रविवार, १६ एप्रिल, २०१७

कविता : कोणीतरी एखादा

जीवनात दुःख, प्रत्येकाच्याच असतं,
पण,
पावलो-पावली ते केवळ, एखाद्याच्याच असतं ।।१।।

दुःखाची तक्रार, प्रत्येकच करतो,
पण,
स्मित राखून दुःख, एखादाच झेलतो ।।२।।

प्रेमासाठी अश्रू, खूप जण ढाळतील,
पण,
अश्रू पिऊन प्रेम देणारा, एखादाच आढळेल ।।३।।

जीवनात आनंदी, खूप लोक दिसतील, 
पण,
दुसऱ्याच्या आनंदात आनंदी, एखादाच दिसेल ।।४।।

दुःखात हर-कोणी, आधार खांदा शोधेल,
पण,
दुःख सारुन आधार, एखादाच बनेल ।।५।।

गरज सरो वैद्य मरो, अनेकांना जमेल,
पण,
असे होऊनही मदतीला, एखादाच येईल ।।६।।

मन मारून जगणारे, फार असतात,
पण,
मेल्या मनात अंकुर फुलविणारा, एखादाच असतो ।।७।।

"माझं इतरांसारखं नाही", असे सर्वच म्हणतात,
पण,
तसे सिद्ध, एखादाच करून दाखवतो ।।८।।

असा एखादा, नशिबाने एखाद्यास भेटतो,
पण,
पितळ समजून सोने, कवडीमोल ठरतो ।।९।।

--- जयराज 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा