्या प्रकारात बसत नाही म्हणून? 

आता यामध्ये मला कोणाचाही द्वेष, राग, अपमान करायचा नाही, किंवा कोणाच्या भावनाही दुखवायच्या नाहीत. केवळ माझं एक म्हणणं मांडतोय. 

निसर्गाने मन प्रत्येकाला दिलंय. त्यामध्ये भावनाही भरल्यात. पण परिस्थितींमुळे म्हणा किंवा सततच्या होणाऱ्या अगर झालेल्या आघातांमुळे म्हणा, काहींच्या भावना लोप पावून, मनं कठोर झाली असतील पण म्हणून "सारे सारखेच" असे म्हणायचे? हे कितपत बरोबर वाटते?

"भावना समजून घेतल्या तरच समजतात" हे स्वतःला "बुद्धिमान" समजणारे का नाही समजून घेत? भावना जाणून घेण्याची वेळ येते तेव्हा का अशी माणसे यंत्रवत ठोकताळ्यांसारखी (Algorithm) वागतात? आपल्या कृतींचा विचार न करता, केवळ समोरच्या व्यक्तीच्या कृतींचे विश्लेषण का करत राहतात? भावना जपण्यासाठी माफी मागणे, प्रसंगी स्वतःकडे कमीपणा घेणे या गोष्टी का घडत नाहीत? केवळ अहंकारामुळे? कि मी कधी चुकतंच नाही, केवळ माझं नशीब खराब म्हणून माझ्यासोबत अशा घटना घडतात असा वृथा अभिमान वजा विचार करून?

पण याचा अर्थ असा नाही कि, प्रत्येक प्रसंगी आपण आपल्याकडे कमीपणा  घ्यावा. कारण "कृष्णाजी नारायण आठल्ये" यांनी आपल्या "प्रमाण" या कवितेत म्हटलेच आहे,

"अती नम्रता पात्र होते भयाला"

त्यामुळे, समोरच्या व्यक्तीची खरंच आपली नम्रता ओळखण्याची "पात्रता" असेल तरच तिथे नम्रपणे वागण्यात अर्थ आहे. नाहीतर आपल्या नम्रतेस समोरची व्यक्ती आपले भय समजून आपली किंमत करणार नाही.  कारण, जसे नम्र असण्यासाठी सुशिक्षित अन् सुसंस्कारित असणे गरजेचे असते, तसे नम्रता समजून येण्यासाठीही ते अत्यावश्यक असते. 

शेवट करताना इतकंच म्हणेन, "मन ओळखणाऱ्या व्यक्तींपेक्षा मन (भावना) जपणाऱ्या व्यक्ती हव्यात. कारण, ओळख ही क्षणभरासाठी असते तर जपवणूक आयुष्यभरासाठी...!!!"

पहा, विचार करा आणि जमल्यास व्यक्तीचे मन पाहायला अन् जपायला शिका. अगदी छोट्या-छोट्या गोष्टींमधूनही...!!! मग पहा, नात्यांची मजा आणि भावनेचा स्रोत किती सुंदर असतो ते...!!! भल्या मोठ्या वटवृक्षाचा उगम एका छोट्याशा बीजातच लपलेलं असतो, हे लक्षात ठेवा...!!! आनंदी राहा, आनंदी ठेवा आणि काही चुकले असल्यास, भावना दुखविल्या गेल्यास माफ करा...!!!

हमने तुझको प्यार किया है जितना, 
कौन करेगा इतना?... (२)

तू हि तू है, इन आखों में, और नहीं कोई दूजा ।
तुझको चाहा, तुझको सराहा, और तुझे हि पूजा ।
तेरे दर को मान के मंदिर... (२)
झुकते रहे हम जितना ।
कौन झुकेगा इतना?... (२)